मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्ताने कोकण मराठी साहित्य परिषदेच्या दादर शाखेतर्फे साहित्य अकादमी उत्कृष्ट बालसाहित्य पुरस्कार २०२३चे मानकरी सुप्रसिद्ध बाल साहित्यकार एकनाथ आव्हाड यांच्या भव्य सत्कार समारंभाचे, त्यांच्या मुलाखतीचे आणि “बाल साहित्याची सद्यस्थिती आणि भवितव्य” या विषयावरील एक परिसंवाद अशा भरगच्च साहित्यिक कार्यक्रमाचे आयोजन नुकतेच मुंबईच्या अखिल भारतीय महिला परिषद, माटुंगा (पूर्व) येथील संस्थेच्या सेवाभारती हॉलमध्ये करण्यात आले होते.
सदर सत्कार समारंभाचे अध्यक्षस्थान कोकण मराठी साहित्य परिषदेच्या केंद्रीय अध्यक्षा नमिता कीर यांनी भूषविले. समारंभास प्रमुख अतिथी म्हणून सतीश चिंदरकर, संस्थापक, अनुयोग विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय लाभले होते. दुसऱ्या अतिथी म्हणून लता गुठे, कोमसाप मुंबई जिल्हाध्यक्षा उपस्थित होत्या. निमंत्रित अतिथी म्हणून सुचेता खाडे, विभाग निरीक्षक, मुंबई मनपा शिक्षण विभाग यांचीही उपस्थिती लाभली होती. सर्वप्रथम दादर शाखा कार्यवाह मनोज धुरंधर यांनी उपस्थित मान्यवर प्रमुख अतिथी, सत्कार मूर्ती, कोमसापच्या विविध शाखांचे अध्यक्ष, दादर शाखा पदाधिकारी व समिती सदस्य आणि रसिक प्रेक्षक यांचे हार्दिक स्वागत केले. समारंभाची पुढील सूत्रे निवेदिका अंजना कर्णिक यांच्या हाती सोपविली.
तदनंतर बालसाहित्य सद्यस्थिती आणि भवितव्य यावर परिसंवाद घेण्यात आला. सदर परिसंवादात वक्ते म्हणून लता गुठे, डॉ. सुमन नवलकर व स्वतः आव्हाड यांनी सहभाग घेतला. परिसंवाद अतिशय रंगतदार झाला काही रसिक प्रेक्षकांनी आपले प्रश्न विचारले व सर्व वक्त्यांनी त्या प्रश्नांना उत्तरेही दिली. विशेषतः आव्हाड यांनी मुलांना भावलेल्या आपल्या काही कवितांचे वाचनही केले. त्यांच्या ओघवत्या शैलीने सर्व मान्यवर व रसिक प्रेक्षक अगदी भारावून गेले होते. तदनंतर आव्हाड यांची सुंदर अशी मुलाखत दादर शाखा अध्यक्षा विद्या प्रभू यांनी घेतली. विद्याताईंनी घेतलेली ही मुलाखत अशी काही रंगून गेली की सर्व रसिक प्रेक्षक अगदी भान हरपून मंत्रमुग्ध होऊन ऐकत होते. मुलाखतीतून आव्हाड यांनी आपले विचार व्यक्त करताना आपल्या बालपणीच्या, आईच्या आठवणी सांगितल्या.
भाजी विकण्यापासून ते आपले महानगरपालिकेतील शिक्षण व नंतर महापालिकामध्येच शिक्षकाची सेवा असा बालपणापासून ते आजपर्यंतचा त्यांचा सारा जीवन प्रवास उलगडून सांगितला. मुलांसाठी लिहिणे हाच माझा जगण्याचा श्वास आहे असे प्रतिपादन केले. तसेच मी हे लिहितो ते कोणत्याही पुरस्कारासाठी मी लिहिले नाही किंवा कोणीही पुरस्कारासाठी खरंतर लिहू नये तर मुलांसाठी लिहावे असे सांगितले. मुलांच्या भावविश्वातील मी लिहीत गेलो आणि विसरूनही गेलो. ते मुलांना अन् जाणकारांनाही भावले आणि मला पुरस्कार मिळाला. मी माझे नाव वा कोणताही फॉर्म या पुरस्कारसाठी भरून दिला नाही. माझ्या बाल साहित्यातील आजपर्यंत केलेल्या कार्याची दखल साहित्य अकादमी माझ्याही नकळत घेत होते व माझी या पुरस्कारासाठी निवड झाली. सरतेशेवटी आपल्या दोन कविताही त्यांनी मुलाखतीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली व रसिकांनीही त्यांच्या कवितांना भरभरून दाद दिली.