Homeमाय व्हॉईसबरे झाले! उद्धव...

बरे झाले! उद्धव ठाकरे यांनी विझत चाललेल्या कोळशावर फुंकर घातली!!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर झालेल्या अवघड शस्त्रक्रियेनंतर सुमारे तीन महिन्यांच्या कालावधीनंतर त्यांनी प्रथमच खुर्चीत बसून अदमासे अर्धातास खणखणीत भाषण केले. खुर्चीत बसून भाषण केले असे मुद्दामच म्हटले. कारण, मुख्यमंत्र्यांच्या आजारपणात वेगवेगळ्या वावड्या उठत होत्या. विरोधक कधी आडूनआडून तर कधी उघडरित्या त्यांच्या आजारपणाची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न करत होते. कधी उघडपणे, त्यांनी आता मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी दुसऱ्या कुणावरतरी सोपवावी अशी मागणी करत होते. यासाठी राजभवनचे दरवाजेही ठोठावले गेले होते.

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन जे मुंबईत घेतले गेले तेव्हा विधानभवनाची पाहणी करण्याकरता मुख्यमंत्री विधानभवन परिसरात गेले होते. तेव्हाच एकंदर मूड पाहता येथेच लिहिलेल्या स्तंभात मी सध्या मुख्यमंत्र्यांनी तब्येतीची काळजी घ्यावी व बरे झाल्यानंतरच शस्त्रे पराजवीत असे आवाहन केले होते. त्यानंतर त्यांनी आपल्या प्रकृतीची बऱ्यापैकी काळजी घेतल्याचे दिसून आले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसैनिकांना ‘पुनश्च्य हरिओम’ नारा देण्याची संधी मुख्यमंत्र्यांनी खुबीने साधली, इतकेच म्हणता येईल.

मुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीत विरोधी पक्षाने अप्रत्यक्षरित्या महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात बऱ्याच काड्या करण्याचा प्रयत्न केला. कोरोनासारख्या गंभीर बैठकीच्या वेळी राजशिष्टाचाराच्या नियमांवर बोट ठेवण्यात आले. घरातील भावंडांमध्ये भांडणे झाली की ती जशी वडिलांकडे जातात तशीच काहीशी गत विरोधी पक्षाची झाली होती. म्हणून ती मंडळी वारंवार महामहीम राज्यपालांकडे जात होती. मुख्यमंत्र्यांचे भाषण वृत्तवाहिन्या तसेच वर्तमानपत्रांतून आपल्यापर्यंत पोहोचले आहेच. त्याची दुरुक्त्ती करण्याचा प्रयत्न करणार नाही. तो योग्यही ठरणार नाही. हिंदुत्वापासून ते महाविकास आघाडीच्या विकासकामांबाबत त्यांनी अनेक विषयांत हात घातला. पण या सर्वांपेक्षाही त्यांनी शिवसेना नेते आणि शिवसैनिकांना जे आवाहन केले आहे ते माझ्यादृष्टीने महत्त्वाचे आहे. विझत चाललेल्या कोळशावर फुंकर घालून अंगार फुलवण्याची गरजच होती…

“तेरी दुष्मन है तेरी सादा लौही

मेरी माने तो तू कुछ दूषवार हो जा”

अशी सांगण्याची वेळ उद्धवजींच्या स्वभावामुळे आली होतीच. त्यामुळे अशा भाषणाची गुटी शिवसैनिकांना गरजेचीच होती.

“सबको रुसवा बारी बारी किया करो|

हर मौसम मे फतवे जारी किया करो”

अशीच बरीचशी परिस्थिती देशात असल्याने उद्धवजी का बोलत नाहीत असा स्वाभाविक प्रश्न जनतेच्या आणि शिवसैनिकांच्या मनात निर्माण झाला होता. कारण, हल्ली छोट्यामोठ्या गोष्टींवरूनही अरेला कारे केले नाही तर अरेचे खरे आहे, असे वाटू लागते. म्हणून अरेला मुळापासून उपटून टाकण्यासाठी कारे गरजेचेच नव्हे तर अत्यावश्यक झाले आहे.

