Sunday, December 22, 2024
Homeडेली पल्सडॉ. आंबेडकरांचे दिल्लीतले...

डॉ. आंबेडकरांचे दिल्लीतले स्मारक बघण्यासारखेच!

कोरोनाच्या वातावरणातच दोन दिवसांपूर्वी आपण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली. डॉ. आंबेडकर ज्यांना प्रज्ञासूर्य म्हणून देश ओळखतो नि जगात भारतीय संविधानाचे निर्माते अशी ख्याती मिळाली आहे. अत्यंत अभ्यासू व्यक्तिमत्व, चौफेर व्यासंग, बुद्धीची प्रगल्भता यामुळे विविध विषयावरील पन्नासवर ग्रंथांची निर्मिती, शेकडो वृत्तपत्र लेख, समाजोध्दारासाठी झोकून दिलेले आयुष्य, भारतीय इतिहासावर अमिट छाप सोडली आहे.

त्यांचे देहावसान ज्या स्थानी झाले त्या संपूर्ण परिसराला ताब्यात घेत भारत सरकारने 2012च्या नंतर त्यांच्या राष्ट्रीय स्मारकाच्या उभारणीला प्रारंभ केला. डॉ. बाबासाहेबांचे महानिर्वाण 6 डिसेंबर 1956 रोजी दिल्लीतल्या अलीपूर रोडवरील एका बंगल्यात झाले. तिथून त्यांचे पार्थिव विशेष विमानाने मुंबईतील दादर येथील राजगृह, या त्यांच्या निवासस्थानी आणले गेले. मग दादर चौपाटी येथे अंतिम संस्कार केले गेले. त्या जागेला चैत्यभूमी म्हणून ओळखले जाते. लाखोंचा जनसमुदाय लोटलेल्या या महामानवास श्रद्धांजली देण्यास मोठ्या संख्येने अनुयायी जमा होत असतात.

डॉ. आंबेडकर यांचे वास्तव्य दिल्लीच्या या जागेवर स्मारक उभारण्यासाठी एका उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्यात आली होती. त्या समितीने 14 जून 2012 रोजी सरकारला  दिलेल्या अहवालानुसार लगतच्या जागेचे अधिग्रहण करून स्मारक काम सुरू झाले. वास्तविक बाबासाहेब ज्या अलीपूर रोड येथील बंगल्यात राहत होते तो 7374 चौमी जागेचा बंगला राजस्थान सिरोहीच्या राजाने बाबासाहेबांना भेट दिला होता. कायदामंत्री म्हणून डॉ. बाबासाहेबांनी राजीनामा दिल्यानंतर 27 डिसेंबर 1951पासून ते इथेच वास्तव्यास होते. त्यामुळे अनुयायांची ही पवित्र भेटीची जागा आहे.

या स्मारकाच्या उभारणीसाठी भारत सरकारने 99 कोटी 64 लाख रुपये उपलब्ध करून दिले. जवळपास तीस महिन्यांच्या कालावधीत हे काम पूर्ण झाले. या राष्ट्रीय स्मारकाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 14 एप्रिल 2018 रोजी होऊन राष्ट्राला समर्पित करण्यात आले. हे स्मारक स्थापत्य कलेचे अनोखे उदाहरण म्हणूनही पाहता येईल. मुख्य इमारतीची रचना एखाद्या उघड्या पुस्तकासारखी आहे. बाह्य आकार पुस्तक उघडून ठेवल्यावर जसे दिसेल तसा दिसतो. देशात अशी कलाकृती आपल्याला कुठेही पाहण्यास मिळत नाही. यात इतरही अनेक बाबी पाहण्यास मिळतात. सोयीसुविधाही दिल्या आहेत.

आंबेडकर

काय पाहाल या स्मारकात?

