Homeडेली पल्सपक्षाध्यक्षपद सोडण्यावर शरद...

पक्षाध्यक्षपद सोडण्यावर शरद पवार ठाम! सुप्रिया सुळे फर्स्ट चॉईस!!

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आपल्या पक्षाध्यक्षपदाच्या राजीनाम्यावर ठाम असून आपला उत्तराधिकारी म्हणून ते खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर जबाबदारी सोपवण्याचा तयारीत असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.

शरद पवार यांनी काल लोक माझे सांगाती, या पुस्तकाच्या सुधारित आवृत्तीच्या प्रकाशनाच्या वेळी राष्ट्रवादीच्या पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली. तेव्हापासून आज दिवसभर शरद पवार यांची समजूत काढण्याचे प्रयत्न राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून सुरू होते. मात्र त्याचवेळी शरद पवार यांच्याकडून सुप्रिया सुळे यांना आपला उत्तराधिकारी म्हणून घोषित करण्याची तयारी चालू होती. आज सकाळी नेहमीप्रमाणे पवार यशवंतराव चव्हाण केंद्रात दाखल झाले. तेथे त्यांनी नेहमीप्रमाणे येणाऱ्या लोकांशी विविध विषयांवर चर्चा केली. मात्र या चर्चेचा सारा रोख पवार यांच्या राजीनाम्याभोवतीच घुटमळत होता. आज चर्चा करणार्‍या लोकांमध्ये पवार यांचे निकटवर्तीय व पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रफुल्ल पटेल तसेच सुप्रिया सुळे आवर्जून उपस्थित होते. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आज मुंबईत नव्हते. त्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा जोरात सुरू होती.

शरद पवार यशवंतराव चव्हाण केंद्रात आले असल्याचे कळताच पक्षाचे काही कार्यकर्ते पुन्हा यशवंतराव चव्हाण केंद्राच्या बाहेर जमले आणि त्यांनी राजीनामा मागे घ्यावा म्हणून ठिय्या आंदोलन सुरू केले. पवार यांच्या लक्षात ही बाब येताच त्यांनी या कार्यकर्त्यांना आतमध्ये बोलावले आणि त्यांच्याशी राजीनाम्यावर चर्चा केली. कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता आपण हा निर्णय घेतला ही आपली चूक आहे, याबद्दल खंत वाटते, असे पवार यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. या राजीनाम्याविषयी आता एक कमिटी नेमलेली आहे. या कमिटीची मीटिंग सहा मेला होणार आहे. ती मी पाच मेला घ्यावी, असे सुचवले आहे. या कमिटीत जो निर्णय होईल तो मला मान्य असेल, असे सांगून पवारांनी या कार्यकर्त्यांची बोळवण केली असे समजते.

पवार

यशवंतराव चव्हाण केंद्रातून पवार आणि सुप्रिया सुळे संध्याकाळी चारच्या सुमारास त्यांच्या सिल्वर ओक, निवासस्थानी निघाले. त्यानंतर पटेल यांनी माध्यमांना सांगितले की, आज पवार नेहमीप्रमाणे लोकांना भेटले. ते मुंबईत असले की इथेच येऊन लोकांना भेटत असतात. त्यामुळे आज त्यांच्या येण्यामागे काही विशेष हेतू नव्हता. कोणतीही बैठक बोलवण्यात आली नव्हती. जयंत पाटील नाराज नाहीत. ते पुण्यात बँकेच्या एका बैठकीसाठी गेले आहेत. ते संध्याकाळी परत येणार आहेत. मी स्वतः पक्षाचा उपाध्यक्ष आहे. मला पक्षाध्यक्ष होण्यात कोणतेही स्वारस्य नाही. साहेबांनी आपल्या राजीनामा परत घ्यावा म्हणून आम्ही त्यांची मनधरणी करत आहोत. त्यांनी वेळ मागितला आहे. तो वेळ घेतल्यानंतर साहेब स्वतः त्यांचा निर्णय जाहीर करतील, असेही ते म्हणाले.

दरम्यान, शरद पवार यांच्या निकटवर्ती असलेले नेते सुप्रिया सुळे यांच्याकडे ही जबाबदारी सोपवण्याची तयारी करत असल्याचे कळते. या दृष्टीनेच पवार यांनी जाहीर केलेल्या कमिटीत निर्णय होईल. याचा परिणाम म्हणून अजितदादा पक्षातून बाहेर पडू शकतात, म्हणून त्यांना प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्याचाही विचार केला जात आहे. सुप्रिया सुळे यांना राष्ट्रीय अध्यक्ष करण्याचा मार्ग सोपा व्हावा यासाठी पवार समर्थक आमदार जितेंद्र आव्हाड, अनिल पाटील आदींनी आपले राजीनामेही पवारांकडे पाठवले असल्याचे समजते.

राष्ट्रवादीच्या घटनेत अध्यक्षांनी राजीनामा दिला असल्यास पक्षाची राष्ट्रीय कार्यकारणी तसेच केंद्रीय निवडणूक समिती राष्ट्रीय अधिवेशन न बोलावता तत्काळ अध्यक्ष नेमू शकते अशी तरतूद आहे. ते एखाद्याच्या नावाची शिफारसही करू शकते. शरद पवार यांची मागच्या वर्षी सप्टेंबरमध्ये पक्षाच्या अध्यक्षपदी पुन्हा निवड करण्यात आली होती. जेमतेम आठ महिन्यानंतर त्यांनी आपण हे पद सोडत असल्याचे जाहीर केले आहे.

Continue reading

कॅनडाच्या ‘कॉन्स्टेलेशन’कडून पुण्यातल्या ‘पिओसिट’चे अधिग्रहण

सॉफ्टवेअर क्षेत्रातील एक मोठी आणि महत्त्वाची व्यावसायिक घडामोड समोर आली असून, कॅनडातील नामांकित 'कॉन्स्टेलेशन सॉफ्टवेअर' (सीएसआय) या कंपनीने भारतातील 'पिओसिट सॉफ्टवेअर सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड' या कंपनीचे अधिग्रहण केले आहे. या महत्त्वपूर्ण करारामुळे जागतिक सॉफ्टवेअर बाजारपेठेत दोन्ही कंपन्यांचे स्थान अधिक...

भोर ईंण्डस्ट्रीजच्या कामगारांना मिळाला न्याय!

कंपनी व मान्यताप्राप्त संघटना यांच्यात झालेल्या समझोत्यामुळे संबधित कामगारांचे हक्क संपुष्टात येत नाहीत, असा निकाल देत औद्योगिक न्यायालय, पुणे यांनी भोर ईंण्डस्ट्रीजने तीन महिन्यांच्या आत कामगारांना नुकसानभरपाई अदा करावी, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. याप्रकरणी, कामगारांच्यावतीने उदयोन्मुख वकील...

प्रेम नाम है मेरा.. प्रेम चोपडा..

“प्रेम नाम है मेरा.. प्रेम चोपडा..” हा डायलॉग आजही भारतीय चित्रपटसृष्टीतील एक अजरामर ओळख मानली जाते. अनेक दशकांपासून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे प्रेम चोपडा यांनी खलनायकाच्या भूमिका करतानादेखील आपल्या वेगळ्या शैलीने चाहत्यांचे प्रेम मिळवले. पण काळाच्या ओघात...
Skip to content