मंजिरी गावडे आणि कृतिका कुमार यांनी ८८ धावांच्या दणदणीत सलामीच्या जोरावर उभारलेल्या ३ बाद १४० या आव्हानाचा पाठलाग करण्यात भारत क्रिकेट क्लब अपयशी ठरला. केतकी धुरेच्या ६७ धावांच्या झुंजार खेळीला एकाही फलंदाजाची साथ न लाभल्यामुळे भारतचा संघ ११६ धावांपर्यंत मजल मारू शकला आणि दिलीप वेंगसरकर फाऊंडेशनने २४ धावांच्या विजयासह प्रकाश पुराणिक स्मृती चषक महिला टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. आता त्यांची गाठ पालघर-डहाणू तालुका स्पोर्ट्स असोसिएशनचा (पीडीटीएसए) सहज पराभव करणार्या राजावाडी क्रिकेट क्लबशी आहे.
माहिम ज्युवेनाईल स्पोर्टस् क्लब आणि शिवाजी पार्क जिमखान्याने प्रकाश पुराणिक यांच्या स्मरणार्थ महिला क्रिकेटला प्रोत्साहन देणार्या टी-२० क्रिकेट स्पर्धेचे दिमाखदार आयोजन करत मुंबई क्रिकेट संघटनेने दिलेल्या संधीचे सोने केले. काल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पीडीटीएसएच्या खेळाडूंनी घोर निराशा केली. स्पर्धेतील एकमेव शतक झळकावणार्या शर्वी सावे अवघ्या ४ धावांवर बाद झाल्यावर स्नेहलता धांगडा आणि सिद्धेश्वरी पागधरे यांनी ४९ धावांची महत्त्वपूर्ण भागी रचली. पण ही जोडी फुटल्यानंतर पीडीटीएसएच्या फलंदाजांनी ४४ चेंडूंत केवळ २२ धावाच काढल्यामुळे राजावाडीने त्यांना ७६ धावांवर रोखण्यात यश मिळवले.
त्यानंतर ७७ धावांचे माफक आव्हानाचा पाठलाग राजावाडीचीही घसरगुंडी उडाली. अश्विनी निशादने डावाच्या पहिल्याच षटकांत वृषाली भगतला शून्यावरच बाद केले. मग किमया राणेला अश्विनीनेच बाद करत आपल्या संघाला सामन्यात आणले. पुढच्याच षटकांत निविया आंब्रेला शून्यावरच धावचीत करत राजावाडीची ३ बाद २२ अशी अवस्था केली. पण सलोनी कुष्टे (१७) आणि क्षमा पाटेकर (ना. २३) यांनी चौथ्या विकेटसाठी ३४ धावांची भागी रचत संघाला विजायसमीप नेले. त्यानंतर तुशी शाहबरोबर २३ धावांची अभेद्य भागी रचत राजावाडीला १७.२ षटकांत संघाचा अंतिम फेरीतील प्रवेश निश्चित केला.
त्याअगोदर दिलीप वेंगसरकर फाउंडेशनच्या मंजिरी गावडे आणि कृतिका कुमारने ८८ धावांची खणखणीत भागी रचल्यामुळे ते २० षटकांत ३ बाद १४० अशी जबरदस्त मजल मारू शकले. या धावांचा पाठलाग करताना केतकी धुरेने ६७ धावांची नाबाद खेळी करताना संघाच्या विजयासाठी शेवटपर्यंत प्रयत्न केले. पण अन्य फलंदाजांच्या निराशाजनक खेळामुळे त्यांचा संघ ११६ धावांपर्यंत पोहोचू शकला आणि वेंगसरकर फाऊंडेशनच्या महिलांनी पुन्हा एकदा जेतेपदाच्या शर्यतीत आपल्या नावाची नोंद केली.
संक्षिप्त धावफलक
पालघर-डहाणू तालुका स्पोर्ट्स असोसिएशन: २० षटकात ७ बाद ७६ (स्नेहलता धांगडा २१, सिद्धेश्वरी पागधरे ३१; दिक्षा पवार १५/२, वृषाली भगत ४/१)
राजावाडी क्रिकेट क्लब: १७.२ षटकात ४ बाद ७९ (सलोनी कुष्टे १७, किमया राणे १९, क्षमा पाटेकर ना. २३; अश्विनी निशाद १७/२)
दिलीप वेंगसरकर फाऊंडेशन: २० षटकात ३ बाद १४० (मंजिरी गावडे ४६, कृतिका कृष्णकुमार ४६, सिमरन शेख ना. २८; निर्मिती राणे २०/२)
भारत क्रिकेट क्लब: २० षटकात ७ बाद ११६ (केतकी धुरे ना. ६७, राजसी नागोसे १९; आदिती सुर्वे २०/२, पुनम राऊत १६/१).
