Thursday, November 21, 2024
Homeमाय व्हॉईसभारतीय हॉकीचा दर्जा...

भारतीय हॉकीचा दर्जा उंचावणे आवश्यक

भारतीय हॉकी संघाला आगामी काळात प्रमुख आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धांत चांगली कामगिरी करायची असेल तर भारतीय हॉकी संघाच्या खेळात आणखी सुधारणा होणे आवश्यक आहे. नुकत्याच झालेल्या पॅरिस ऑलिंपिक स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा कांस्यपदक राखण्यात भारतीय हॉकी संघाला यश आले. परंतु गेली तब्बल ५२ वर्षे ऑलिंपिकमध्ये भारतीय हॉकी संघाला सुवर्णपदक हुलकावणी का देत आहे यांचा विचार होणेदेखील गरजेचे आहे. भारताने १९८०च्या मॉस्को ऑलिंपिक स्पर्धेत हॉकीतील शेवटचे सुवर्णपदक जिंकले होते. परंतु त्यावेळीदेखील काही बलाढ्य हॉकी संघ या स्पर्धेत सहभागी झाले नव्हते हे विसरुन चालणार नाही. भारताने ऑलिंपिकमध्ये हॉकीतच सर्वाधिक ८ सुवर्ण, १ रौप्य, ४ कांस्यपदकांची कमाई केली आहे. तब्बल ५२ वर्षांच्या मोठ्या अवधीनंतर भारतीय हॉकी संघांने सलग दोन स्पर्धांत ऑलिंपिकमध्ये कांस्यपदके पटकावली.

यंदाच्या स्पर्धेतील भारतीय संघाच्या कामगिरीवर नजर टाकली तर चित्र फारसे समाधानकारक दिसत नाही. नशिबाची साथ संघाला मिळालीच. त्याचबरोबर भारतीय कर्णधार हरमनप्रित सिंग आणि बुजूर्ग गोलरक्षक श्रीजेश हेच दोघे बहुतेक प्रत्येक सामन्यात भारताच्या मदतीला धावून आले. त्यामुळेच कांस्यपदक जिंकण्यात भारत यशस्वी झाला. भारताने केलेल्या एकूण १५ गोलांमध्ये कर्णधार हरमनप्रितचे एकट्धाचे १० गोल होते. तर चिनी मिलीप्रमाणे भक्कम बचावाचे जबरदस्त प्रात्यक्षिक दाखवणाऱ्या गोलरक्षक श्रीजेशने किमान ५०पेक्षा जास्त पेनेल्टी कार्नवर होणारे गोल वाचवले. समजा या दोघांना ऑलिंपिकमध्ये सूर गवसला नसता तर पुन्हा कांस्यपदक राखण्यात भारतीय संघ यशस्वी ठरला असता का?

पहिल्या सामन्यात न्युझीलंडविरुद्ध सामना संपायला एक मिनिट बाकी असताना कर्णधार हरमनप्रित सिंगने विजयी गोल करुन भारताला महत्त्वाचे ३ गुण मिळवून दिले. त्यानतर अर्जेंटिनाविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यातदेखील कर्णधार हरमनप्रित सिंग पुन्हा भारताच्या मदतीला धावून आला. त्यांनीच एकमेव गोल करुन अर्जेंटिनाविरुद्धची लढत बरोबरीत सोडवण्यात भारताला यश मिळवून दिले. तिसऱ्या लढतील भारताने आर्यलंडला २-० असे नमविले. भारताचे दोन्ही गोल कर्णधार हरमनप्रित सिंगनेच केले. चौथ्या लढतीत आघाडी घेऊनदेखील बेल्जियमविरुद्ध भारतीय संघ पराभूत झाला, पाचव्या सामन्यात बलाढ्य ऑस्ट्रेलियाला नमविण्याचा पराक्रम भारताने केला. १९७२च्या म्युनिच ऑलिंपिकनंतर ऑस्ट्रेलियाला ऑलिंपिकमध्ये पराभूत करण्यात भारताला यश आले. भारताने ३-२ अशी ही लढत जिंकली. त्यातदेखील २ गोल कर्णधार हरमनप्रित सिंगचेच होते.

उपांत्यपूर्व फेरीत पेनेल्टी शूटआऊटमध्ये भारताने इंग्लंडविरुद्ध थरारक विजय मिळवला. तो गोलरक्षक श्रीजेशच्या जबरदस्त बचावामुळे. उपांत्य फेरीत जर्मनीविरुद्ध आघाडी घेऊन भारतीय संघ पराभूत झाला. त्यामुळे तब्बल ४४ वर्षांच्या मोठ्या अवधीनंतर ऑलिंपिकमध्ये अंतिम फेरीत प्रवेश करण्याचे भारताचे स्वप्न पुन्हा एकदा भंग पावले. मग स्पेनविरुद्धच्या कांस्यपदकाच्या लढतीत भारतीय विजयाचे शिल्पकार कर्णधार हरमनप्रित सिंग आणि गोलरक्षक श्रीजेश हेच दोघे होते. भारताचे दोन्ही गोल हरमनमित सिंगनेच केले. तर श्रीजेशने किमान ९ पेनेल्टी कॉर्नर वाचवले. ऑलिंपिकमधील ही कामगिरी पाहता भारताला पुन्हा एकदा भक्कम बचाव आणि धारदार आक्रमण या दोन्ही गोष्टीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. अलिकडच्या काळात आघाडी घेऊनदेखील भारतीय संघाने बरेच सामने गमावले. तर प्रतिस्पध्यांविरुद्ध जास्तीतजास्त गोल न केल्यामुळे शेवटच्या काही मिनिटात भारतीय संघ बऱ्याच सामन्यात पराभूत झाल्याचे चित्र अनेकदा बघायला मिळते.