इथे सुमारे सव्वा कोटी रूपये खर्चून तयार केलेला डॉ. बाबासाहेबांचा जिवंत वाटणारा अनिमेट्रोनिक्स पुतळा जो एक रोबोट आहे, सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. संविधान सभेच्या बैठकीत बाबासाहेबांनी 25 नोव्हेंबर 1949 रोजी केलेल्या भाषणाचा एक भाग या यंत्रमानवाच्या तोंडून ऐकण्यास मिळतो. हे पाहता, ऐकता असं वाटतच नाही की, पुतळ्यामार्फत आपण हे भाषण ऐकत आहोत. याच्या पुढ्यात उभं राहताच हा पुतळा बिलकुल सामान्य माणसासारखा हात, ओठ नि मान हलवत सेन्सरद्वारे भाषण देणे सुरू करतो. त्यामुळे आपण हुबेहूब बाबासाहेबांना खरंखुरं भाषण देताना पाहत असल्याचे वाटते.

संग्रहालयात दृकश्राव्य भाग असून इथे बाबासाहेबांच्या जीवनातील अनेक कंगोऱ्यावर एलइडीच्या माध्यमातून लघु चित्रपट पाहता येतात. यातील संवाद ऐकण्यासाठी हिंदी-इंगजी भाषेचा वापर करता येतो. इतकेच नव्हे तर स्मार्ट फोन असणाऱ्यांसाठी एक ऑडिओ मोबाईल एप असून मोफत वायफायद्वारे ते डाऊनलोडदेखील करता येतं. एका भागात सजीव वाटतील असे पुतळे असून आंबेडकर काळातील महत्त्वपूर्ण – ऐतिहासिक क्षण, जसे भारतीय संविधानावर सही करतानाचे क्षण पाहण्यास मिळतात.

संग्रहालयात एकूण 27 भाग असून जे भीमराव आंबेडकर यांच्या संपूर्ण जीवन कार्यासह त्यांचे नित्य वापराचे साहित्य, व्यक्तिमत्वाचे विविध पैलू समोर आणतात. यात त्यांच्याशी निगडित दस्तऐवज, नाना चित्र, लेखन करतानाचे त्यांचे भाव, त्याचबरोबर जन्मस्थान, शाळा, महाविद्यालय, त्यांचा प्रवास – आंदोलने यावर प्रकाशझोत टाकतात. बौद्ध धर्मातील भिक्खू ध्यान  किंवा अनुष्ठान काळात मनातील विशिष्ट विचाराना आवाहन करण्यासाठी ज्या हस्तमुद्रांचा उपयोग करतात त्या जलपान कक्षाच्या भिंतीवर पाहण्यास मिळतात. या 12 हस्तमुद्रांचा उल्लेख तथागत बौद्धांच्या जीवनात पाहण्यास मिळतात. बौद्ध धम्मात या मुद्रा अत्यंत पवित्र मानल्या जातात.

भित्तिचित्रे फायबर ग्लास अशापासून बनवली असून ती त्रिमितीय प्रकारात आहेत, जी मन, विचार, भावना, विश्वास परंपरा आदीसह भिंतीचे नि स्मारकाचे सौंदर्य वाढवत आहेत. इथे बाबासाहेबांच्या जीवनातील पंचतीर्थ समजल्या जाणाऱ्या चित्रांचेही दर्शन होते. संविधानाचे निर्माते स्वतः बाबासाहेब असल्याने त्याची इथे माहिती उपलब्ध असणे क्रमप्राप्त होते. यासाठी नव्या तंत्राचे इंटर ऍक्टिव्ह टेबल इथे दिले आहे. याला स्पर्श करताच ही माहिती मिळते.

