Homeमाय व्हॉईसरोहित पवारांचे 'टार्गेट-...

रोहित पवारांचे ‘टार्गेट- तटकरे आणि पटेल’ वैफल्यातून!

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या दुर्दैवी अपघाती निधनानंतर त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला झालंय तरी काय असा प्रश्न निर्माण होतोय. सतत कुठल्या ना कुठल्या वादात हा पक्ष सापडताना दिसतो आहे. आता अखेर भोंदूबाबा अशोक खरातच्या प्रकरणात रूपाली चाकणकर ह्यांनी राष्ट्रवादी महिला आघाडीच्या अध्यक्षपदाचाही राजीनामा दिला आहे. दोनच दिवसांपूर्वी त्यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. भोंदूबाबा अशोक खरातचे पाय धुतानाचे, त्याच्या डोक्यावर छत्री धरतानाचे त्यांचे फोटो सगळीकडे व्हायरल झाले होते. त्यामुळे विरोधी पक्ष आणि राष्ट्रवादी पक्षातही त्यांच्याबाबत असंतोषाचे वातावरण निर्माण झाले होते. शिवसेना उबाठा गटाच्या नेत्या सुषमा अंधारे आणि राष्ट्रवादी पक्षातीलच चाकणकरांच्या विरोधक रूपाली ठोंबरे त्यांच्यामागे हात धुवून लागल्या होत्या. त्यातच भर पडली आहे तृप्ती देसाई ह्यांची. चाकणकरांच्या राजीनाम्यानंतर त्यांचीही एसआयटीमार्फत चौकशी करा, त्यांनाही सहआरोपी  करा, त्यांनाही अटक करा अशा मागण्या ह्या महिला नेत्यांनी केल्या आहेत. त्यातच भर पडलीय ती त्यांना पाठवलेल्या समन्सची. चाकणकरांना चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. त्यामुळे ह्या त्यांच्या विरोधी महिला नेत्यांना अधिकच  बळ आले आहे.

पवार

चाकणकरांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार ह्यांच्याकडे राजीनामा दिल्यानंतर म्हटले आहे की, पुरावा नसताना माझ्यावर आरोप केले जात आहेत. खरातच्या इतर प्रकरणाशी माझा काही संबंध नाही. पण ह्या प्रकरणाची चौकशी पारदर्शकपणे व्हावी म्हणून मी राजीनामा देत आहे. त्यांच्या ह्या वक्तव्यामुळे त्यांच्या पक्षाचेच कार्यकर्ते चिडले आहेत. खरेतर हा राजीनामा आधीच व्हायला पाहिजे होता, असे त्यांचे मत आहे. हे म्हणजे गिरे तो भी टांग उपर.. अशातली गत झाली. राष्ट्रवादी पक्षाच्या नाशिक जिल्ह्यातील महिला आघाडी अध्यक्ष आणि इतर पदाधिकार्‍यांनी रूपाली चाकणकरांना नाशिक जिल्ह्यात यायला बंदी घातली होती. तसेही महिला आयोग अध्यक्षा म्हणून रूपाली चाकणकरांचे फारसे काही काम नव्हते. उलट पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात त्यांनी तिच्या सासरच्या मंडळींचीच बाजू घेतली होती. आणि डॉ. संपदा मुंडे आत्महत्त्या प्रकरणातही त्यांची बदनामीच केली होती.

पवार

रूपाली चाकणकरांबरोबरच राष्ट्रवादीचे आणखी एक मंत्री नरहरी झिरवळ वादात सापडले आहेत. त्यांचाही एक आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यांच्या सरकारी निवासस्थानात एका तृतीयपंथीयाबरोबरचा त्यांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. मात्र तो व्हीडिओ एआय तंत्रज्ञानाने मला अडचणीत आणण्यासाठी बनवला आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांनी ह्याबाबत चौकशीचे आदेश दिले आहेत आणि दोषी व्यक्तींवर कारवाई केली जाईल असे जाहीर केले आहे. दोन महिन्यांपूर्वीच झिरवळ ह्यांच्या कार्यालयातील कर्मचार्‍याला लाच घेताना भ्रष्टचारविरोधी पथकाने रंगेहात पकडले होते. मात्र त्या प्रकरणाशी माझा काही संबंध नाही, म्हणून झिरवळ ह्यांनी हात झटकले होते. मात्र तेव्हापासूनच त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे.

