Homeडेली पल्स'लालबागचा राजा'ने घातली...

‘लालबागचा राजा’ने घातली इर्शाळवाडी पीडितांवर मायेची फुंकर!

‘आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, आपले लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि देशभरातील ‘राजा’चे तमाम गणेशभक्त तुमच्या दुःखात सहभागी आहेत. आता पुन्हा मोठ्या जोमाने उभे राहायचे आहे. समोर आलेल्या अडचणींवर मात करून दुःखाचा डोंगर सर करून आपल्याला पुढे जायचे आहे. या प्रवासात आम्ही सर्व तुमच्या साथीला आहोत’, अशा शब्दांत ‘लालबागचा राजा’ मंडळाने इर्शाळवाडीतील दरडग्रस्तांना धीर देत इर्शाळगाडीवासीयांनी भोगलेल्या वेदनांवर, त्यांच्या जखमांवर ‘लालबागचा राजा’ने मायेची फुंकर घातली.

निमित्त होते, ‘पान-सुपारी’मध्ये मंडळाकडून आपले सामाजिक दायित्व जपले जाते. यापूर्वीही २००५मध्ये दासगाव येथील जुई दरडग्रस्त गाव नव्याने उभारण्यात मंडळाने दिवंगत माजी आमदार माणिकराव जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली घेऊन नव्याने उभे केले होते. मुंबईतील गणेशोत्सवादरम्यान सर्वांच्या नजरा प्रसिद्ध ‘लालबागच्या राजा’कडे लागलेल्या असतात. ज्या काळात स्वातंत्र्यलढा शिखरावर होता त्या काळात मंडळाची स्थापना झाली. मुंबईसह देश-विदेशातील गणेशभक्त लालबागचा राजाच्या चरणी लाखो भक्त नतमस्तक होत असतात. लालबागचा राजाचे यंदा हे ९०वे वर्ष असून, सोबतच भक्तांसाठी मंडळाकडून विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. ‘पान-सुपारी’ हा त्यातील एक वैशिष्ट्यपूर्ण आणि लालबागच्या राजाच्या परंपरेतील महत्त्वाचा कार्यक्रम असतो.

जुलै महिन्यात रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातल्या इर्शाळवाडीवर मुसळधार पावसामुळे डोंगराचा वरचा कडा तुटून पडला. घरे राडारोड्याखाली गाडली गेली. दुर्दैवी इर्शाळवाडीच्या दुर्घटनेत अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली. जी वाचली त्यातली काही कायमची जायबंदी झाली, तर काही मुले अनाथ झाली. या सर्व आपत्तीग्रस्तांना लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून आर्थिक मदत करण्यात आली आहे. मंडळाकडून इर्शाळवाडीतील २९ कुटुंबातील वाचलेल्या सदस्यांना पन्नास हजार रुपयांचा डिमांड ड्राफ्ट  देण्यात आला आहे. तसेच २२ अनाथ मुलांच्या नावाने प्रत्येकी पन्नास हजार रुपयांची एफडी बनवण्यात आली आहे. ‘लालबागाचा राजा’ मंडळाने मदतीसाठी खारीचा वाटा उचलला आहे. अशी प्रतिक्रिया मंडळाचे मानद सचिव सुधीर साळवी यांनी यानिमित्ताने व्यक्त केली.

मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे प्रतिक्रिया देताना म्हणाले की, जगात मदतीची भावना कमी झाली आहे असा सूर नेहमीच ऐकू येतो. परंतु या गोष्टींना छेद देणारे सुखद अनुभव मंडळाच्या वतीने देत असतो. त्यामुळे सद्भाव जगात कायम असल्याची भावना मनात ठसते. आपले समाजाविषयी काही देणे लागते, या उदात्त व शुद्ध भावनेने समाजातील उपेक्षित घटक, वनवासी यांना यथाशक्ती मदत करण्याची मनात खूणगाठ बांधून असतो. स्वतःसाठी सर्वच जगतात, पण स्वतःसाठी व इतरांसाठी जगणे यात वेगळाच आनंद आहे व आत्मिक समाधान आहे. संस्थेच्या माध्यमातून एखाद्याच्या जीवनात थोडासा आनंद निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. या कार्यास मंडळाच्या सर्व सहकाऱ्यांचे आणि भाविक भक्तांचेसुद्धा मोठे योगदान आहे.

