हास्यचित्र वा व्यंगचित्र म्हटले की शि. द. फडणीस यांचे नाव समोर येतेच. असा हा हास्यचित्रसम्राटाने काल शंभराव्या वर्षात पदार्पण केले. तब्बल 78 वर्षे त्यांच्या हास्यचित्र वा व्यंगचित्रांनी मराठी रसिकांच्या चेहऱ्यावर अनेक स्मितरेषा रेखाटल्या आहेत हे मान्यच केले पाहिजे. तुमच्याआमच्या दैनंदिन जीवनातील रडगाणी निवडून चेहऱ्यावर हास्याची लकेर उमटवणे किती अवघड असते ते सर्वांनाच माहित असते. हाच केंद्रबिंदू ठरवून शि. द. गेली 78 वर्षे न कंटाळता हास्य रेखाटत आहे हेच त्यांचे विशेष!
“अनेक पातळीवरील अनुभव व्यक्त करण्याची क्षमता असलेले हे एक अत्यन्त संवेदनाशील माध्यम आहे. केवळ हसवण्याचीच त्याच्याकडून अपेक्षा करणं म्हणजे त्या क्षमतेचा अंशत:च अनुभव घेणं आहे. पाश्चात्य

देशात अनेक सर्जनशील कलावंतांनी याला अनेक पैलू प्राप्त करून दिले आहेत. यामुळे निखळ करमणूकीपासून ते मानवी जीवनातील विदारक सत्य सांगण्याची ताकद त्यांच्या व्यंगचित्राला प्राप्त झाली आहे.” (वसंत सरवटे)
“मुंबईत शिकत असताना केवळ छंद म्हणून मी हास्यचित्र काढली. माझं पहिलं व्यंगचित्र मनोहर मासिकात 1945 साली प्रसिद्ध झालं.” काही काळ गेल्यानंतर जेजेच्या प्राध्यापकांनी ‘तुमचा हात बिघडेल हं, सांभाळून..’ असा इशाराही दिला होता, असे खुद्द शि. द.नी सांगितले आहे. बरोबरच्या छायाचित्रात एखाद्या गोष्टीचे वेड लागले की काय होते ते तुमच्याआमच्या आयुष्यातील प्रसंगाने मजेदारपणे सांगितले आहे. छायाचित्रात आजकालच्या मोबाईल वेडाचे कल्पनेने चित्र रंगवल्यास असेच काहीसे घडेल याचा तुम्हालाही अनुभव येईल…