ठाकरे

दुसरे महत्त्वाचे आवाहन उद्धवजींनी केले आहे ते छोट्यामोठ्या निवडणुकांबाबत. हे गरजेचेच होते. कारण, शिवसेना नेते आणि शिवसैनिक लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुका गंभीर्याने घेतात तितक्या इतर निवडणुका घेत नाहीत, हे महाराष्ट्र पाहतच होता. आता मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुखांनी जाहीर कानउघाडणी केल्यानंतरतरी नेतेमंडळी कामाला लागतात की नाही हे काही दिवसांनी कळेलच.

दरम्यान, राज्यातील शिवसेना पक्षातच मोठ्या प्रमाणात झाडलोट करायची गरज निर्माण झाली आहे. मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि पुण्याबाबत बोलायचे झाले तर अनेक ठिकाणी शिवसेना शाखाप्रमुख गेल्या 10/15 वर्षांत बदललेलेच नाहीत. तीच गत विभागप्रमुखपदांची आहे. गटप्रमुखपद तर काही ठिकाणी 30 वर्षे बदललेले नाही. मुंबई-ठाण्यातील काही शाखाप्रमुखांनी शाखेच्या रुग्णवाहिकाच गायब केलेल्या आहेत. किमान दहा ठिकाणे अशी आहेत की, तेथील अनेक निवडणुकांत पराजय होऊनही विभागप्रमुखाला दरवेळी अभय देण्यात आलेले आहे. शिवसेना नेते आणि अष्टप्रधानमंडळाने यासंबंधात त्वरित हालचाल करणे गरजेचे आहे. भाकरी परतली नाही तर ती भाकरी करपते, हा साधा नियम आहे…

“वीज झेलून घेणाऱ्या छातीतून

शब्द येतात माणसांसाठी,

रुजू आलेल्या मातीतून

शब्द येतात माणसांसाठी,

निष्पाप हसत शब्द येतात माणसांसाठी,

अश्रू पुसत शब्द येतात माणसांसाठी,

माणसांवर विश्वास ठेवून,

शब्द येतात माणसांसाठी;

या शब्दांचं, विश्वासाचं गाणं गातोय,

ऐकताय ना?

मी गाणं गातोय!!”

या कवितेच्या ओळी एका वेगळ्या अर्थाने मी ऐकत आहे, असेच वाटत होते. मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख यांच्या भाषणात राजकारण असणारच. ते नसून चालणार नाही. त्यावरही लिहिणार आहे. परंतु आज मुख्यमंत्री बरे झाले आहेत असे दिसले आणि पटले म्हणून या चार ओळी..

एका आघाडीच्या वर्तमानपत्रात वॉकरचे साहाय्य न घेता त्यांनी नेताजी शुभाषचंद्र बोस आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करतानाचे छायाचित्र प्रदिद्ध केले आहे. ही शकुनाचीच तर गोष्ट आहे…

Continue reading

पोलीस आयुक्त देवेन भारती.. एक नजर इधर भी…

मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी नुकतीच एक पत्रकार परिषद घेऊन यंदाच्या जानेवारी ते ऑगस्टमधील शहरातील गुन्हेगारीचा आलेख व पोलिसांची कामगिरी विषद केली. खरंतर अशा पत्रकार परिषदा घेऊन पोलीस, जनता व पत्रकारांध्ये माहितीचे आदानप्रदान होणे महत्त्वाचे असते. पूर्वी अनेक...

गणरायही गुदमरले रेल्वेस्थानक परिसरातल्या या प्रचंड गर्दीने!

सरकारी व रेल्वे खात्याच्या आकडेवारीच्या आधारे विचार केला तर ठाणे रेल्वेस्थानकातून दररोज सुमारे पाच ते सहा लाख प्रवासी ये-जा करीत असतात. प्रवासी नागरिकांबरोबरच स्थानक परिसरात असलेल्या लाखो फेरीवाल्यांमुळे आधीच हैराण झालेल्या प्रवाशांच्या हालात परिसरातच मोठा मंडप घालून सार्वजनिक गणपती...

मुंढेंच्या कारवाईविरूद्ध न्यायालयाचे अर्थशून्य ताशेरे! बहोत नाइंसाफी है यह…

तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध विभागाचे आयुक्त म्हणून सूत्रे हाती घेतल्यापासून संपूर्ण राज्यभर एकच हलकल्लोळ माजला आहे. भेसळ करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. औषध नियंत्रण नियमावलीचे पालन न करणाऱ्यांचे तर आता पितळ उघडे पडत आहे. अधूनमधून कारवाईचा दणका बसलेली...
Skip to content