मुंबईतील २६/११चे जीवघेणे हल्ले, बेछूट गोळीबार, परिणामी शेकडो निष्पाप लोकांना, पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना आपण गमावले आहे. कोट्यवधींचे आर्थिक व सामाजिक नुकसान, अंगावर काटा आणणारी दृष्य, अंगाचा थरकाप करणाऱ्या अनेक घटना घडल्याचे सर्वश्रुत आहेच. या साऱ्या भयानक परिस्थितीचे विदारक चित्र आपल्यासमोर पुन्हा का मांडले जातेय, याचाही तुम्ही विचार करत बसणार. परंतु गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह राज्य व देशात चालू असलेल्या काही घटना गंभीरपणे विचार करायला लावणाऱ्या आहेत. तर काही गोष्टी पुन्हा एकदा तसाच थरकाप उडवणारे प्रसंग उद्भवले जातील की काय, जणू याचीच भीती वाटली गेल्यास आश्चर्य वाटू नये. राहून राहून असेही वाटते आहे की, मुंबई पुन्हा दहशतवाद्यांच्या रडारवर येते की काय, याच भीतीचा गोळा पोटात उठला गेल्यास नवल ते कसले?
त्यातला एक भयंकर भीतीदायक प्रकार म्हणजे मुंबई विमानतळ बॉम्बने उडवून देण्याची धमकी नुकतीच मुंबई पोलिसांना मिळाली आहे. त्या बदल्यात एक दशलक्ष डॉलर्सची मागणी करण्यात आली आहे. या प्रकारामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. ४८ तासात बॉम्बने मुंबई विमानतळ उडवून दिले जाईल, अशी धमकीही पोलिसांना पाठवलेल्या ई-मेलमध्ये नमूद आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांची झोप उडाली असून त्या संबंधीचा सर्वत्र कसून तपास केला जात आहे.
मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टच्या फीडबॅक इनबॉक्समध्ये हा धमकीचा ई-मेल पाठवण्यात आला आहे. त्यामुळे पोलिसांची पुरती तारांबळ उडाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल २वर सदरचा बॉम्बस्फोट घडविला जाईल. जर आम्हाला बिटकॉईनमध्ये एक दशलक्ष डॉलर्स पाठवले तर बॉम्बस्फोट थांबवला जाऊ शकतो, असेही त्यात म्हटले आहे. ज्या आईपी ॲड्रेसचा वापर करुन सदर धमकीचा ई-मेल पाठवण्यात आला आहे, त्याचा कसून शोध घेतला जात आहे. सदर व्यक्तीची लवकरच ओळख पटली जाईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. तरीही भीतीची टांगती तलवार तशीच लटकत आहे एव्हढे मात्र खरे.
दुसरीकडे ताज हॉटेलमधून तब्बल १५ लाख लोकांचा डेटा लिक झाल्याची माहिती आयएएनएसने दिली आहे. त्या बदल्यात हॅकरने मोठी खंडणी मागितल्याचे समोर आले आहे. सध्या ताज हॉटेल चालवणाऱ्या इंडियन हॉटेल्स लिमिटेड कंपनीने त्याचा तपास सुरू केला आहे. लिक झालेला सर्व डाटाच्या बदल्यात Dnacookies’ नावाने ट्विटर हॅंडल चालवणाऱ्या व्यक्तीने कंपनीकडे ५०० डॉलरची खंडणी मागितली आहे. लिक झालेल्या डाटामध्ये ग्राहकांचा डेटा, मेंबरशिप आयडी, मोबाईल नंबर्स आणि इतर वैयक्तिक माहितीचा समावेश आहे. त्यामुळे हा डाटा व्हायरल होणे किंवा त्याचा चुकीच्या पद्धतीने वापर होणे सर्वात घातक ठरू शकते. दरम्यान, हा डाटा चालविणाऱ्या व्यक्तीकडून असेही सांगण्यात आले आहे की, सन २०१४ ते २०२०पर्यंतचा सर्व डाटा उपलब्ध आहे. तथापि लिक झालेला हा सर्व डाटा हॅकरने आतापर्यंत कुठेही लिक केलेला नाही परंतु खंडणीची रक्कम न दिल्यास सदर डाटाचा वापर चुकीच्या पद्धतीने केला गेल्यास मात्र गंभीर परिस्थिती उद्भवली जाऊ शकते. त्यामुळेच दक्षतेने पुढील प्रक्रिया सुरू आहे.
काही दिवसांपूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी या दोघांनाही बॉम्बने उडवून ठार केले जाईल, अशी खुलेआम धमकी देण्यात आली आहे. पोलिसांनी धमकी देणाऱ्या आरोपीला नंतर पकडल्याचे समजते; तर तिकडे महाराष्ट्राचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार या दोघांनाही जीवे ठार मारले जाईल, अशी धमकी एका विदर्भवाद्याने दिली आहे. याप्रकरणी स्थानीय भाजपा पदाधिकाऱ्यांनी सदर व्यक्तीविरोधात राजुरा पोलीसठाण्यात गुन्हा नोंदविल्याचे समजते.
सध्या महाराष्ट्रात मराठा समाजाला ओबीसीमधून कुणबी आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या जाहीर सभांचा सर्वत्र धुमधडाका सुरू आहे. प्रारंभी सुरू केलेले आमरण उपोषण राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विनंतीने सोडविले गेले. अर्थात याप्रकरणी शिंदे यांच्या या प्रयत्नांना मंत्रीमंडळ व सर्वपक्षीय नेत्यांचा पाठिंबा आहे. दरम्यान, सदर मराठा समाजाला ओबीसीमधून कुणबी आरक्षण देण्यासाठी २४ डिसेंबरपर्यंतची मुदत सरकारनेच मागून घेतली आहे. मात्र २४ डिसेंबरपर्यंत आरक्षण न मिळाल्यास राज्याची राजकीय व देशाची आर्थिक राजधानी मुंबई महानगरीचा श्वास बंद केला जाईल, असा निर्वाणीचा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे. जरांगे पाटील यांच्या आंदोलनाने बऱ्यापैकी धार पकडली आहे. याची कबुलीही बहुतेक मंत्रीच देत आहेत. तथापि काही ओबीसी नेते जरांगे पाटील यांच्या मागणीला विरोध करीत आहेत. त्यामुळे परिस्थिती तणावपूर्ण असल्याचे दिसतेय. एकूणच काय तर मुंबई पुन्हा रक्तरंजित होतेय की काय?
दूरध्वनी- +91 98601 17592