सांची स्तूपाच्या पूर्वेकडील तोरणद्वाराची प्रतिकृती संग्रहालयाच्या दर्शनी भागात आहे. यात प्रतिकात्मक रूपात बुद्धदर्शन होत असते. ध्यानकक्ष स्मारकाच्या एका विशेष भागात घुमटाखाली वर्तुळाकार विभाग आहे, त्यात तथागत बुद्धाची एक मोठी सुंदरशी व्हिएतनामी पांढऱ्या संगमरावरची मूर्ती आहे. ही प्रतिमा समाधिस्त मुद्रेत असून ही मुद्रा योगी वर्गाच्या ध्यान नि एकाग्रता पद्धतीने अध्यात्मिक पूर्णत्वाच्या प्राप्तीचा मार्ग दर्शवते. स्मारकाची प्रेक्षणीयता वाढवण्यासाठी नि वातावरण सुखद बनवण्यासाठी संगीतमय फवारे असून त्यालादेखील विसरता येणं शक्य नाही. स्मारक परिसराच्या पूर्वोत्तर कोपऱ्यात एक पवित्र बोधी वृक्ष लावला आहे. तसेच उजव्या बाजूच्या रस्त्याच्या कडेने विविध फुलझाडांची बाग शोभा वाढवत आहे. राष्ट्रीय प्रतिकाच्या स्वरूपात अशोक स्तंभाला 1950 साली मान्यता देण्यात आली. त्याची स्थापना मुख्य प्रवेशदारी केली असून अकरा मीटर उंचीच्या स्तंभाच्या दर्शनाने होते. या अशोक स्तंभाच्या उभारणीनें डॉ. आंबेडकरांनी भारताच्या एकता नि अखंडतेच्या रक्षणासाठी 24 तास काम करण्याची व्यक्त केलेली प्रतिबद्धता सूचित करते.

कोरोनानंतर दिल्लीतल्या या स्मारकाला अवश्य भेट द्या. यासाठी पत्ता- 26, अलीपूर रोड, दिल्ली- 110054. संपर्क 011-23930350, 23477499, 23477662. भेटीची वेळ 12 ते 7 अशी असून प्रवेश मार्गदर्शक (गाईड) निःशुल्क आहे. या महामानवास विनम्र अभिवादन!

1 COMMENT

Comments are closed.

Continue reading

भारत-ऑस्ट्रेलियात व्यापारवृद्धीसाठी झाली बैठक

भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये सेंद्रिय उत्पादनांवरील एमआरए, भेंडी, डाळिंब, द्राक्षे, कॉटेज चीज, मॅकॅडॅमिया नट्स, मसूर आणि एवोकॅडो यासारख्या उत्पादनांशी संबंधित बाजारपेठ प्रवेशसमस्या, प्रशुल्क दर कोटाव्यवस्था, ऑस्ट्रेलियातील औषधविषयक विशेषतः जेनेरिक औषधांचे किंमत नियंत्रण, व्हिस्की आणि वाईनच्या व्यापाराला चालना देण्याकरीता दोन्ही देशांच्या प्रतिनिधींमध्ये नुकतीच बैठक झाली. वाणिज्य सचिव सुनील बर्थवाल यांच्या...

सलमान शूटआऊट प्रकरणात छोटा शकीलचे पंटर्स?

सुमारे 15 दिवसांपूर्वी सलमान खान शूटआऊटप्रकरणी व्यक्त केलेली भीती आता हळूहळू खरी ठरत असल्याचे दिसत आहे. लॉरेन्स बिष्णोई याच्या पंटर्सनी हल्ला केल्याची जबाबदारी घेतली असल्याचे जाहीर झाले असले तरी लॉरेन्सचा मुंबईत बेस नाही. मुंबईत बेस नसल्याने तो अन्य टोळ्यांचे...

येत्या बुधवारी ‘सीहॉक्स’ हेलिकॉप्टर्स, भारतीय नौदलात!

भारतीय नौदलाच्या ताफ्यात आयएनएस गरुड, कोची येथे येत्या बुधवारी, 6 मार्चला एमएच 60 आर सीहॉक (ब्लॅकहॉक हेलिकॉप्टरची सागरी आवृत्ती) हे नवीन बहुउद्देशीय हेलिकॉप्टर दाखल होणार आहे. भारताच्या संरक्षणविषयक आधुनिकीकरणाच्या प्रवासात हा एक महत्त्वाचा क्षण ठरणार आहे. भारतीय नौदलात या हेलिकॉप्टर्सचे पथक, 'आयएनएएस 334' या नावाने कार्यरत होणार...
Skip to content