परमबीर सिंग यांच्यावरील भ्रष्टचाराबद्दलच्या आरोपांवर लिहीत असताना रात्री उशिरा आणखी नवीन माहिती हाती आली. नवीन माहिती लवकर मिळाली असती तर त्यातच ती घेतली असती. पण उशिर झाला होता. परंतु आज ती कागदपत्रे पाहिली असता ती जर काल घेतली असती तर नवीन माहितीवर काहीसा अन्यायच झाला असता. कालच्या भागात मुख्यतः घाडगे यांना वैयक्तिकरित्या कसे छळले होते याबाबतची माहिती होती. अनुषंगाने काही माहिती त्यात आली आहे हे मान्य, परंतु या नवीन माहितीत चक्रावून सोडणारी आकडेवारी व वर्णन पाहून मीच काहीसा धास्तावलो आहे.
आपले वरिष्ठ व ज्येष्ठ पोलीस अधिकारी इतकी बेफाट माया जमवतात हे पाहून डोळे खरोखरच विस्फारतात! आणि सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती ए. एन. मुल्ला यांचे पुढील वाक्य आठवते.. “.. There is no single lawless group in the whole country whose record of crimes comes anyway near the record of single organized unit, which is known as the Indian Police Service ”
परमबीर सिंग यांच्या बाबतची ही नवीन माहितीही वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमराव घाडगे यांनी एका पत्रान्वये दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, पोलीस महासंचालक संजय पांडे आणि पोलिसांच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालकांनाही घाडगे यांनी हे सनसनाटी आरोप असलेले पत्र पाठवले आहे. या पत्रावर सहज नजर फिरवली असता काय काय नजरेस पडते ते पहिले की चक्रावून व्हायला होते.
या पत्रात काय नाही? सर्व आहे. परमबीर सिंग ठाणे शहराचे पोलीस आयुक्त असताना 14 पोलीस कर्मचारी आपल्या घरातील सेवेसाठी वापरत असत. कुटुंबासाठी राज्य राखीव दलाचे 10 जवान वापरत असत. खरे तर त्यांना फक्त दोन कुक आणि एक दूरध्वनी चालक ठेवण्याची नियमाने परवानगी आहे. गेल्या 20 वर्षांपासून त्यांच्याकडे दोन हवालदार कामाला आहेत. त्यांना दुसरे कोणी चालतच नाहीत. हे दोघेजण त्यांची बाहेरची कामे करतात. पैशांची देवाणघेवाण तसेच परमबीर यांची बेनामी संपत्ती कोठे आणि कोणाच्या नावावर आहे याची खडानखडा माहिती त्यांना आहे.
परमबीर सिंग यांनी नातेवाईकांच्या नावावर सिंधुदूर्ग जिल्ह्यात सुमारे 25 एकर जमीन खरेदी केल्याचा गौप्यस्फोटही या पत्रात आहे. परवानाधारक पिस्तुले देण्यासाठी मधला दलाल म्हणून त्यांनी कल्याण येथील कोणी प्रकाश मुथा या माणसास नेमले आहे. 10/15 लाख रुपये घेऊन असा परवाना दिला जातो. अनेक बिल्डर्सना अशी परवान्याची पिस्तुले देऊन त्यांनी करोडोची कमाई केलेली आहे. पोलीस खात्यातील (आयुक्त असताना) बदल्यांपोटी मिळालेली भलीमोठी रक्कम कलेक्टर राजू अय्यर याच्याकडे सुखरूप असते. वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदाचा भावही 50 लाखांपासून सुरू होऊन तो कोटीपर्यंत कधी जातो ते देणाऱ्यालाही कळत नाही आणि घेणारा काय नेहमीच आनंदात असतो.
तुम्हा-आम्हा सामान्य माणसांना दिवाळीची भेटवस्तू म्हणून सुक्यामेव्याचे बॉक्स, जाहिरातीत दाखवतात ती चॉकलेट्स, फार तर ओन्ली विमल, परफेक्ट मॅन म्हणून रेमंड किंवा कांजीवरम वा बनारसी सिल्क साडी (महिलांसाठी) इतकेच चॉईस असतात. परंतु परमबीर यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या श्रेणीनुसार सोन्याची बिस्किटे (पार्ले जी, खायला ते वेडे आहेत का?) चढत्या श्रेणीत घेत असतात. परमबीर यांनी गैरमार्गाने मिळवलेला पैसा म्हणजे करोडो रुपये जग्गू खटवाणी व रुस्तमजी बिल्डरकडे गुंतवलेले आहेत. परमबीर यांनी आपला मुलगा रोहन याला सिंगापूर येथे व्यवसाय उभा करून दिला असून त्यासाठी सुमारे दोन हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याची माहिती आहे.
परमबीर यांच्या कुटुंबाने खेतान ही कंपनी उघडली असून ते इंडिया बुलमध्ये संचालकपदी असल्याचे समजते. याशिवाय या पत्रात वा निवेदनात इतरही छोटेमोठे आरोप करण्यात आले आहेत. सध्याच्या पोलीस खात्यातीलच नव्हे तर सर्वत्र बोकाळलेला भ्रष्टचार पाहून नामदेव ढसाळ यांची एक ओळ आठवते- “डोळे धुऊन घ्यावेत असं पाणीच नाही इथे..”
Mind boggling !!!
Hats off to your cold minded investigative journalism.