अजितदादांच्या अपघाती निधंनंनंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार आणि त्यांचे पुतणे  रोहित पवार ह्यांनी तो अपघात नसून घातपात आहे असे सांगून रान उठवले होते. मुंबई आणि बारामती येथील पोलिसांनी एफआयआर नोंदवण्यास नकार दिल्यानंतर रोहित पवार् ह्यांनी थेट दिल्ली गाठून, राहुल गांधी ह्यांची भेट घेतली आणि काँग्रेसचे सरकार असलेल्या कर्नाटक राज्यात जाऊन एफआयआर दाखल करण्याचा द्राविडी प्राणायाम केला. कर्नाटक सरकारने तो एफआयआर महाराष्ट्र सरकारकडे पाठविला आहे. ह्यामध्ये महाराष्ट्राचीच बदनामी करण्याचा त्यांचा हेतू होता असे सत्ताधाऱ्यांना  वाटते. खरेतर अजितदादांच्या अपघाताच्याच दिवशी शरद पवार ह्यांनी हा घातपात नसून अपघातच आहे असे विधान प्रसारमध्यमांशी बोलताना केले होते. मात्र तरीही रोहित पवार हा घातपातच आहे असे धरून चालले आहेत. आता ह्या अपघाताचीही विविध स्तरावर चौकशी चालू आहे. त्याचा अहवाल येईलच. मात्र रोहित पवारांनी अनेक राष्ट्रीय स्तरावरील विविध पक्षाच्या नेत्यांच्या भेटी घेतल्या, व्हिडिओ सादरीकरण केले आणि हा घातपातच कसा होता हे पटवून द्यायचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे सुनेत्राताई आणि दोन्ही मुले जय आणि पार्थ पवार ह्याबाबत काहीही बोलत नाहीत.

पवार

अजितदादांच्या निधनानंतर तिसर्‍याच दिवशी सुनेत्रा पवारांचा उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी घडवून आणला, ते राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल, ह्यांनी. रोहित पवारांनी त्यांना लक्ष्य केले आहे. कारण दादांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा रंगली होती. दादांची ती इच्छा होती असे सांगून शरद पवार गटाच्या नेत्यांनी आकाशपाताळ एक केले होते. मात्र सुनेत्रा पवारांची उपमुख्यमंत्री म्हणून निवड झाल्यानंतर, सत्तेत सहभागी होण्याचा त्यांचा मार्ग खुंटला. त्याच्या वैफल्यातूनच रोहित पवार तटकरे आणि पटेल ह्यांच्यावर शरसंधान करत आहेत. त्यातच विलीनीकरण पुन्हा चर्चेत आले आहे. ह्यावर तटकरे ह्यांनी ह्याबाबत सुनेत्रा पवारच निर्णय घेतील असे सांगितले आहे, तर शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख ह्यांनी मात्र आता हे होणार नाही म्हणून चर्चा थांबवली आहे. आता सुनेत्रा पवार किती कणखर भूमिका घेतात ह्यावरच त्या पक्षाचे भवितव्य अवलंबून आहे.

(लेखक वैजयंती कुलकर्णी आपटे ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक आहेत.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

कमकुवत मनाच्या स्त्रिया लागतात खरातसारख्या भोंदू बाबाच्या नादी!

महाराष्ट्राला अगदी लाज आणणारे स्त्रियांच्या  शोषणाचे भयानक प्रकरण समोर आले आहे. तेही नाशिकसारख्या पवित्र भूमीत, जी भूमी प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झाली आहे, तिथे आणि शिर्डीसारख्या दुसर्‍या पवित्र ठिकाणी ह्या खरातने सगळ्या मर्यादा, लाज, लज्जा, शरम गुंडाळून शेकडो स्त्रियांचे...

उद्धव ठाकरेंची पुढची आमदारकी धोक्यात?

राज्यसभेच्या ७ जागांसाठी महाराष्ट्रातून बिनविरोध निवडणूक झाल्यानंतर आता वेध लागले आहेत ते विधान परिषदेच्या निवडणुकीचे. एप्रिलमध्ये होणार्‍या ह्या निवडणुकीचे बिगुल संजय राऊत ह्यांनी वाजवले आहे. शरद पवारांच्या राज्यसभा निवडणुकीचे बिगुलही त्यांनीच वाजवले होते. मात्र नंतर सुप्रिया सुळे, जयंत पाटील ह्या...

काय गं.. पाळणा नाही हलला अजून? काही प्लॅनिंग??

कुठल्याही जोडप्याला लग्नानंतर वर्ष-दीड वर्षात मूल झाले नाही तर लगेच कुटुंबियांकडून, मित्रमंडळींकडून विचारणा होते, अजून पाळणा नाही हलला? काय प्लॅनिंग का? वगैरे.. वगैरे.. अपत्य होणे हे नेहमी त्या जोडप्याच्याच हातात नसते. काहीवेळा काही शारीरिक समस्यांमुळे मूल होत नाही. पण...
Skip to content