Friday, December 13, 2024
Homeपब्लिक फिगरराष्ट्रवादीचे आता 'एकच...

राष्ट्रवादीचे आता ‘एकच लक्ष्य विधानसभा क्षेत्र’!

लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या थोडक्या अपयशानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने आता कंबर कसली असून विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित केले आहे. ‘एकच लक्ष्य विधानसभा क्षेत्र’ हे घोषवाक्य घेत प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी येत्या १९ ते २१ जूनदरम्यान अहमदनगरमधून राज्यव्यापी दौरा सुरू करण्याची घोषणा आज मुंबईत झालेल्या एका पत्रकार परिषदेत घोषणा केली.

सलग तीन दिवसांच्या या दौऱ्यादरम्यान वेगवेगळ्या राजकीय लोकांचे पक्षप्रवेशही होणार आहेत. शिवाय नगर जिल्ह्यातील नगर शहर, कोपरगाव, अकोले या विधानसभा मतदारसंघाचा तसेच दक्षिणनगर आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघाचा आढावाही तटकरे घेणार आहेत. लोकसभेच्या अधिवेशनात सुरुवातीचा सदस्यत्वाच्या शपथेचा कालावधी सोडता उर्वरित कालावधी महाराष्ट्रामध्ये संघटनेची पुनर्बांधणी विशेष करुन ज्या-ज्या मतदारसंघात राष्ट्रवादीचे विद्यमान सदस्य आहेत त्या मतदारसंघाचा संघटनात्मक व्यापक दौरा करण्याचे वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी जाहीर केले होते. त्यानुसार या दौऱ्याची घोषणा त्यांनी आज केली.

४० वर्षांत लोकसभा निवडणुका जवळून पाहिल्या आणि लढल्या आहेत. पाच वेळा विधानसभा निवडणुकीला सामोरे गेलो आहे. प्रत्येक निवडणूक एक वेगळे परिमाण घेऊन येत असते. २००४, २००९, २०१४, २०२४ची निवडणूक असेल या निवडणुकीची वेगळी समीकरणे राहिली आहेत. तर विधानसभेलाही वेगळी समीकरणे पाहयला मिळाली असेही त्यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्रात आलेले कौल बघितले तर महायुतीला जे अपेक्षित यश अभिप्रेत होते ते आम्ही मिळवू शकलो नाही, हे निर्विवाद सत्य आहे. जनतेने दिलेला कौल स्वीकारला आहे. अल्पसंख्याक व मागासवर्गीय समाज, आदिवासी समाज या निवडणुकीत आमच्यापासून दूर गेलेला दिसला. या सर्वच घटकांशी राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप मतदानासाठी नव्हे तर विचाराच्या माध्यमातून राज्याच्या वेगवेगळ्या भागात त्या-त्या पक्षाशी जोडले गेले होते. मात्र शेतकऱ्यांच्या मनात कांदा, सोयाबीन, कापूस हे सर्व प्रश्न एकाचवेळी निर्माण झाले आणि त्याचा परिणाम म्हणून लोकसभेच्या निवडणुकीत आम्ही अपेक्षित यश मिळवू शकलो नाही. याही गोष्टींची जाणीव असल्याचे तटकरे यांनी सांगितले.

लोकसभा निवडणुकीत वेगवेगळे मतदान होत असते आणि विधानसभेला वेगळे होत असते. या निवडणुकीच्या माध्यमातून जे काही अनुभवायला मिळाले त्यावरून सखोल विचार आम्ही करणार आहोत. राज्यात झालेल्या लोकसभा निवडणूक निकालाचे सूक्ष्मपणाने अवलोकन केले आहे. बारकावेही समजून घेतले आहेत. प्रादेशिक विभागात घडलेल्या निकालाचा विचारही केला. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत प्रकर्षाने काम करणार आहोत असे सूतोवाचही त्यांनी केले.