मंडळातर्फे आयोजित करण्यात आणलेल्या ‘पान-सुपारी’ कार्यक्रमाच्यावेळी मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे, स्थानिक खासदार अरविंद सावंत, स्थानिक आमदार अजय चौधरी आणि सिनेनिर्माते प्रवीण तरडे उपस्थित होते.

लालबागचा राजाच्या दर्शनासाठी आलेल्या इर्शाळवाडीमधील ग्रामस्थ गणपत पारधी यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून देताना सांगितले की, ज्यावेळी दुर्घटना घडली त्यावेळी मी झोपेत होतो. मातीच्या ढिगाऱ्यातून मी बाहेर पडलो. ते चित्र डोळ्यासमोर आले तरी मन सुन्न होते. या दुर्घटनेत आम्ही नातेवाईक गमावले. आजही आमच्या राहत्या घरांवर ३० फुटांचा मातीचा ढीग आहे. आम्ही आता नव्याने आमचे छप्पर उभारतो आहोत. आज पहिल्यांदा मुंबईत आलो. श्रीगणेशाचे देखणे रूप पाहून मनाला काहीशी शांतता मिळाली आहे. सचिन पारधी या विद्यार्थ्याने, आमचे गाव, शाळा, मित्र आणि त्यांच्या आठवणी त्या ढिगाऱ्यात गुदमरल्या आहेत. आमचा स्थानिक रोजगार आता पूर्णपणे बंद झाला आहे. बहुतांश गावकरी बेरोजगार झाले आहेत. भक्तांनी श्रीगणेशाच्या चरणी दिलेल्या दानातून आम्हाला आर्थिक मदत मिळाली. आर्थिक पाठबळ आणि बाप्पाचा आशीर्वाद यानिमित्ताने आम्ही स्वतःसोबत गावाकडे घेऊन जाणार आहोत, अशी भावना व्यक्त केली. 

Continue reading

उद्या घराबाहेर पडा छत्री आणि रेनकोटसह…

उद्या म्हणजेच गुरूवारीही मुंबईत दिवसभर पाऊस राहणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार उद्या मुंबईत हलका ते मध्यम पाऊस पडेल. ढगाळ वातावरण राहील. कमाल तापमान 29° ते 30°C तर किमान तापमान 27° ते 28°C असेल. वास्तविक तापमान दमटपणामुळे 38° ते 40°C...

एकांकिकांच्या सादरीकरणाने साजरी झाली विनय आपटेंची जयंती

"आजही नाटक संपल्यानंतर प्रेक्षकांकडून ज्या टाळ्या मिळतात, त्यातील पहिल्या शंभर टाळ्या, या विनय सरांच्याच असतात," अशा अत्यंत विनम्र भावना सुप्रसिद्ध अभिनेते संकर्षण कऱ्हाडे यांनी ठाण्यात व्यक्त केल्या. सुप्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आणि लेखक विनय आपटे यांच्या जयंतीनिमित्त 'विनय आपटे...

प्राजक्ता वर्मा-लवंगारेंनी स्वीकारला कार्यभार

मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त म्हणून आज प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांनी कार्यभार स्वीकारला. पालिका प्रशासनाच्या वतीने सहआयुक्त (सुधार) संजोग कबरे यांनी त्यांचे स्वागत केले. प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांचे शिक्षण बी. ए., एल. एल. बी., एम. ए. असे शिक्षण झाले आहे. त्यांनी लंडन...
Skip to content