Monday, December 23, 2024
Homeमाय व्हॉईसपर्यावरण रक्षण: एक...

पर्यावरण रक्षण: एक सामुदायिक जबाबदारी!

वर्षाच्या ३६५ दिवसांपैकी साधारणतः रोजच कोणता ना कोणता दिवस जगभरात साजरा होत असतो. काही दिवस हे जगाला व्यापून असलेल्या समस्यांकडे लक्ष वेधून त्यावर उपाययोजना  करण्यासाठी साजरे केले जातात. मात्र, मानवाने पृथ्वीवर जगताना गेले दोन-अडीचशे वर्षांत जी औद्योगिक क्रांती आणली तिने काही अंशी जगणे सुकर झाले असले तरी समस्या मात्र भरपूर निर्माण केल्या आहेत. त्यापैकीच एक जटिल प्रश्न म्हणजे पर्यावरण!

पृथ्वीवरील अनिर्बंध लोकसंख्यावाढीमुळे निर्बंध लादूनसुद्धा लोक ते मोडतातच. यातच त्यांना फुशारकी वाटते. तात्कालिक फायदे पाहून भविष्याचे अधिक नुकसान करायचे असे धोरण मनुष्याने घेतले आहे. महाराष्ट्रात नाही का लॉकडाऊनच्या निर्बंध हटविण्यावरून अनिर्बंध घोळ काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस सरकारने केला. हाच प्रकार दुनियभरात होतोय. तथापि, एक नक्की की ‘प्रदूषण वाढतंय, पर्यावरण बिघडतंय’ त्याचे परिणाम सर्वच भोगत आहेत!

गेल्या वर्षीपासून कोरोनाने विश्वात थैमान घातले. सर्वत्र आलेल्या लादलेल्या बंदीमुळे कारखाने नि तत्सम उद्योग बंद करण्यात आले. यातून पर्यावरण काही अंशी सुधारले. पण यातून माणसाच्या जीवनमरणाचा प्रश्न अधिकच बिकट झाला. सर्वच आघाडीवर नवे प्रश्न तयार होताना पाहावे लागत आहेत. एका समस्येचा गुंता सोडवला की अधिकचे नवे प्रश्न समोर येताहेत. बायोलॉजीकल वॉरचा भाग म्हणून कोरोनाची समीकरणे मांडली जात आहेत. कोणी औषध कंपन्यांचा खप वाढविण्याचा फंडा म्हणून साथरोग पसरवल्याचे म्हणत आहेत. जे  असेल ते असो पण याचे दुष्परिणाम मात्र पुढील काळात भयानक आहेत हे नक्की!

प्राण्यांमुळे जगात इबोला, सार्स, एच 1 एन 1सारखे रोग येत राहिले. प्लेग उंदरापासून तसाच कोरोना वटवाघळपासून निर्माण झाल्याचे म्हणतात. याचीही अद्याप पुष्टी व्हायचीय. ‘झुनॉटिक स्पिल ओव्हर’ प्राण्यातून माणसात रोगजंतू येण्याच्या प्रक्रियेला म्हटले जाते. उपलब्ध माहितीनुसार हा असा प्रकार मानवी हस्तक्षेपामुळे जे प्राणी पक्षी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत त्यांच्यातून होत असल्याचे रॉयल सोसायटीचा अभ्यास सांगतो. इथेच पर्यावरणाचा थेट संबंध येतो.

आतापर्यंत हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. जगात अमर्याद जंगलतोड होत आहे. जंगलतोडीमुळे त्यांचे अधिवास संपू लागलेत. शिकारीमुळे संख्या घटते आहे. खाण्याच्या कमतरतेमुळे प्राणी रोडावलेत. ते शहराकडे धाव घेत आहेत. काही महिन्यांपूर्वी पुण्यात शेजारच्या खडकवासला परिसरातून रानगव्याने प्रवेश केला. त्याला यशस्वीपणे पकडण्याऐवजी झालेल्या मानवी हस्तक्षेपाने त्याचा मृत्यू ओढवला. मुंबईत आरेतील बिबटे, ठाण्यात उपवन, वर्तक नगर, नागपूर आदी भागात आढळणे याच्याशी पर्यावरणाचा संबंध दिसतो.

