Homeटॉप स्टोरीशिवाजी पार्कवर उभे...

शिवाजी पार्कवर उभे राहून मी मर्द आहे, म्हणणे सोपे आहे…

मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकांच्या वेळी पूर्वीप्रमाणे २२७ वॉर्डच असावेत, यासाठीच्या विधेयकावरील चर्चेच्या वेळी आमदार नितेश राणे यांनी थेट आदित्य ठाकरे यांच्यावरच निशाणा साधला. या विधेयकाच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने स्टेटस को म्हणजे जैसे थे स्थिती ठेवावी, असा दावा काही सदस्यांनी केला होता. आदित्य ठाकरे यांनीही सर्वोच्च न्यायालयाच्या स्टेटस कोचा हवाला देऊन मुळात असे विधेयक सभागृहात येणे कितपत योग्य आहे, असा सवाल केला होता. धनंजय मुंडे, रवींद्र वायकर यांनीही तसाच दावा केला होता.

या विधेयकासंदर्भात रईस शेख आणि अमीन पटेल यांनी मात्र शिवसेनेवर नाव न घेता टीका केली. शिवसेनेच्या फायद्यासाठी महापालिकेच्या वॉर्डांची पुनर्रचना करण्यात आली आणि ती करताना खूप मोठ्या रकमांचा भ्रष्टाचारही झालेला आहे, असा आरोप करून शिन्दे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशीची मागणी केली.

उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी सर्वोच्च न्यायालयात राहुल रमेश वाघ विरुद्ध महाराष्ट्र सरकार यांच्यातील हे प्रकरण असून ते ओबीसी आरक्षणविषयक आहे. त्यावरील जैसे थे स्थिती ही ९४ नगरपालिकांच्या निवडणुकांच्या अधिसूचनेबद्दल आहे. दुसरी गोष्ट म्हणजे अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर करण्यासाठीच्या विधेयकावर कोणत्याही स्वरूपाचा जैसे थे आदेश नाही. दुसरी गोष्ट म्हणजे इंटरव्हेन्शन अँप्लिकेशन अर्थात हस्तक्षेप अर्जाद्वारे कायद्याला आव्हान देता येत नाही तर त्यासाठी स्पेशल लीव्ह पेटिशन करावी लागते, याकडेही फडणवीस यांनी लक्ष वेधले. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीही ही गोष्ट स्पष्ट करत विधिमंडळ सर्वोच्च असून त्याचा कायदे करण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयही हिरावून घेऊ शकत नाही, हे ठासून सांगितले. त्यांनी कायदेशीर बाजूही सर्व सदस्यांना समजावून सांगितली आणि सर्वोच्च न्यायालयाचा जैसे थे आदेश हे विधयेक आणण्यावर नाही. त्यामुळे या विधेयकावर सभागृहात चर्चा करून ते पारित करता येईल, असा निर्वाळाही त्यांनी दिला.

अध्यक्षांच्या वक्तव्यानंतर आमदार नितेश राणे यांनी अध्यक्षांकडे बोलण्याची परवानगी मागितली. विधेयकावर बोलायचेय, असे अध्यक्षांनी विचारल्यावर हो, असे सांगून राणे उभे राहिले. त्यांनी अध्यक्षांचे आभार मानत कायद्याचे तज्ज्ञ असल्याने अध्यक्षांनी कायदेशीर बाजू समजावून सांगितली आणि ती आम्हा सदस्यांना व्यवस्थित समजली. पण अध्यक्षमहोदयांनी त्यांच्या विद्यार्थ्यांना योग्य वेळी योग्य मार्गदर्शन केलं असतं तर त्यांना आज पुन्हा हे समजावून सांगण्याचा त्रास झाला नसता, असे ते म्हणाले.

राणे यांच्या वक्तव्यानंतर सभागृह हास्यकल्लोळात बुडाले, कारण अध्यक्षांच्या निवडीनंतरच्या मनोगतांमधे आदित्य ठाकरे यांनी आपण राहुल नार्वेकर यांच्याकडे कायद्याचे शिक्षण घेताना मार्गदर्शनासाठी क्लासला जात होतो, असे सांगितले होते. त्यामुळे ते लक्षात ठेवून राणे यांनी आदित्य ठाकरे यांचे नाव न घेता ही टिप्पणी केली तेव्हा सर्वांनीच दाद दिली.

