किराणा आणि आग्रा घराण्याच्या ख्यातनाम गायिका पद्मश्री माणिक वर्मा यांच्या ध्वनिमुद्रित कार्यक्रमाची मैफल दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने शनिवार, १३ फेब्रुवारी २०२१ यादिवशी सायंकाळी पाच वाजता आयोजित करण्यात आली आहे.
त्यांना तबल्यावर नाना मुळे तसेच संवादिनीवर गोविंदराव पटवर्धन यांची साथ आहे. त्याची लिंक www.dadarmatungaculturalcentre.org या संकेतस्थळावर कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी उपलब्ध होईल. गानरसिकांनी विदुषी कै. माणिक वर्मा यांच्या सुश्राव्य ध्वनिमुद्रित गायनाचा आनंद घ्यावा, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
माणिक वर्मा यांनी किराणा घराण्याचे ज्येष्ठ गायक कै. सुरेशबाबू माने, उ. इनायत खाँ, उ. अजमत हुसेन खाँ आणिं नंतर आग्रा घराण्याचे गुणिदास पं. जगन्नाथबुवा पुरोहित यांच्याकडून तालीम घेतली. पण घराण्याच्या पंरपरेबाहेर पडून स्वतःची स्वतंत्र गायनशैली निर्माण केली. मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राने कोरोना महामारी आणि टाळेबंदी यामुळे दरमहा प्रत्यक्ष होणारे कार्यक्रम सप्टेंबर २०२०पासून ध्वनिमुद्रण पद्धतीने श्रवणानंद देण्याचा स्वरसंचित हा उपक्रम सुरू केला आहे. फेब्रुवारी महिन्याचा हा मान कै. माणिक वर्मा यांना आहे.