गेले सात-आठ दिवस जाणीवपूर्वक राष्ट्रवादीच्या आमदारांच्याबाबत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. लोकसभा निवडणुकीत एक नकारात्मक भावना निर्माण करण्यात आली. काही ठिकाणी सहानुभूती बोलण्यात आली. ती असू शकते ते नाकारत नाही. ती निवडणूकीपुरती सीमित असते. १९८४, १९८९, १९९०, १९९१, १९९५, १९९६, १९९८, अशा कालावधीत कसे चित्र बदललेले दिसले, असेही त्यांनी सांगितले.

आमच्या कार्यकर्त्यांच्या मनात उत्साह आहे, आत्मविश्वास आहे. निवडणूकीत आलेल्या अपयशामुळे फार कुणी आत्मविश्वास गमावलेला नाही. विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर अजित पवार यांच्या राज्यव्यापी दौर्‍याचे नियोजन करत आहोत असेही सुनिल तटकरे यांनी जाहीर केले.

या निवडणुकीत एक बाब प्रकर्षाने जाणवली की, निवडणुकांची तारीख जशी जवळ आली तसा अजितदादांना टार्गेट करण्याचा प्रयत्न झाला. त्यासाठी एक विशेष मोहीम जाणीवपूर्वक राबवण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यात यश आले असेल. मी नाकारत नाही किंवा ती बाजू समजावण्यात आम्ही कमी पडलो. या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून आता काम करत आहोत हेही त्यांनी सांगितले.

नगरला जो काहींचा वर्धापन दिन साजरा झाला त्यात डॉक्टर, वकील जितेंद्र आव्हाड यांचे भाषण ऐकले. त्यांनी चारवेळा पवारसाहेबांनी अजितदादांना वेडं बनवले असे वक्तव्य केले. जे आम्ही सांगत आलो तेच म्हणजे २०१४, २०१६, २०२२मध्ये भाजपसोबत जायचे हे ठरले होते, त्यावर डॉक्टरांनी शिक्कामोर्तब केले. त्याबद्दल तटकरे यांनी त्यांचे उपरोधिकपणे आभार मानले.

या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव, प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे, संजय तटकरे उपस्थित होते.

Continue reading

कामगारमहर्षी आंबेकर बुध्दिबळ स्पर्धेत अंशुमनला चकवून ध्रुव गटविजेता

मुंबईच्या राष्ट्रीय मिल मजदूर संघ, महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघ व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित कामगार महर्षी गं. द. आंबेकर स्मृती १४ वर्षांखालील बुध्दिबळ स्पर्धेत आंतरराष्ट्रीय फिडे गुणांकित ध्रुव जैनने (३.५ गुण) पांढऱ्या मोहरांनी खेळणाऱ्या अपराजित अंशुमन समळला (३.५)...

हौशी नाट्यस्पर्धेच्या अंतिम फेरीत ‘पाकीट’ व ‘लिअरने जगावं की मरावं?’

63व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धेत मुंबई- 1 केंद्रातून पोलीस पत्नी एकता मंच, मुंबई या संस्थेच्या `पाकीट' या नाटकाला प्रथम पारितोषिक तसेच धाकूशेठ पाडा सेवा मंडळ, मुंबई या संस्थेच्या 'लिअरने जगावं की मरावं?' या नाटकास द्वितीय पारितोषिक जाहीर झाल्याची...

‘मॅट’च्या ३३ वर्षांतल्या पहिल्याच लोक अदालतीत १२६ अर्जदारांना शासकीय नोकरी

महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या (मॅट) इतिहासात ३३ वर्षांत झालेल्या पहिल्याच लोक अदालतीत तीन प्रकरणात तडजोड झाल्याने १२६ अर्जदारांना शासकीय नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जलसंधारण विभागाच्या १७१ आणि कृषि विभागाच्या २१८ जागा माजी सैनिकांसाठी आरक्षित होत्या. यामध्ये सर्व जागांसाठी...
Skip to content