संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासोबत भारत-अमेरिका 2+2 मंत्रीस्तरीय चर्चेचे सह-अध्यक्षपद भूषवण्यासाठी आणि द्विपक्षीय बैठकीसाठी अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉयड ऑस्टिन कालपासून भारत दौऱ्यावर आहेत. ऑस्टिन यांचे 09 नोव्हेंबर रोजी नवी दिल्लीत आगमन झाल्यानंतर, पालम तांत्रिक परिसरात तिन्ही सेना दलाकडून मानवंदना देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. आज भारत-अमेरिका यांच्यात मंत्रीस्तरीय द्विपक्षीय चर्चा होत आहे.
अमेरिकेचे संरक्षणमंत्री ऑस्टिन आणि परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन 10 नोव्हेंबर रोजी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांच्यासह मंत्रिस्तरीय 2+2 चर्चेचे सह-अध्यक्ष भूषवतील. त्यानंतर ऑस्टिन आणि भारताचे संरक्षण मंत्री यांच्यात द्विपक्षीय बैठक होईल. 2+2 चर्चा आणि द्विपक्षीय बैठकीदरम्यान अनेक धोरणात्मक, संरक्षण आणि तंत्रज्ञान मुद्द्यांवर चर्चा होण्याची अपेक्षा आहे. यापूर्वी ऑस्टिन यांनी जून 2023 मध्ये भारत दौऱ्यावर आले होते आणि त्यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली होती.