काही राज्यांच्या इतिहासात डोकावले की काही नेत्याची अमिट अशी छाप दिसून येते. त्यांचं व्यक्तिमत्व लोक विसरू शकत नाहीत. भले मग त्यांचं स्मारक असो वा नसो! लोकांच्या मनात मात्र ते कायम असतात, अगदी घरच्यांनी उपेक्षा केली तरी! यातीलच एक शेजारच्या राज्यातील जनमानसातील मुख्यमंत्री मनोहर गोपालकृष्ण प्रभू पर्रिकर हे होत. देशाचे संरक्षण मंत्रीपद जवळपास दोन वर्षे भूषवताना त्यांनी अनेक महत्त्वाचे संरक्षणविषयक करार केले. पुनः राज्याच्या सेवेत पक्षादेशामुळे दाखल झाले. पण अद्याप तिथे सत्तेत असलेल्या भाजप सरकारने त्यांच्या स्मारकाला पूर्णत्वाला नेलेलं नाही, हे दुर्दैव नाही का? पर्रिकरांचे स्मारक अजूनही उपेक्षितच राहिले.
त्यांच्या जन्म-मृत्यूच्या तारखेच्या चार नि आठचा विलक्षण मेळ पाहायला मिळतो. 13 डिसेंबर 1955 या दिनी जन्माला आलेल्या पर्रिकरांनी दीर्घकालीन आजाराने 17 मार्च 2019 रोजी इहलोकीची आपली यात्रा संपवली. त्यात त्यांचे होत असलेले हाल नि त्याच्या बातम्या पाहून लोक कळवळत होते. चारवेळा मुख्यमंत्रीपद वाट्याला आल्यानंतरही छोटयाशा राज्यातील हा नेता केंद्रीय मंत्री झाल्यावरही साधाच राहिला, डामडौल जवळ फिरकूही दिला नाही.
साधेपणा हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विशेष पैलू! त्याच्या अनेक कहाण्या आजही स्थानिक लोक, सामाजिक क्षेत्र, नेते, व्यावसायिक नि सरकारी अधिकारी मोठ्या अभिमानाने सांगतात नि या सम हाच असा गौरव त्यांच्या तोंडून निघतो. आय आय टी मुंबईचे 1978चे पदवीधर असलेल्या मनोहररावांकडे तांत्रिक तज्ज्ञता होतीच. धातूशास्त्र या थेट लष्कराशी संबंधित विभागाचा त्यांचा अभ्यास! तिचा उपयोग करत त्या मंत्रीपदाला पुरेपूर न्याय द्यायचा त्यांनी प्रयत्न केला. संरक्षणविषयक अनेक शस्त्र उपकरणाची माहिती घेत ते करारविषयक बाबींत बोलत असत, सहभाग घेत. त्यांच्या या गुणांवर आजही संरक्षण अधिकारी बोलताना दिसतात. गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून ज्या तडफेने काम केलं त्याच तडफेने त्यांनी हे मंत्रीपद सांभाळले.
संरक्षणविषयक खरेदी करार हे काही हजार कोटीच्या घरात असतात नि त्यात भ्रष्टाचार हे समीकरण तसे जुने. मात्र, गेल्या काळात खरेदीच झाली नसल्याने जगाच्या तुलनेत आपले संरक्षण दल 15 वर्षे मागे पडल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी यात लक्ष घालून बरेच नवे करार केले, जुने मार्गी लावले. आरोप होतील म्हणून काहीच करायचे नाही हे आधीच्या मंत्र्यांसारखे त्यांनी केलं नाही. स्वच्छ चारित्र्याच्या पर्रिकरांनी स्कॉर्पिअन पाणबुडी करार करून मार्गी लावलाच शिवाय निर्मितीही गतिमान केली. त्यामुळे सहापैकी पाच तयार, तीन नौदलात दाखल झाल्यात.
राफेल विमान खरेदी हा त्यातील एक. राजकारण म्हंटलं की काहीबाही आरोप होतच राहतात, तसे झालेही! स्वतःवर असलेला दृढ विश्वास नि सत्यनिष्ठा, त्यातून साधी राहणी, उच्च विचारसरणी याचे थेट प्रतिबिंब वागण्याबोलण्यात. त्यामुळे गोवेकरांना आपले वाटत राहिले, टोकाची भूमिका असलेल्या तेथील चर्चंना ते आपले वाटल्याने त्यांनी त्यांना दिलेला पाठिंबा ही तर मोठीच पोचपावती!
