विलेपार्ले हे मुंबईच्या कलेचे माहेरघर आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. येथे अनेक ज्येष्ठ-श्रेष्ठ संस्था कार्यरत असल्यामुळे साहित्य, शास्त्र, मनोरंजन अशा कार्यमांची रेलचेल चालू असते. त्यापैकीच ‘विलेपार्ले कल्चरल सेंटर’ या संस्थेच्या वतीने विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन पार्लेकरांसाठी केले जाते. या वर्षीही विलेपार्ले कल्चरल सेंटर आणि विश्व भरारी फाउंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने. ‘.. ते ही देखे कवी’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. प्रमुख अतिथींच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष गुरुदेव विद्यावाचस्पती डॉ. शंकरराव अभ्यंकर, आमदार पराग अळवणी, माजी नगरसेविका ज्योती अळवणी व इतर मान्यवर उपस्थित होते.
पराग आळवणी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या या कार्यक्रमाचे उत्तम आयोजन नियोजन करून त्याला पूर्ण रूप देण्याचे कार्य आयोजक विनीत गोरे तसेच विश्व भरारी फाउंडेशनच्या अध्यक्ष लता गुठे, सचिव प्रकाश राणे यांनी केले. दीनानाथ नाट्यगृहाच्या आवारात असलेल्या नवनिर्मित पुस्तकालयाचे लोकार्पण प्रसिद्ध लेखिका मोनिका गजेंद्रगडकर व आमदार अळवणी यांच्या हस्ते करण्यात आले. मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने निमित्ताने एका काव्य संमेलनाचेही आयोजन केले होते. यामध्ये दिग्गज कवींची कविता आणि स्वतःची एक कविता अशा कवितांचे सादरीकरण करण्यात आले. यात लता गुठे, प्रकाश राणे, डॉ. मंजुषा कुलकर्णी, ऋजुता देशमुख आणि पुष्कर श्रोत्री यांनी कविता सादर केल्या. या कवितांना श्रोत्यांची उत्तम दाद मिळाली.
यानंतर प्रमुख पाहुण्यांची मनोगते आणि सम्नान, सत्कार सोहळा पार पडला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक लता गुठे यांनी केले. आमदार अळवणी यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण असलेला भाग म्हणजे, डॉ. अभ्यंकर यांचे, सावरकरांचे मराठी भाषेसाठी असलेले योगदान, यावरील प्रवचन होय. शंकररावांनी प्रेक्षकांची केवळ मनेच जिंकली नाहीत तर मराठी भाषेचे स्फुंलिंग प्रत्येकाच्या मनात प्रज्वलित केले. उत्स्फूर्त काव्य लेखन स्पर्धा त्याच दिवशी घेण्यात आली. या स्पर्धेमध्ये 40पेक्षा जास्त कवींनी सहभाग घेतला. ‘आत्मनिर्भर भारत’ व ‘माझी माती माझा देश’ हे आयत्यावेळी स्पर्धेसाठी विषय दिले होते. स्पर्धेमध्ये विजयी झालेल्या कवींचा पुरस्कार वितरण समारंभ प्रमुख अतिथींच्या हस्ते झाले .
मध्यंतरानंतर प्रसिद्ध गीतकारांच्या गाण्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये गायक मंदार आपटे आणि गायिका अर्चना गोरे यांनी गाणी सादर केली. कुसुमाग्रज यांच्या प्रसिद्ध गाण्याने त्यांना मानवंदना देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रेयसी वझे व विनीत गोरे यांनी केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थितीत असलेल्या रसिक श्रोत्यांचा भरभरून प्रतिसाद मिळाला.