मुंबई मोनोरेल भविष्यासाठी अधिक सुरक्षित, जलद आणि विश्वासार्ह बनवण्याच्या उद्देशाने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) येत्या 20 सप्टेंबर 2025पासून मोनोरेलची सेवा काही काळासाठी तात्पुरती स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. या काळात, नवीन “रोलिंग स्टॉक” (रॅक), प्रगत सीबीटीसी सिग्नलिंग सिस्टम आणि जुन्या रॅकचे नूतनीकरण जलदगतीने केले जाईल. अलीकडच्या काळात मोनोरेल दोनदा अचानक बंद झाल्याच्या घटना घडल्या, ज्यामध्ये अनेक प्रवासी अडकून पडले होते. तासन्तासांच्या कठोर परिश्रमानंतर या प्रवाशांना वाचवण्यात आले होते. यामुळेच हा निर्णय घेण्यात आला. या काळात, चेंबूर ते संत गाडगे महाराज चौकापर्यंत दोन्ही दिशांना मोनोरेल सेवा बंद राहतील. नागरिकांना त्यांच्या प्रवासाचे नियोजन करताना हे लक्षात ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
जागतिक दर्जाची सिग्नलिंग सिस्टम
हैदराबादमध्ये विकसित केलेली स्वदेशी संप्रेषण आधारित ट्रेन नियंत्रण (सीबीटीसी) प्रणाली पहिल्यांदाच मुंबई मोनोरेलमध्ये स्थापित केली जाईल.
33 ठिकाणी 5 इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग बसवले आहेत, चाचणी सुरू आहे.
260 वाय-फाय ॲक्सेस पॉइंट्स, 500 आरएफआयडी टॅग, 90 ट्रेन डिटेक्शन सिस्टीम आणि अनेक डब्ल्यूएटीसी युनिट्स आधीच बसवण्यात आले आहेत.
वेसाईड सिग्नलिंगचे काम पूर्ण झाले आहे, एकात्मिक चाचणी सुरू आहे.
ही प्रणाली सुरक्षितता वाढवेल, ट्रेनमधील अंतर कमी करेल आणि सेवा अधिक विश्वासार्ह बनवेल.
रोलिंग स्टॉकचे आधुनिकीकरण
मेसर्स मेधा आणि एसएमएच रेल यांच्या सहकार्याने 10 नवीन “मेक इन इंडिया” रेक खरेदी केले आहेत. यापैकी 8 रेक वितरित करण्यात आले आहेत, 9वा तपासणीसाठी सादर करण्यात आला आहे आणि 10वा असेंब्ली टप्प्यात आहे.

मोनोरेलचे तात्काळ निलंबन का आवश्यक आहे?
सध्या सेवा सकाळी 6.15 ते रात्री 11.30पर्यंत चालतात, रात्रीच्या कामासाठी फक्त 3.5 तास शिल्लक राहतात. सुरक्षा प्रोटोकॉलनुसार, दररोज पॉवर रेल बंद, डिस्चार्ज आणि रिचार्ज करावे लागतात, ज्यामुळे प्रगती मंदावत होती.
नवीन रेक आणि सिग्नलिंग सिस्टमची स्थापना, कमिशनिंग आणि चाचणी सतत केली जाईल.
जुन्या रेकची दुरुस्ती आणि रेट्रोफिटिंग केली जाईल.
तांत्रिक कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे आणि आगामी मेट्रो प्रकल्पांसाठी पुनर्नियुक्ती करणे शक्य होईल.
अलिकडेच काही तांत्रिक समस्यांमुळे सेवांवर परिणाम झाला होता. त्यावर मात करण्यासाठी, एमएमआरडीएने एक चौकशी समिती स्थापन केली आहे आणि सेवा तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
भविष्यात मोनोरेल सेवा अधिक गतिमान करण्यासाठी हा निर्णय घेण्यात येत असल्याचे एमएमआरडीएने स्पष्ट केले आहे. अपग्रेडनंतर, मोनोरेल केवळ अधिक विश्वासार्हच नाही तर मुंबईच्या पूर्व कॉरिडॉरमध्ये सार्वजनिक वाहतूकदेखील मजबूत करेल.
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि एमएमआरडीएचे अध्यक्ष एकनाथ शिंदे म्हणाले की, “मोनोरेलचा हा ब्लॉक मुंबईच्या वाहतूक पायाभूत सुविधा मजबूत करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे. नवीन रेक, प्रगत सीबीटीसी सिग्नलिंग आणि जुन्या रेकचे नूतनीकरण नागरिकांना अधिक सुरक्षित आणि अधिक विश्वासार्ह सेवा प्रदान करेल. काम जलद आणि अचूकतेने पूर्ण करण्यासाठी हा छोटा ब्लॉक आवश्यक आहे. मुंबईकरांच्या पाठिंब्याने, मोनोरेल पुन्हा मजबूत होईल.”
महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी, म्हणाले की, “हा तात्पुरता ब्लॉक एक विचारपूर्वक उचलले पाऊल आहे. नवीन रेक जोडणे, प्रगत सीबीटीसी सिग्नलिंग बसवणे आणि विद्यमान ताफ्याचे नूतनीकरण करणे यामुळे मोनोरेल अधिक सुरक्षित, अधिक विश्वासार्ह आणि भविष्यासाठी सज्ज होईल. आम्ही नागरिकांच्या संयमाचे कौतुक करतो आणि आश्वासन देतो की, जेव्हा मोनोरेल परत येईल तेव्हा ती मुंबईला आणखी चांगल्या प्रकारे सेवा देईल.”