पर्यावरण

याचा परिणाम विषाणू प्रसारशी जोडता येतो. यु एन नेशन्स एंटरटेनमेंट प्रोग्रॅमच्या मते रासायनिक शेती, जंगल नाश, त्यामुळे वातावरणातील बदल, प्राणी, जनावरे यांची शिकार, व्यापार नि तस्करी, यासह अन्य कारणे पर्यावरण नाशातून प्राणिजन्य आजारांच्या प्रसार, उद्भवासाठी जबाबदार आहेत. मानवी वस्तीचा त्यांनी घेतलेला आश्रय हा चिंताजनक आहे.

पर्यावरणाच्या मर्यादा ओलांडणे ही गोष्ट नवी नाही. मेसोपोटेमिया संस्कृतीत हे पाहायला मिळाले आहेच! अथेन्समधील मोठमोठ्या इमारती उभ्या करताना जवळच्या जंगलांची चांगलीच तोड, कत्तल करण्यात आली होती. यामुळे जमिनीची धूप नि जमिनीचे अतिसारकरण झाल्याचे दाखले प्लेटोच्या लिखाणात मिळतात. त्या काळात तंत्रज्ञान खूपच मागासलेले असल्याने त्याचे दुष्परिणाम स्थानिक होते. मात्र, आज तसे नाही. आजच्या विकसित तंत्रज्ञानाचे परिणाम वैश्विक बनले आहेत हे आता लक्षात घ्यावे लागेल.

मुळात त्यासाठी आपल्याला पर्यावरण ही अनेक समस्यांची गुंतागुंत आहे हेच लक्षात घ्यावे लागेल. पृथ्वीविज्ञान, या प्रकारात जी माहिती समोर आलीय त्यात पर्यावरणीय सीमा (इकॉलॉजीकल बाऊंडरीज) ही संकल्पना आहे. त्याबाबत आपण अनभिज्ञ आहोत. आपल्या राज्य, देशापुरते बोलायचे झाल्यास संशोधक अभ्यास करत असतात ते लोकांपर्यंत येत नाही. ते मांडले गेले तरी त्याची अंमलबजावणी करणारे राज्यकर्ते, नोकरशहा गांभीर्याने घेत नाहीत. नि सामान्य लोकही सरकार, शासन जबाबदारी म्हणत याकडे दुर्लक्ष करतात. पर्यावरण ही एकट्याने लढायची बाब नाही, ती सामुदायिक बाब आहे हेच जोपर्यंत बिंबवले जात नाही तोपर्यन्त कोरोनासारखा निष्काळजीपणा होत राहणार. आताही समाजाचा मोठा घटक बेफिकीरीने सूचनांचे पालन करताना दिसत नाही.

या संकल्पनेनुसार महासागरात मोठ्या प्रमाणावर आम्लता वाढणे, ओझोन वायू थरात घट, वातावरण बदल, जैवविविधतेचा नाश, जगातील गोड्या पाण्याची होत जाणारी कमतरता, जमीन वापराचा बदल, वाढते रासायनिक प्रदूषण मग ते जल, जमीन, हवा या मार्गाने तसेच डॉटमॉसफेरीक एरोसोल लोडिंग या घटकांपैकी काहींचे आधीच उल्लंघन झाले आहे तर इतर सीमाची प्रक्रिया चालू आहे.