राणे यांनी शिवसेनेवर हल्ला चढवत आव्हानही दिले. ते म्हणाले, शिवाजी पार्कमध्ये उभे राहून मी मर्द आहे, अशा वल्गना करणे सोपे आहे. एखाद्या रिसॉर्टमध्ये बसून पालिकेचे वॉर्ड ठरवले की ते बदलेले जाताना कशी तडफड होते, हे सभागृहाने बघितले आहे. त्यामुळे नुसतेच मी मर्द आहे, असे म्हणण्यापेक्षा मैदानात या. मग कळेल कुणाला कसली भीती आहे ते…

राणे यांचे भाषण संपल्यानंतर सत्तारूढ बाजूच्या अनेक सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले. शिवसेनेचे सुनील प्रभू यांनी राणे यांना उत्तर देण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. निवडणुका कधीही होवोत, मुंबईकर ठरवतील काय ते, अशा शब्दात त्यांनी बाजू मांडली.

सत्ताधाऱ्यांनीच केली पायऱ्यांवर निदर्शने

सत्ताधाऱ्यांनीच विरोधकांच्या विरोधात विधानभवनाच्या पायऱ्यांवर निदर्शनं करण्याची अजब घटना बुधवारी सकाळी महाराष्ट्रात घडली. विशेष म्हणजे विरोधकांनीही या निदर्शनांच्या वेळीच सत्ताधाऱ्यांच्या मागे उभे राहून सत्ताधाऱ्यांच्या विरोधात घोषणाबाजी केल्याने सभागृहातील वाग्युद्ध विधानभवनाच्या पायऱ्यांवरही धक्काबुक्कीसह आज रंगलं होतं. अनेक आमदार हमरीतुमरीवर येऊन बाचाबाची करताना दिसत होते.

पन्नास खोके एकदम ओक्के, या विरोधकांनी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी (गेल्या बुधवारी) दिलेल्या घोषणांनंतर आज (बुधवारी) सत्ताधारी एकनाथ शिन्दे गटातील आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर लवासाचे खोके, एकदम ओक्के आणि सचिन वाझेचे खोके, एकदम ओक्के यासह अनिल परबचे खोके, एकदम ओक्के…अशा घोषणांनी विधानभवन परिसर निनादून टाकला. त्यांच्या घोषणांसह निदर्शनांच्या थोड्याच वेळात विरोधी पक्षातील काही आमदार शिन्दे गटाच्या आमदारांच्या ३०-३५ जणांच्या गटाच्या मागे पायऱ्यांवर सर्वात वरच्या पायऱ्यांवर उभे राहून प्रतिघोषणा देऊ लागले.   

मुख्यमंत्री एकनाथ शिन्दे आपल्या कार्यालयातून सभागृहात जाण्यासाठी निघाले आणि त्यांना ही गोष्ट समजली. त्यांनी लगेचच कॉँग्रेसचे ज्येष्ठ आमदार बाळासाहेब थोरात यांच्याशी चर्चा केली. तसेच तिथेच लिफ्टपाशी उपस्थित असलेल्या छगन भुजबळ यांच्याशीही चर्चा केली. मात्र, हा प्रकार काही काळ सुरूच राहिला. विरोधी पक्षनेते अजित पवार विधानभवनात आले आणि त्यांनी हा प्रकार बघून विरोधकांच्या पहिल्या दिवशीच्या घोषणा सत्ताधारी गटाला बऱ्याच लागल्याने आज सत्ताधाऱ्यांवरच निदर्शनं करण्याची वेळ आली आहे, अशी प्रतिक्रिया दिली.

Continue reading

मुख्यमंत्री फडणवीस यांनी रोहित पवारांना सुनावले!

महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघातामध्ये घातपात असला तर त्यात दोषी असलेल्या व्यक्तीला कोणत्याही थराला जाऊन दंडित करू, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी गुरुवारी विधानसभेत घोषणा केली आणि रोहित पवार यांच्या सर्व आरोपांना सविस्तर उत्तर दिले. अजित पवार...

आदित्य ठाकरेंना नितेश राणे देणार कोल्ड कॉफी!

नारायण राणे आणि त्यांचे मंत्री असलेले चिरंजीव नितेश राणे, हे उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यावर कडवट शब्दात टीका करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. पण, विधानसभेत मंगळवारी कोकणाच्या प्रश्नांवरील चर्चेला उत्तर देताना नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांचे नाव घेत आदरयुक्त उल्लेख...

औचित्त्याची ऐशीतैशी…

मराठी भाषेमध्ये एखाद्या गोष्टीचे औचित्त्य काय आहे, असे विचारताना औचित्त्य, या शब्दाचा अर्थ माहीत असणे अभिप्रेत असते. राज्याच्या विधानसभेत कामकाज केले जाताना औचित्त्याचे मुद्दे म्हणून काही बाबी आमदारांना उपस्थित करता येतात आणि सरकारने त्यावर उचित कार्यवाही करणेही अपेक्षित असते....
Skip to content