नाशिक जिल्हा जुडो असोसिएशनच्या वतीने आमदार राहुल डिकले मित्र विहार क्लब आणि यशवंत व्यायामशाळा यांच्या सहकार्याने मीनाताई ठाकरे विभागीय क्रीडा संकुल, हिरावाडी, पंचवटी येथे तिसऱ्या जुडो चॅम्पियन लीग स्पर्धेत शिवनेरी किंग संघाने जेतेपदाचा मान मिळवला.
कॅडेट, ज्युनिअर, सिनिअर पुरुष व महिला खेळाडूंचा समावेश असलेल्या या लीगमध्ये एकूण आठ संघ होते. प्रत्येक टीममध्ये १२ खेळाडू “ऑल प्ले ऑल” होते. त्यामध्ये २९० गुण मिळवून शिवनेरी किंग अव्वल स्थानावर होते. त्यानंतर तोरणा टायगर २५० गुण, अंकाई अट्टेकर २३० गुण, देवगिरी २०० गुण. त्यामध्ये उपांत्य फेरीत शिवनेरी व अंकाई विजयी होऊन ते अंतिम फेरीत दाखल झाले. नंतर अटीतटीच्या निर्णायक सामन्यामध्ये शिवनेरी किंगने ५-० अशी बाजी मारली.
“बेस्ट जुडोका” म्हणून ओम पाटीलची निवड झाली. बालाजी ए. एस, आयुष फाळके, दर्शन गवले, सनी रानमाळ, शुभांगी राऊत, वैष्णवी पाटील, भारती सेनी, प्रणाली निंबारते, भूमी परदेशी, गंधाली या सर्व खेळाडूंनी जबरदस्त खेळ करून शिवनेरी किंगसाठी विजयश्री खेचून आणली. आदर्श शेट्टी, निखिल सुवर्णा विजेत्या संघाचे मालक होते. शेट्टी, सुवर्णा या दोघांचे खेळाडूंना मोलाचे मार्गदर्शन मिळाले.