Sunday, September 8, 2024
Homeमाय व्हॉईसमुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर नशाबाजांचा...

मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर नशाबाजांचा सुळसुळाट!

मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर एल्विश यादवसारख्या विषारी नशाबाजांचा सुळसुळाट झाला असून त्यांचा शाल-श्रीफळ देऊन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आदरतिथ्य केले जाते, अशी टीका राज्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज एका ट्विटद्वारे केली.

प्रसिद्ध युट्यूब ब्लॉगर आणि बिग बॉस ओटीटीचा विजेता एल्विश यादव आणि इतर काही जणांविरूद्ध उत्तर प्रदेशातल्या पोलिसांनी रेव्ह पार्टीत सापांचे विष पुरवल्याबद्दलचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र, त्याने स्वतः याचा इन्कार केला आहे. यात एक टक्का तथ्य असले तरी सर्व जबाबदारी स्वीकारायला आपण तयार असल्याचे त्याने म्हटले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्याबरोबरची त्याची छायाचित्रे सध्या समाजमाध्यमांवर फिरत आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांच्याबरोबरचे एल्विशचे छायाचित्र समोर आल्यानंतर वडेट्टीवार यांनी असेच एक छायाचित्र देत ट्विट केले.

गणपती पूजननिमित्त राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्या एल्विश यादवला शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर बोलावून आदरतिथ्य केले होते त्याच्याविरोधात सापाच्या विषापासून ड्रग्स बनवणे, सेवन करणे आणि विकणे यासारखा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलांबाबत अपशब्द वापरणारा, विषारी ड्रग्सचे सेवन, विक्री करणाऱ्या आरोपीचे आदरतिथ्य करून मुख्यमंत्री एल्विश यादवसारख्या नशाबाज तरुणांना राज्यातील तरुणांचे रोल मॉडेल बनवण्यात हातभार लावत आहे का?, असा सवाल त्यांनी केला.

आधीच राज्यात ड्रग्जचे कारखाने सापडत आहेत. ललित पाटील शासकीय पाहुणचार झोडतो, मग पळवून लावला जातो आणि इथे वर्षावर नशाबाज आरती करतो. हे आहे महायुती सरकार… असेही त्यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे.

40 पैकी 35 दुष्काळी तालुके सत्ताधारी आमदारांचे

सरकारचा निर्णय म्हणजे शेतकऱ्यांसाठी दुष्काळात तेरावा महिना. दुष्काळ सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना खुश करण्यासाठी आहे का?, असा सवालही वडेट्टीवार यांनी आणखी एका ट्विटद्वारे केला आहे.

राज्यात चाळीस तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. परंतु हा दुष्काळ जाहीर करत असताना सरकार राजकारण करत असल्याचे निदर्शनास आले आहे. दुष्काळ जाहीर केलेल्या चाळीस तालुक्यापैकी जवळपास 33 ते 35 तालुक्यांचे आमदार सत्ताधारी पक्षाचे असून त्यात काही मंत्र्यांचेही तालुके आहेत. विरोधी पक्षातील आमदारांच्या फक्त चार ते पाच तालुक्यांचा दुष्काळी तालुक्यात समावेश केला आहे. सरकारचा शेतकऱ्यांच्या भावनेशी हा खेळ सुरू असून दुष्काळ जाहीर करताना सरकारने शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून दुष्काळ जाहीर केला की, सत्ताधारी आमदारांना खुश करण्यासाठी हा दुष्काळ जाहीर केला, असा सवाल त्यांनी केला आहे.

नशाबाजांचा

सरकारने निकषाच्या खेळात शेतकऱ्यांना भरडून राजकारण केले आहे. सरकारने दुष्काळ जाहीर करताना केलेला राजकीय भेदभाव अत्यंत खेदजनक आहे. सरकारने किमान  शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राजकारण करू नये. परंतु सरकारने तीन पक्षाच्या आमदारांना खुश ठेवण्यासाठी घेतलेले हा निर्णय शेतकऱ्यांसाठी दुष्काळात तेरावा महिना आहे. उदाहरणार्थ जत तालुक्यात टँकर सुरू असून पाण्याची प्रचंड टंचाई आहे. पण यासारख्या अनेक तालुक्यांना डावलून सरकारने हा जुलमी निर्णय घेतला आहे. या रोषातूनच जतमध्ये गाड्यांची तोडफोड केल्याचे वृत्त समोर आले आहे. सरकारचे शेतकऱ्यांवरचे बेगडी प्रेम आता उघड झाले आहे.

पीकविमा कंपन्यांचे लाड पुरविण्याचे सरकारचे धोरण शेतकऱ्यांना संकटात टाकणारे आहे. सरकारच्या चुकीच्या निर्णयामुळे शेतकरी भरडणार असून पीकविमा कंपन्यांचाच फायदा होणार आहे. सरकारने राज्यात सरसकट दुष्काळ जाहीर केला पाहिजे. अन्यथा शेतकऱ्यांचे जगणे अवघड होणार आहे. राज्यात सरसकट दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना, सामान्य माणसाला न्याय द्यावा, अशी मागणी आम्ही वारंवार केली. परंतु संवेदना गमावलेल्या सरकारने शेवटी राजकारण केलेच, अशी टीकाही विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

Continue reading

श्री गणेशोत्सवासाठी मुंबई महापालिका सज्ज

मुंबईतील श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून यंदाही विविध सोयीसुविधा पुरविण्यात आल्या आहेत. या उत्सवाकरीता मुंबई महापालिकेचे सुमारे १२ हजार कर्मचारी, ७१ नियंत्रण कक्ष तसेच अन्य विविध सोयीसुविधांसह सुसज्ज आहेत. यंदा गणेश मूर्ती विसर्जनासाठी ६९ नैसर्गिक स्थळांसह एकूण २०४ कृत्रिम...

१७५३ शेतकऱ्यांना दिवसा होणार वीजपुरवठा उपलब्ध

शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा अखंडित व भरवशाचा वीजपुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत राज्यात ९२०० मेगावॅट क्षमतेचे सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात येत असून त्यापैकी ३ मेगावॅट क्षमतेचा पहिला सौरऊर्जा प्रकल्प छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील धोंदलगाव येथे नुकताच...

श्री गणेशमूर्तीचे विसर्जन करण्याची पारंपरिक पद्धत

श्री गणेशमूर्तीचे वाहत्या पाण्यात विसर्जन करावे. विसर्जनाला जाताना श्री गणेशमूर्तीबरोबर दही, पोहे, नारळ, मोदक वगैरे शिदोरी द्यावी. जलाशयाजवळ पुन्हा आरती करावी व मूर्ती शिदोरीसह पाण्यात सोडून द्यावी. उपासनाविधींमुळे गणपतीच्या पवित्रकांनी समृद्ध झालेल्या मूर्तीचे विसर्जन केल्यामुळे जलस्रोत पवित्र बनतो. तसेच...
error: Content is protected !!
Skip to content