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिकवणुकीतून घडलेला हा कार्यकर्ता भाजपात दाखल होऊन गोवा आपलासा करत छाप उमटवून देश पातळीवर ‘कॉमन मॅन’ म्हणून ओळखला जातो, यातच त्यांच्या जीवनाचे सार दिसते. उत्तर गोवा भागात कार्य करत ते 1991च्या निवडणुकीत उतरले नि लोकसभेसाठी पराभूत झाले. पुढे 1994 सालात पणजी मतदारसंघातून लढले नि पुढे सलग चारवेळा निवडून आले. ही किमया याआधी कोणत्याच नेत्याला जमली नाही. 2000मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले. वडिलोपार्जित घरात राहणारा, देशातील पहिला आय आय टी पदवीधर, राज्यात भाजपची संघटनात्मक बांधणी करून सत्तेत नेणारा सिंहाचा वाटा असलेला नेता!
जूनमध्ये विधानसभा बरखास्त झाल्यावर 2002च्या निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपने मुसंडी मारली. यावेळी एका अपक्ष आमदाराच्या नि छोट्या पक्षाच्या पाठिंब्याने पर्रिकर पुन्हा मुख्यमंत्री झाले. 2012च्या निवडणुकीपूर्वी जनसंपर्क यात्रा काढून जनतेशी संवाद साधला.त्याच फळ म्हणून 21 आमदारांच्या पूर्ण बहुमताचं भाजप सरकार स्थापन झालं. यानंतर पेट्रोलवरील व्हॅट हटवण्याचा निर्णय केल्याने अकरा रुपयांनी ते इतरांच्या तुलनेत स्वस्त झाले होते. या निर्णयाची देशभरात चर्चा झालीच, शिवाय इतर जनहित निर्णय धडाक्याने राबवल्याने सलग तीन वर्षं योजना आयोगाने गोव्याला ‘बेस्ट गव्हर्निंग स्टेट’ हा बहुमान दिला.
पुढे 2014च्या नोव्हेंबरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना संरक्षण मंत्री केलं. त्यांच्याच काळात उरी हल्ल्याचा बदला म्हणून पाकव्याप्त काश्मिरात धडक देत भारतीय सैन्याने सर्जिकल स्राईक घडवला. पुन्हा एकदा त्यांना गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी धाडण्यात आले. मार्च 2017ला त्यांनी संरक्षण मंत्रीपदाचा राजीनामा दिला. फेब्रुवारी 2018ला स्वादुपिंडाचा कर्करोग झाल्याचे निष्पन्न झालं नि तो आजार बळावत गेला. तशाही स्थितीत ते जमेल तसा कारभार करत सरकार चालवत राहिले, पक्ष धोरणानुसार! मात्र, वर्षभरातच त्यांची झुंज संपली नि एक समर्पित नेता काळच्या पडद्याआड गेला.
अशा या नेत्याची दुसरी पुण्यतिथी आली तरी या काळात त्याचे स्मारक उभं राहू शकले नाही यापेक्षा दुर्दैव ते काय? पणजीपासून काही अंतरावर असणाऱ्या मिरामार येथे गोव्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांच्या स्मारकाशेजारी हे उभे राहत आहे. पर्रिकरांचा आदर्श मानून चालणाऱ्या नि त्यांचा वारसा सांगणाऱ्या डॉ. प्रमोद सावंत सरकारचे हे अपयश! आपल्या राजकीय कारकिर्दीत सतत गोव्याचा विचार करणाऱ्या या सुपुत्राचे स्मृतिस्थळ दोन वर्षात आकाराला येत नाही ही त्यांच्या विकासमुखी दृष्टिकोनाला मानवंदना का, अशी विचारणा होत आहे.
दरम्यान, नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार पर्रिकर समाधीच्या बेसमेंटवर सॊमवरी 15 मार्च, राजी स्लॅब टाकण्यात आला. शेजारच्या भाऊसाहेबांच्या सुशोभीकरणाचे काम पुढील वर्षापर्यंत पूर्णत्वास नेण्याचे नियोजन असल्याचे पायाभूत सुविधा विकास महामंडळ सरव्यवस्थापक संदीप चोडणेकर यांनी ही माहिती दिली. या दोन्ही कामांसाठी साडेसात कोटी रुपयांची तरतूद आहे.
गोव्यात भाजपा सरकार असून नि त्यांचे योगदान मोठे असून त्यांच्या स्मारकाकडे इतके दुर्लक्ष कसे होऊ शकते असा सवाल त्याना मानणारा वर्ग करीत आहे. त्यांच्या नावे मते मागून चालणार नाही तर त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा असे वाटत असेल तर तसे कार्यही भाजप नि सरकारकडून व्हायला हवे. निदान पुढील वर्षापर्यंत तरी हे स्मारक पूर्ण व्हावे अशी अपेक्षा व्यक्त होतेय.