बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान खात्यामधील उद्यान विद्या सहाय्यक म्हणून कार्यरत असणाऱ्या व मुंबईतल्या भटवाडी, घाटकोपर येथे राहणाऱ्या सीमा बापू माने ह्यांनी २६ जानेवारी २०२४ रोजी आफ्रिका खंडामधील सर्वात उंच पर्वत माउंट किलीमांजारो सर करून आपल्या देशाच्या संविधानाची प्रस्तावना १९,३४१ फूट (५,८९५ मी) उंचीवर वाचली.
भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करून संविधानातील स्वातंत्र्य, समता, बंधुतेचा जगभर प्रसार करत आहेत. ह्या मोहिमेआधी सीमा माने ह्यांनी बेसिक आणि ऍडव्हान्स माउंटेनिअरींग कोर्स यशस्वीरीत्या पूर्ण केला आहे. आपल्या जीवनातील अनेक अडचणींवर मात देत वयाच्या ३८व्या वर्षी अवघ्या २ वर्षांच्या कालावधीमध्ये तिने आंतराष्ट्रीय पातळीवर आपल्या देशाचे व बृहन्मुंबई महानगरपालिकेचे नाव रेखाटले आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका उद्यान खात्याचे प्रमुख, उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सोलापूरमधील 360 एक्सप्लोरर कंपनीमार्फत त्यांनी ही मोहीम यशस्वीरीत्या पूर्ण केली असून भविष्यात माऊंट एव्हरेस्टसहित उर्वरित पाचही खंडातील सर्वोच्च शिखरे पादाक्रांत करण्याचा सीमा माने यांचा निर्धार आहे. याआधी त्यांनी, हिमाचल प्रदेशमधील फ्रेंडशिप पीक, सिक्कीममधील काब्रू डोम कॅम्प १ सर केले आहे. तसेच सह्याद्रीमधील वजीर पिनॅकल, स्कॉटिश कडा, तैलाबैला, नवरा पिनॅकल, नवरी पिनॅकल, भैरवगड, हरिश्चंद्र गड, कळसूबाई, माहुली गड, व इतर अनेक गड सर केले आहेत. तसेच काश्मीरमधील अवघड तीन तलावांचा तारसार, मारसार आणि सुंदरसार लेक ट्रेक यशस्वीरीत्या पूर्ण केलेला आहे.