Friday, October 18, 2024
Homeमाय व्हॉईसपवार साहेबांचा राजीनामा...

पवार साहेबांचा राजीनामा ही पक्ष वाचवण्यासाठी केलेली धरणबंदी?

देशात मंगळवारी राजकीय भूकंप झाला. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षाचे प्रमुखपद सोडण्याचा निर्णय अचानक जाहीर केला. पण याची कल्पना कुटुंबातील महत्त्वाच्या व्यक्तींना होती. पवार यांच्या या निर्णयाने राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्ते यांच्यावर तर वीज कोसळली. अनेक नेते भावनाविवश झाले. काही अतिउत्साही कार्यकर्त्यांनी तर ऊर बडवून घेतला. हे चित्र स्वाभाविक आहे. महाराष्ट्राने अशा प्रकारचा ट्रेलर यापूर्वी पाहिलेला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दोनदा त्यांच्या पदाला ‘जय महाराष्ट्र’ केलेला आहे. आपल्या एका निर्णयाने संघटना मजबूत झाली तर ती कोणाला नको आहे. आपल्या नेतृत्त्वावर कार्यकर्त्यांची अभेद्य निष्ठा आहे असे समजल्यानंतर “लोकाग्रहास्तव” या गोंडस विशेषणाखाली शिवसेनाप्रमुखांनी पुन्हा पक्षाची धुरा सांभाळली. पवारांच्या बाबतीत असं होणार नाही, हे छातीठोकपणे सांगता येत नाही.

मात्र शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादीप्रमुख शरद पवार यांच्या करणी आणि कथनीमध्ये जमीन-अस्मानाचा फरक आहे. त्यामुळे पवार यांनी उचललेले हे पाऊल भविष्यातील गूढ राजकारणाची नांदी ठरू शकते. ते राजीनामा मागे घेतील किंवा नाही हे त्यांना आणि त्यांच्या पत्नी प्रतिभाताईंना माहीत. राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर देशातील राजकारणाच्या केंद्रबिंदू राहणे हे पवार यांना नेहमीच आवडलेले आहे. त्यांनी राजीनामा का दिला, याबद्दल शक्यतांचा बाजार सध्या गरम आहे. तो सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत कायम ठेवला जाईल. या निर्णयाचा जो तो आपआपल्या परीने तर्कवितर्क लढवत आहे. या विचारांच्या रणधुमाळीत आपणही एक तर्क मांडायला हरकत नाही.

पवार यांनी सोडलेले पक्षप्रमुखपद ही एक खेळी सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. त्यांनी असे का केले? त्यामागील कारण काय? ते पुढे काय करतील? असे अनेक प्रश्न सध्या राजकारणात रस असलेल्या आणि नसलेल्यांच्या मनात घोंघावत आहेत. देशातील काँग्रेस, भाजप, आणि कम्युनिस्ट हे तीन प्रमुख पक्ष हे एका विचारधारेवर निर्माण झाले आहेत. त्यानंतर तयार झालेले सर्व पक्ष हे प्रादेशिक आणि व्यक्तीकेंद्रीत आहेत. त्यामुळे त्या व्यक्तीच्या अस्तानंतर या पक्षांचा अस्त होणे हे स्वाभाविक मानले जाते. या पक्षात दुसऱ्या फळीतील सक्षम नेतृत्त्व त्याच काळात निर्माण झाल्यास ही धुरा पुढे घेऊन जाता येते. राज्यात उद्धव ठाकरे यांनी हे दाखवून दिले आहे तर आंध्र प्रदेशात जगन मोहन रेड्डी यांनी वडिलांच्या पुण्याईवर आपलं स्थान निर्माण केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पवार यांनी दुसरी फळी निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर त्यात वावगे काय? पवार साहेबांचे हे राजीनामानाट्य हे अजितदादांना वेसण घालताना खासदार कन्या सुप्रिया सुळे यांना प्रस्थापित करण्यासाठी आहे.

सर्व प्रादेशिक पक्ष हे एका प्रायव्हेट लिमिटेड कंपनीसारखे असतात. त्या कंपनीचे संचालक हे घरातील किंवा निकटवर्तीय (प्रफुल्ल पटेलसारखे) राहवे हा प्रत्येक कंपनी स्थापन करणाऱ्या मालकाचा कटाक्ष असतो. तोच हेतू प्रत्येक प्रादेशिक पक्ष स्थापन करणाऱ्या पक्षप्रमुखांचा आहे. भाजपने देशातील प्रादेशिक पक्ष संपवण्याचा विडा उचलला आहे. त्यात गैर काही नाही. आपल्या पार्टीचा विस्तार करण्यासाठी कोणाला तरी संपवावे लागते. आपली रेष मोठी करताना दुसऱ्यांची रेखा छोटी होणारच. भाजपला महाराष्ट्रात आपलं वर्चस्व सिद्ध करताना काँग्रेस, राष्ट्रवादी आणि जुनी शिवसेना संपवणे हा एकमेव कार्यक्रम आहे. पूर्वी युद्धात आणि प्रेमात सर्व क्षम्य आहे असं म्हटलं जायचं. आता राजकारणात सर्व माफ आहे अशी नवी म्हण प्रचलित झाली आहे.

