बृहन्मुंबई महानगरपालिकेचा पुष्पोत्सव (Flowershow-२०२४) अत्यंत दिमाखात साजरा झाला. विविध वृक्षप्रेमी, विद्यार्थी, बॉलिवूडमधील ख्यातनाम अभिनेते व इतर क्षेत्रातील मान्यवर यांच्यासोबतच जवळपास १.५ लाख मुंबईकरांनी या प्रदर्शनास भेट दिली. सर्वच वयोगटातील निसर्गप्रेमींनी या त्रिदिवसीय सोहळ्याचे तोंड भरून कौतुक केले आणि निसर्गाच्या विविधतेचा मनमुराद आनंद लुटला. तरुणाईद्वारे social media वरदेखील बहुसंखेने फोटो व रीलदेखील काढले गेले.
याच पुष्पोत्सवाचा दुसरा अंक म्हणजेच “उद्यान विद्या विषयक कार्यशाळा (Workshop on Horticulture) याचे आयोजन उद्यापासून ०९ फेब्रुवारी ते ११ फेब्रुवारीपर्यंत वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणीसंग्रहालय (Mumbai Zoo) म्हणजेच पूर्वाश्रमीच्या राणी बागेतील ३-डी सभागृहात होणार आहे. यासाठी व्याख्याते म्हणून संबंधित क्षेत्रातील शास्त्रज्ञ, प्राध्यापक, व अनुभवी तज्ञ दर्जाचे मंडळी शिकवणी देणार आहेत.
मुबईतील नागरिकांना झाडांचे, पर्यावरणाचे महत्त्व व जागरूकता निर्माण करणे तसेच इच्छुक नागरिकाना या कार्यशाळेतील विविध विषयांद्वारे मूलभूत शिकवण देणे हा उद्देश डोळ्यांसमोर ठेवून या कार्यशाळेचे आयोजन केले जाते. याकरिता नाममात्र १०००/- इतके शुल्क आकारले जाणार आहे. यावर्षीदेखील बॉन्साई बनविण्याचे तंत्र, मियावाकी पद्धतीची वृक्ष लागवड, वर्टिकल गार्डनिंग, किचन गार्डनिंग व बाल्कनीतील झाडांची जोपासना, आयुर्वेद आणि जीवनशैली इत्यादी विषयांवर ही कार्यशाळा आयोजित केली जाणार आहे.
नोंदणीकरिता नागरिक थेट राणी बागेतील कार्यालयात संपर्क करू शकतात अथवा उद्यान खात्याचे अधिकारी सहाय्यक उद्यान अधीक्षक अमित करंदीकर (मोबाईल नंबर – 9323163622) व उद्यान विद्या सहाय्यक प्रतिभा ठाकरे (मोबाईल नंबर – 8692030699) यांच्याशी संपर्क करून मार्गदर्शन प्राप्त करू शकतात. या कार्यशाळेत सहभागी होणाऱ्यांना महानगरपालिकेद्वारे प्रशस्तीपत्रदेखील देण्यात येईल. त्यामुळे या संधीचा फायदा जास्तीतजास्त नागरिकांनी घ्यावा असे आवाहन उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी केले.