भारताला सागरी दहशतवादापासून उद्भवणारे नवीन धोके असून समुद्रामध्ये होणारी चाचेगिरी आणि अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी नवनवीन आव्हाने समोर येत असली तरीही त्यांना निष्प्रभ करण्याची भारतीय नौदलात ताकद आहे, असे ठाम मत नौदलाच्या पश्चिम मुख्यालयाचे प्रमुख, व्हाईस अॅडमिरल दिनेश त्रिपाठी यांनी शुक्रवारी मांडले.
भारतीय नौदल दरवर्षी 04 डिसेंबर रोजी नौदल दिन साजरा करते. सन 1971च्या भारत-पाक संघर्षादरम्यान, भारतीय नौदलाच्या नौकांनी कराची बंदरात शत्रूंच्या नौकांवर प्राणघातक क्षेपणास्त्र हल्ला केला. ज्यामुळे बंदर पेटले आणि शत्रूच्या अनेक युद्धनौका नष्ट झाल्या होत्या. या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हा नौदल दिन साजरा करण्यात येतो. या पार्श्वभूमीवर माध्यमांच्या विविध प्रश्नांची उत्तरे देत, व्हाइस अॅडमिरल त्रिपाठी यांनी नौदल दिनानिमित्त सिंधुदूर्ग येथे भारतीय नौदलाच्या आगामी ऑपरेशन डेमो, किनारी सुरक्षा, सायबर सुरक्षा, अग्निवीर, समुद्रातून अंमली पदार्थांच्या तस्करीविरुद्धचा लढा, नौदलातील महिलांसाठी भूमिका आणि जबाबदाऱ्या, स्वदेशी युद्धनौकांचे उत्पादन आदी विविध बाबींवर स्पष्टता केली.
भारतीय समुद्रात शत्रूंकडून होणारा कोणताही लष्करी हल्ला रोखण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. सागरी दहशतवादापासून उद्भवणाऱ्या नवीन धोक्यांमुळे आणि खोल समुद्रांमध्ये होणारी चाचेगिरी आणि नार्को तस्करीशी लढणे ही नवीन आव्हाने आहेत. राष्ट्रीय सागरी मालमत्तेचे संरक्षण करण्यासाठी समुद्रातील आव्हानांना तोंड देण्याची आमची तयारी आहे, याचा त्रिपाठी यांनी ‘आयएनएस चेन्नई’ या युद्धनौकेवर माध्यमांशी बोलताना पुनरुच्चार केला.
भारतीय नौदलाला भारतीय शिपयार्ड्समध्ये गेल्या नऊ वर्षांत 21 युद्धनौका आणि पाच पाणबुड्या तयार केल्याचा अभिमान आहे. येथील शिपयार्ड्समध्ये निमार्णाधीन 65 जहाजे आणि पाणबुड्यांसह 1.15 कोटी रुपयांचे 12 नौकांचे बांधणी करारही पूर्ण केले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
भारतीय नौदलाची आणि जागतिक अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाच्या सागरी मार्गांची सुरक्षा सुनिश्चित करण्यात नौदल निर्णायक आहे. आम्ही आमच्या सागरी क्षेत्रावर परिणाम करणाऱ्या गैर-राज्य घटकांच्या धमक्यांच्या ट्रेंड आणि पॅटर्नचे निरीक्षण करत आहोत, जे दररोज खेळले जात आहेत आणि चाचणीचीही मयार्दा आहे. भारतीय नौदल समुद्रावरून होणारे कोणतेही लष्करी साहस आणि आमच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करणे व आमच्या राष्ट्रीय हितसंबंधांचे उल्लंघन रोखण्यासाठी सज्ज आणि सतर्क आहे, असेही पश्चिम नौदल कमांड प्रमुख म्हणाले.