राज्यातील शेकडो शिलेदारांना घेऊन पवार यांनी पक्ष स्थापन केला आहे. त्यातील अनेक शिलेदार यापूर्वीच पवारांची साथ सोडून भाजपच्या आश्रयाला गेले आहेत. उरलेसुरले जाण्याच्या बेतात होते. शिवसेनेत जे भगदाड पडलं, त्याची पूर्वकल्पना पवार यांना नव्हती अशी कबुली त्यांनी नुकतीच दिली आहे. दुधाने तोंड भाजल्याने ताक पण फंकून प्यावे असे म्हणतात. राष्ट्रवादीतील उभी फूट टाळायची असेल तर अशा प्रकारचा “हाय व्होल्टेज ड्रामा” आवश्यक होता. पवारांनी त्यांचे पुतणे अजित पवार यांचा दोन वेळा अपेक्षाभंग केला आहे. “घर का भाई लंका ढाई” असं म्हटलं जातं. रावणाचा भाऊ फुटला नसता तर रावणाला पराजित करणे प्रभू रामांना पण शक्य झालं नसतं.

पवार

राज्यात काका-पुतण्याच्या नात्याला शाप जुना आहे. ते संभाव्य बंड थंड करण्यासाठी पवार यांनी हा चक्रव्यूह रचला असून यातून भल्याभल्यांना बाहेर पडणे शक्य होणार नाही. महाभारतात रचण्यात आलेल्या चक्रव्यूहात अर्जुनपुत्र अभिमन्यू अडकला. पवारांच्या या चक्रव्यूहात अजितदादा अडकले आहेत. पुतणे बेभरवशाचे असतात. राक्षसी महत्त्वाकांक्षेपोटी ते काहीही करू शकतात. या पुतण्यांपासून स्वतः उभारलेले घर वाचवायचे असेल तर अशा प्रकारची खेळी आवश्यक होती. पवार आणि महाराष्ट्र असे एक समीकरण देशात सर्व परिचित आहे. या महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर देश पातळीवर देशाला माहीत असलेले महाराष्ट्राचे दोनच राजकारणी म्हणता येतील. एक बाळासाहेब ठाकरे आणि दुसरे शरद पवार. ठाकरे यांच्या हयातीत दोन वेळा मोठ्या प्रमाणात पक्ष फुटला. पवार यांच्या हयातीत 22 वर्षांतच या पक्षाची शकले होऊ नयेत यासाठी ही धरण दरवाजा बंदी पवारांनी हाती घेतली आहे.

देशात मूठभर खासदारांच्या जीवावर देवेगौडा, इंद्रकुमार गुजराल, व्ही. पी. सिंग पंतप्रधान होऊ शकतात तर आपण का नाही असा विचार करुन पवारांनी राष्ट्रीय पातळीवर आपली छबी तयार केली. 22 वर्षांत अनेक राजकीय समीकरणे बदलली. मोदी उदयानंतर आता पंतप्रधान होणे आणि वयपरत्वे धूसर दिसू लागल्याने पवारांना मुलीला किमान आपल्या हयातीत मुख्यमंत्री झालेलं पाहण्याची इच्छा आहे. मुलीवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक बापाची हीच इच्छा असते. राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री अर्थात सुप्रिया (पवार) सुळे यांच्या माध्यमातून पवारांनी हे स्वप्न पाहिले आहे. पवारांनी महिलांना नेहेमीच आदराचे स्थान दिले आहे. राज्यात राजकीय महिला आरक्षण देण्याचा मान त्यांना आहे. मुलीच्या राजकीय पुनर्वसनात अजित नावाचा काटा रुतू लागला आहे. हे लक्षात आलेल्या राजकारणातील भीष्माचार्य पवारांनी त्याला अलगद बाजूला करण्यासाठी ही चाणाक्ष खेळी केली आहे. त्यामुळे त्यांनी एका दगडात पक्ष मजबुतीकरण, अजितदादांना धडा, मुलीची राजकीय स्थिरता आणि आजही राज्यावर असलेला वचक असे अनेक पक्षी मारले आहेत.

काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांचा परदेशी असण्याचा मुद्दा काढून काँग्रेसपासून फारकत घेणाऱ्या पवार यांनी दुसऱ्याच वर्षी राज्यात काँग्रेससोबत सत्ता काबीज केली. पुलोदचा प्रयोग करतानाही त्यांना जनता पक्ष वर्ज्य नव्हता. पवारांना राजकारणात काहीही अस्पृश्य नाही असे म्हटले जाते. मुलीला मुख्यमंत्री भाजप करणार असेल तर पवार आपली संपूर्ण शक्ती लावायला तयार आहेत. शिवसेना वंचितबरोबर आघाडी करू शकत असेल तर मला कोणताच पक्ष वर्ज्य नाही हे ते दाखवून देणार आहेत. ठाकरे यांची वाढलेली व्होट बँकदेखील पवार यांची चिंता आहे. राज्यात पुतण्यापेक्षा पुत्री किंवा पुत्रप्रेम महत्त्वाचे ठरते हा इतिहास आहे.

अदानींबरोबर घेतलेल्या भेटीचे गूढही काही दिवसांनी उकलणार आहे. सुप्रियाताईंसाठी रेड कार्पेट अंथरले जाणार आहे. तुम्ही आम्हाला खासदार द्या आम्ही तुम्हाला आमदार देतो,  राज्य देतो अशी ही डील ठरली आहे. अदानींचे अनेक मोठे प्रकल्प राज्यात आहेत. त्यांना आयाम देण्यासाठी मोदींचा माणूस गादीवर बसविला जाणार आहे. पवारांपेक्षा दुसरं कोणी या राज्यात असू शकणार नाही हे मोदी-शाह यांना माहीत आहे. टाटा, बिर्ला आणि अलीकडचे अंबानी यांनीही निवृत्ती घेऊन आपल्या कंपन्यांचा विस्तार त्यांच्या दुसऱ्या पिढीकडून करुन घेतल्याची उदाहारणे डोळयासमोर आहेत. पवार यांनी राजीनामा परत न घेता तो कायम ठेवला तरी पक्ष त्यांच्या मर्जीप्रमाणे चालणार आहे.

पक्षाचा राष्ट्रीय दर्जा काही दिवसांपूर्वी गेला आहे. त्यामुळे प्रादेशिक नेतृत्त्वासाठी अजितदादा यांच्या गळ्यात ही माळ पडल्यास ते हा पक्ष आणखी वाढवतील, अशी अपेक्षा करायला हरकत काय आहे? दादांमध्ये ती धमक आहे. कोणाच्याही घरातील आजोबा, काका, मोठे बाबा थकलेभागले असतील आणि तरीही त्यांना शेतात पाठवलं जाणार असेल तर ते योग्य नाही. त्यांना आराम करायला सांगून त्यांच्या मार्गदर्शनाखाली शेती करणे योग्य आहे. त्यातच सर्वांचं भलं आहे. पवार साहेबांना आजही शेतात पाठवण्याची मानसिकता नेत्यांची आहे. त्यांच्या जीवावर त्यांना निवडून यायचं आहे. उलट साहेब आता तुम्ही आराम करा आम्ही पक्ष वाढवून आगामी विधानसभेत तुम्ही सांगा त्यांना या पक्षाचा आम्ही पहिला मुख्यमंत्री बनवतो असं वचन राष्ट्रवादी नेत्यांनी दिलं असतं तर ते अधिक संयुक्तिक झालं असतं. त्याऐवजी बायकांसारखे नेते रडत होते, हे दृश्य केविलवाणे होते.

महाराजांचे मावळे असे रडत बसले असते तर खरंच स्वराज्य स्थापन झाले असते का? राजकारण आणि समाजकारण पवार यांचा श्वास आहे. तो ते बंद होऊ देणार नाहीत. असं म्हणतात पवार यांचे राजकारण 24×7चे आहे. ते झोपले तरी त्यांचे डोकं राजकीय आराखडे मांडत असतं. राष्ट्रवादीच्या स्वार्थी नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी किमान पवार यांच्या प्रकृतीचा विचार करुन त्यांच्यावर प्रेम असेल त्यांची निवृत्ती मान्य करायला हरकत नाही…

Continue reading

संवेदनशून्य समाजाकडून अपेक्षा ती काय ठेवावी?

मुंबईतील शिवसेना ठाकरे गटाचे  माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गुरुवारी निर्घृण हत्त्या झाली. त्यावरून शिवसेनेच्या ठाकरे-शिंदे या दोन गटात तीन दिवस आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या. त्यात आपल्याला जायचं नाही. कारण राजकारण्यांचा तो धंदा आहे. आजच्या संवेदनशून्य समाजाकडून अपेक्षा ती काय ठेवावी?...
Skip to content