नैसर्गिक स्रोतांपासून अमर्याद आर्थिक वाढ शक्य नाही. पर्यावरणीय अर्थतज्ज्ञ जॉन केनिथ गॅलब्रेथ म्हणतात, इनोसंट फ्रॉडमुळे (निष्पाप घोटाळा) कोरोनाने दिलेले धडे जाणवत नसतील तर हा पर्यावरणीय बिनडोकपणा आहे. अंतहीन आर्थिक वाढ, अपेक्षित असणारे आर्थिक प्रारूप हा मूर्खपणा आहे, असे अर्थतज्ज्ञ हरमन डॉली यांचे मत आहे. या प्रारूपापासून फारकत घेणेच समस्यांच्या गुंतागुंतीवर मात करू शकेल! जर संपत्तीला मर्यादा घातल्या नाहीत तर ती मोठ्या दारिद्र्याचे कारण ठरेल असे जुन्या काळात एपिक्यूरस याने म्हटलं आहे.

एकूणच काय तर एका मराठी चित्रपटातील गाणे यावेळी आठवते “मी असो, तू असो, भोग कुणाला या दैवाचा कळला’.. त्यामुळे औद्योगिक क्रांतीचा फटका एकट्या प्रगत देशांनाच भोगावा लागतो असे नाही. त्यात भारत, बांगला देश, मालदीव, व्हिएतनाम कोणीही छोटा देश येतोच. श्रीमंतांनी केलेल्या पर्यावरण ऱ्हासाची शिक्षा सर्वच भोगतात असे नाही. कारण, कमीअधिक प्रमाणात गरीबदेखील यात सामील असतोच! अनावश्यक वृक्षतोड, कमीतकमी कचरा निर्मिती, पाण्याची बचत, नद्यांच संवर्धन मृदा संधारण, कांदळवन संरक्षण अशा अनेक बाबी गाव पातळीवरदेखील करण्यासारख्या आहेत. ते करा नि पर्यावरण समतोल राखण्यास हातभार लावा. पर्यावरणदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

Continue reading

भारत-ऑस्ट्रेलियात व्यापारवृद्धीसाठी झाली बैठक

भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये सेंद्रिय उत्पादनांवरील एमआरए, भेंडी, डाळिंब, द्राक्षे, कॉटेज चीज, मॅकॅडॅमिया नट्स, मसूर आणि एवोकॅडो यासारख्या उत्पादनांशी संबंधित बाजारपेठ प्रवेशसमस्या, प्रशुल्क दर कोटाव्यवस्था, ऑस्ट्रेलियातील औषधविषयक विशेषतः जेनेरिक औषधांचे किंमत नियंत्रण, व्हिस्की आणि वाईनच्या व्यापाराला चालना देण्याकरीता दोन्ही देशांच्या प्रतिनिधींमध्ये नुकतीच बैठक झाली. वाणिज्य सचिव सुनील बर्थवाल यांच्या...

सलमान शूटआऊट प्रकरणात छोटा शकीलचे पंटर्स?

सुमारे 15 दिवसांपूर्वी सलमान खान शूटआऊटप्रकरणी व्यक्त केलेली भीती आता हळूहळू खरी ठरत असल्याचे दिसत आहे. लॉरेन्स बिष्णोई याच्या पंटर्सनी हल्ला केल्याची जबाबदारी घेतली असल्याचे जाहीर झाले असले तरी लॉरेन्सचा मुंबईत बेस नाही. मुंबईत बेस नसल्याने तो अन्य टोळ्यांचे...

येत्या बुधवारी ‘सीहॉक्स’ हेलिकॉप्टर्स, भारतीय नौदलात!

भारतीय नौदलाच्या ताफ्यात आयएनएस गरुड, कोची येथे येत्या बुधवारी, 6 मार्चला एमएच 60 आर सीहॉक (ब्लॅकहॉक हेलिकॉप्टरची सागरी आवृत्ती) हे नवीन बहुउद्देशीय हेलिकॉप्टर दाखल होणार आहे. भारताच्या संरक्षणविषयक आधुनिकीकरणाच्या प्रवासात हा एक महत्त्वाचा क्षण ठरणार आहे. भारतीय नौदलात या हेलिकॉप्टर्सचे पथक, 'आयएनएएस 334' या नावाने कार्यरत होणार...
Skip to content