राजावाडी, भारत क्रिकेट क्लब उपांत्य फेरीत
त्याआधी, क्षमा पाटेकर (ना.३६) आणि निविया आंब्रे (ना. ३०) यांनी चौथ्या विकेटसाठी केलेल्या ६१ धावांच्या अभेद्य भागीदारीच्या जोरावर राजावाडी क्रिकेट क्लबने ग्लोरियस क्रिकेट क्लबचा ७ विकेट आणि १६ चेंडू राखून पराभव करीत प्रकाश पुराणिक स्मृती चषक महिला टी-२० क्रिकेट स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली.
ग्लोरियसने साध्वी संजयच्या ३७ आणि श्रद्धा शेट्टीच्या नाबाद ४१ धावांमुळे ३ बाद १०४पर्यंत मजल मारली. पण राजावाडीच्या वृषाली भगत, क्षमा पाटेकर आणि निविया आंब्रे यांनी ग्लोरियसच्या आक्रमणाला सहजपणे थोपवत १८ व्या षटकांतच विजयी लक्ष्य गाठले. पालघर-डहाणूनेही रिगल क्रिकेट क्लबच्या संघाला ९४ धावांतच गुंडाळून आपला विजय अधिक सोपा केला होता. सिद्धेश्वरी पागधरेने ४० चेंडूंत ६१ धावांची मॅचविनिंग खेळी करताना १६ व्या षटकांतच संघाच्या उपांत्य फेरी प्रवेशावर शिक्कामोर्तब केले.
भारत क्रिकेट क्लबने अक्षी गुरव, कशिश निर्मल आणि निर्मिती राणे या त्रिकूटाच्या मार्याच्या जोरावर जे भाटिया स्पोर्ट्स क्लबला ५८ धावांतच रोखले आणि अमृता परब आणि लक्ष्मी सरोज यांनी ८.२ षटकांतच बिनबाद विजयी लक्ष्य गाठले. अमृताने ३५ चेंडूंत ४३ तर लक्ष्मीने नाबाद १४ धावा केल्या. ७ धावांत २ विकेट टिपणारी कशिश सामन्याची मानकरी ठरली. व्हिक्टरी क्लबने महेक पोरकार (३९) आणि सारिका कोळी (४३) यांच्या ७७ धावांच्या सलामीमुळे दहा षटकांत दमदार सलामी दिली होती. मात्र त्यानंतर अन्य फलंदाजांना दहा षटकांत ६२ धावाच काढता आल्या. परिणामता व्हिक्टरी क्लब १३९ धावांपर्यंत पोहोचू शकला. विजयासाठी १४० धावांचा पाठलाग करणार्या दिलीप वेंगसरकर फाऊंडेशनच्या सलामीवीर मंजिरी गावडेने ५६ चेंडूंत ७० धावांची अभेद्य खेळी करताना संघाला १९ व्या षटकातच विजय मिळवून दिला.
संक्षिप्त धावफलक
ग्लोरियस क्रिकेट क्लब: २० षटकात ३ बाद १०४ (साध्वी संजय ३७, करूणा सकपाळ ४१; कोमल परब १५/१, क्षमा पाटेकर २०/१)
राजावाडी क्रिकेट क्लब: १७.२ षटकांत ३ बाद ११० (वृषाली भगत २६, निविया आंब्रे ना. ३६, तुशी शाह ना. ३०; इरा जाधव १६/२).
रिगल क्रिकेट क्लब: १७.३ षटकात सर्वबाद ९४ (श्रुती नाईक ३४, सुषमा पाटील १५; रागिणी दुबला १५/२, शुभ्रा राऊत २०/२, वैष्णवी घरत १८/२)
पीडीटीएसए: १६ षटकात ४ बाद ९७ (सिद्धेश्वरी पागधरे ना. ६१, शुभ्रा राऊत १४; अक्षय शिंदे ११/३),
व्हिक्टरी क्रिकेट क्लब: २० षटकात ६ बाद १३९ (महेक पोरकार ३९, सारिका कोळी ४३, तन्वी परब ना. १७ ; पूनम राऊत १८/२, समृद्धी राऊळ ३३/२)
दिलीप वेंगसरकर फाऊंडेशन: १९ षटकात ५ बाद १४१ (मंजिरी गावडे ना. ७०, कृतिका कृष्णकुमार १९; निदीत दावडा २५).
जे भाटिया स्पोर्ट्स क्लब: २० षटकात ९ बाद ५८ (सौम्या सिंग २३, राधिका ठक्कर १३ ; अक्षी गुरव १२/२, कशिश निर्मल ७/२, निर्मिती राणे १५/२ )
भारत क्रिकेट क्लब: ८.२ षटकात बिनबाद ६१ ( अमृता परब ना. ४३, लक्ष्मी सरोज ना. १४)