पेनेल्टी कॉर्नरवर हमखास गोल करणाऱ्या खेळाडूंची मोठी फळी निर्माण करायला हवी. नुकत्याच झालेल्या ऑलिंपिकमध्ये सर्व सामन्यात मिळून किमान ५०पेक्षा जास्त पेनेल्टी कॉर्नर भारताला मिळाले. परंतु त्यामध्ये अवघे ९ गोल करण्यात भारतीय संघ यशस्वी झाला. ही आकडेवारी निश्चितच चांगली नाही. कारण आजच्या आधुनिक हॉकी खेळात प्रत्येक संघ जास्तीतजास्त पेनेल्टी कॉर्नर मिळवून त्यावर गोल करण्याचा प्रयत्न करतो. त्याप्रमाणे बलाढ्य हॉकी संघांनी पेनेल्टी कॉर्नरवर हमखास गोल करणारे खेळाडू आपल्या संघात तयार केले आहेत. पेनेल्टी कॉर्नर आणि पेनेल्टी स्ट्रोकवर होणाऱ्या गोलांबरोबरच मैदानी गोल करणाऱ्यांवरदेखील भारतीय संघाने लक्ष देणे गरजेचे आहे. कारण जी-जी संधी तुम्हाला गोल करण्यासाठी मिळेल ती सोडून चालणार नाही. कारण शेवटी सामन्याचा निकाल गोलांवरच ठरणार आहे. पॅरिसमध्ये भारताने एकूण प्रतिस्पर्धी संघावर १५ गोल केले. त्यापैकी ९ गोल पेनेल्टी कॉर्नरवर झाले. तर ३ गोल पेनल्टी स्ट्रोकबर भारत्ताने केले. इतर ३ गोल भारताचे मैदानी गोल होते.

भारतीय हॉकी संघाचा गोलरक्षक श्रीजेशने एका मुलाखतीत सातत्याने आंतरराष्ट्रीय स्पर्धात चांगली कामगिरी करायची असेल तर मैदानी गोल करणाऱ्यावरदेखील जास्तीतजास्त भर देणे गरजेचे असल्याचे सांगितले. पॅरिसमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या हॉलंडने १४, रौप्यपदक जिंकणाऱ्या जर्मनीने १५ आणि चौथा क्रमांक मिळवणाऱ्या स्पेनने १० मैदानी गोल केले. ही तीन संघातील मैदानी गोलांची तफावत भारतासाठी नक्कीच धोक्याचा इशारा देणारी आहे. त्यामुळे आता होणाऱ्या विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धात भारतीय हॉकी संघाने आपला खेळ अधिक उंचावणे गरजेचे आहे. जास्तीतजास्त गोल करण्यावर भर देणे आवश्यक आहे. कारण १-२ गोलांची छोटी आघाडी घेऊन सामने जिंकणे आजच्या दिवसांत कठीण आहे. सातत्यपूर्ण कामगिरीचा अभावदेखील भारतीय संघात जाणवतो. एखाद्या स्पर्धेत बलाढ्य संघाला भारतीय संघ नमवितो. परंतु नंतर दुसऱ्याच दिवशी काहीश्या दुबळ्या संघासमोर भारतीय संघ हार पत्करतो, याचादेखील अनुभव बऱ्याचदा आंतरराष्ट्रीय स्पर्धात आला आहे. आगामी काळात श्रीजेशची उणीव भारतीय संघाला जाणवणार हे नक्की. त्याची जागा कोण घेतो हे बघणे महत्त्वाचे ठरेल. ऑलिंपिकमधील कांस्यपदकानंतर आता होणाऱ्या विविध आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धांत भारतीय हॉकी संघाची कामगिरी आणखी सुधारेल अशी आशा तमाम भारतीय बाळगून असतील.

Continue reading

श्री गणेश आखाड्यात तयार होत आहेत उद्याचे पहेलवान!

भाईंदर (पश्चिम) येथील सुभाष मैदानात असलेल्या श्री गणेश आखाड्यात उद्याचे युवा पहेलवान तयार करण्याचे मोठे कार्य गेली २४ वर्षे वस्ताद वसंतराव पाटील आणि त्यांचे सहकारी करत आहेत. मीरा-भाईंदर परिसर आता खूपच गजबजलेला आहे. तेथे आता इतर भाषिकांची मोठी संख्या...

क्ले कोर्ट किंग, स्पेनचा डावखुरा टेनिसपटू नादाल!

स्पेनचा महान डावखुरा ३८ वर्षीय टेनिसपटू राफेल नादालने दोन दशके टेनिस कोर्टवर अनभिक्षित सम्राटाप्रमाणे राज्य केल्यानंतर वाढते वय आणि दुखापतीमुळे अखेर आपली टेनिस रॅकेट म्यान केली. आपल्या जबरदस्त आक्रमक खेळाची मोहोर नादालने टेनिस कोर्टवर उमटवून साऱ्या टेनिसविश्वाला आपल्या खेळाची...

न्युझीलंडची कमाल! भारताची वाट खडतर!!

दुबईत झालेल्या महिल्यांच्या टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत न्युझीलंडने प्रथमच विजेतेपद पटकावून महिलांच्या क्रिकेट विश्वात धमाका उडवून दिला. आता भारतभूमित आलेल्या त्यांच्या पुरुष संघाने तब्बल ६९ वर्षांच्या मोठ्या अवधीनंतर यजमान भारतीय संघाला पराभूत करुन मोठीच खळबळ माजवली. १९५५पासून न्युझीलंड संघ...
Skip to content