Homeटॉप स्टोरीविधिमंडळात आजही गदारोळ?

विधिमंडळात आजही गदारोळ?

विधानसभेत अध्यक्षांसमोरील राजदंडाला स्पर्श करत निदर्शने केल्यामुळे काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांना विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मंगळवारच्या संपूर्ण दिवसभराच्या कामकाजासाठी सभागृहातून निलंबित केले. विधिमंडळात आजही काँग्रेससह विरोधी पक्षांच्या सदस्यांकडून कृषीमंत्र्यांच्या कथित वादग्रस्त विधानांविरूद्ध आक्रमक भूमिका घेतली जाण्याची शक्यता असून यामुळे पुन्हा सभागृहात गदारोळ पाहयला मिळू शकतो, असे जाणकारांचे मत आहे.

मंगळवारी सकाळी विधानसभेमध्ये प्रश्नोत्तराचा तास संपल्यानंतर नाना पटोले बोलण्यासाठी उभे राहिले. या सरकारमधील कृषीमंत्री तसेच इतर नेत्यांनी वारंवार शेतकऱ्यांचा अपमान करणारी विधाने केली आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी राज्यातील शेतकऱ्यांची माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली. सभागृह नियमानुसार चालवले जाईल, असे स्पष्ट करत अध्यक्ष नार्वेकर यांनी पटोले यांना जागेवर बसण्यास सांगितले. पण, पटोले यांनी प्रक्षुब्ध होत जागेकडे न जाता अध्यक्षांच्या दिशेने सभागृहातील हौद्यात जात विरोधी पक्षांतील सदस्यांना हौद्यात या, असे खुणावले. विरोधी पक्षांचे विशेषतः काँग्रेसचे अनेक आमदार सभागृहातील हौद्यात जमून निदर्शने करू लागले, घोषणा देऊ लागले. त्यावेळी पटोले यांनी राजदंडाला हात घालताच अध्यक्ष नार्वेकर यांनी सभागृहाचे कामकाज पाच मिनिटांसाठी स्थगित करत असल्याची घोषणा १२ वाजून तीन मिनिटांनी केली.

विधिमंडळ

त्यानंतर १२ वाजून आठ मिनिटांनी कामकाज सुरू होताच सर्व विरोधी सदस्यांनी शेतकऱ्यांची माफी मागा, अशा घोषणा सुरू केल्या. त्यावर नाना तुमच्याकडून या वर्तनाची अपेक्षा नाही कारण तुम्ही सभागृहाचे अध्यक्ष राहिलेले आहात. त्यामुळे तुम्ही राजदंडाला स्पर्श केल्याबद्दल तुमच्यावर कारवाई करण्यासाठी मला भाग पाडू नका, जागेवर बसा, असे अध्यक्ष नार्वेकर यांनी सुनावले. त्यानंतरही विरोधक घोषणा देत राहिले. दरम्यान, मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी पटोले यांच्यावर कारवाईची मागणी केली. फडणवीस म्हणाले की, वास्तविक पटोले विधानसभेचे अध्यक्ष म्हणून काम केलेले सदस्य आहेत आणि त्यांनी अध्यक्षांच्या दिशेने त्यांच्या अंगावर धावून जाणे, राजदंडाला स्पर्श करणे आणि जणू काही अध्यक्षच दोषी आहेत, या पद्धतीने वागणे चुकीचे आहे. त्यामुळे पटोले यांच्यावर कडक कारवाई करावी. त्यानंतर अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यांना दिवसभरासाठी निलंबित केले. त्यानंतर विरोधकांनी दिवसभरासाठी सभात्याग केला आणि सरकारकडून कृषिमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

नाना पटोले यांच्या निलंबनावर सत्ताधारी आणि विरोधक यांची भिन्न भूमिका आहे. सत्ताधारी भाजपा आणि मुख्यमंत्री फडणवीस यांनी पटोले यांचे वर्तन चुकीचे ठरवत माफीची मागणी केली, तर विरोधकांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर पटोले यांचे समर्थन करत निलंबनाचा निषेध केला. असंसदीय भाषा वापरल्यामुळे पटोले यांना निलंबित केले गेल्याचा दावा सत्ताधारी करत आहेत. दुसरीकडे पटोले यांनीही आपली भूमिका ठाम ठेवत, शेतकऱ्यांचा अपमान झाला तर मी शांत बसणार नाही असं स्पष्ट केलं आहे. मुख्यमंत्र्यांनी याबाबत माफी मागावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

विधिमंडळ

सत्ताधारी-विरोधक संघर्षातील ठळक मुद्दे:

1. कृषिमंत्री कोकाटे यांनी शेतकऱ्यांबद्दल केलेल्या ‘अपमानास्पद’ विधानाचा विरोधकांनी निषेध केला.

2. नाना पटोले यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेतकऱ्यांची माफी मागावी, अशी मागणी केली.

3. गोंधळानंतर नाना पटोले यांना एका दिवसासाठी निलंबित करण्यात आले.

4. विरोधकांनी सभागृहातून वॉकआउट केले.

5. काँग्रेसने कृषिमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

Continue reading

तांदळाभोवती फिरणार जपानची पुढची निवडणूक!

जपानमध्ये तांदूळ हे केवळ एक मुख्य अन्न नाही, तर ते जपानच्या संस्कृतीचा, अर्थव्यवस्थेचा आणि राष्ट्रीय अस्मितेचा अविभाज्य भाग आहे. मात्र, सध्या तांदळाचा अभूतपूर्व तुटवडा आणि गगनाला भिडलेल्या किमतींमुळे देशात एक मोठे राजकीय संकट निर्माण झाले आहे. गेल्या एका वर्षात...

यंदाच्या ‘इफ्फी’त पदार्पण करणार जगभरातील सात कलाकृती!

यंदाच्या 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) जगभरातील पदार्पण करणाऱ्या सात कलाकृती प्रदर्शित होणार असून आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट नव प्रतिभेला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने, सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरस्कारासाठी पाच आंतरराष्ट्रीय आणि दोन भारतीय चित्रपटांची निवड केली जाणार आहे. विजेत्याला रूपेरी मयूर,...

राज्य सरकारकडून कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक

कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा तयार करण्याकरीता गुंतवणूक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जून ते सप्टेंबरदरम्यान अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. यातून शेतकऱ्यांना पुन्हा उभारी मिळावी यासाठी सरकारने हा निर्णय घेतला. कृषी समृद्धी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ड्रोन,...
Skip to content