विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष क्षेत्रांसाठी केंद्र सरकारने “राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार” जाहीर केला आहे. या पुरस्कार समूहासाठी 14 जानेवारी 2024 ते 28 फेब्रुवारी 2024 या कालावधीत गृह व्यवहार मंत्रालयाच्या पुरस्कार पोर्टलवर (https://awards.gov.in/) नामांकने मागवण्यात आली आहेत.
संशोधक, तंत्रज्ञ आणि नवोन्मेषक यांच्या वैज्ञानिक, तंत्रज्ञानाने परिपूर्ण आणि सृजनशील अशा उत्कृष्ट आणि प्रेरणादायी योगदानासाठी राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात येतो. विज्ञान, तंत्रज्ञान आणि तंत्रज्ञानाने परिपूर्ण नवोन्मेष अशा विविध क्षेत्रातील व्यक्ती किंवा संघांकडून राष्ट्रीय विज्ञान पुरस्कारा (RVP) साठी नामांकन/अर्ज मागवले जातात.
पुढीलपैकी चार श्रेणीमध्ये पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.
I. विज्ञान रत्न (VR): विज्ञान आणि तंत्रज्ञानासाठी जाहीर क्षेत्रातील आयुष्यभरातली कामगिरी आणि योगदान यांचा सन्मान करण्यासाठी जास्तीत जास्त तीन पुरस्कार बहाल केले जातील.
II. विज्ञान श्री (VS): विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील विशिष्ट योगदानाचा सन्मान करण्यासाठी जास्तीत जास्त 25 पुरस्कार दिले जातील.
III. विज्ञान युवा शांती स्वरूप भटनागर (VY-SSB) पुरस्कार: विज्ञान आणि तंत्रज्ञानासाठी जाहीर क्षेत्रात असामान्य योगदान देणाऱ्या तरुण शास्त्रज्ञांचा सन्मान करण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी जास्तीत जास्त 25 पुरस्कार दिले जातील.
IV. विज्ञान संघ (VT) पुरस्कार: तीन किंवा अधिक वैज्ञानिक/संशोधक/संशोधकांचा समावेश असलेल्या संघाला जास्तीत जास्त तीन पुरस्कार दिले जाऊ शकतात ज्यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञानासाठी जाहीर क्षेत्रात असामान्य सांघिक योगदान दिले आहे.
राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार खालील 13 विद्याशाखांसाठी दिला जाणार आहे, त्या पुढीलप्रमाणे:-
भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जैविक विज्ञान, गणित आणि संगणक विज्ञान, वसुंधरा विज्ञान, औषधनिर्मिती, अभियांत्रिकी विज्ञान, कृषी विज्ञान, पर्यावरणीय विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष, अणु ऊर्जा, अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञान, आणि अन्य.
सामान्य मार्गदर्शक तत्त्वे आणि RVP तपशील पुरस्कार पोर्टलवर उपलब्ध आहेत. विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेद्वारे (CSIR) यावर्षी पुरस्कारांचे समन्वयन केले जात आहे.
11 मे 2024 रोजी (राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन) पुरस्कारांची घोषणा केली जाईल. सर्व श्रेणीतील पुरस्कारांसाठी 23 ऑगस्ट 2024 रोजी (राष्ट्रीय अंतराळ दिन) पुरस्कार सोहळा आयोजित केला जाईल.