मुंबईतील शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गुरुवारी निर्घृण हत्त्या झाली. त्यावरून शिवसेनेच्या ठाकरे-शिंदे या दोन गटात तीन दिवस आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या. त्यात आपल्याला जायचं नाही. कारण राजकारण्यांचा तो धंदा आहे. आजच्या संवेदनशून्य समाजाकडून अपेक्षा ती काय ठेवावी? महाराष्ट्रातील जनतेला *****(मूर्ख) बनवण्याचा. हे राजकारणी एकमेकांवर कितीही आरोप प्रत्यारोप करु दे, पण एकमेकांच्या शुभ-अशुभ कार्याला बघा कसे आवर्जून उपस्थित राहतात ते.. उदाहरण द्यायचं झालं तर विधान परिषदचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे व राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्या मुलांची लग्न बघा. किंवा राज ठाकरे यांच्या घरी गणपती दर्शनाला मान्यवरांची लागणारी रीघ बघा. तर सांगायचा मुद्दा हा की राजकारणी जे आरोप-प्रत्यारोप करतात ते तमाम जनतेला मूर्ख बनवण्यासाठी असतात. त्यांच्या बोलण्याचा उलटा अर्थ काढावा ही मनाशी पक्की खूणगाठ बांधून घ्या.
प्रत्येक पक्षाचा कार्यकर्ता बाह्या वर करुन भांडत असतो आणि नेते संध्याकाळी फोनवर “कशी तुझी ठासली, सॉरी हं यार बोलावं लागते” असं बोलून एकमेकांचे सांत्वन करीत असतात. असो. या राजकरण्याच्या दुटप्पीपणावर एक ग्रंथ लिहिता येईल. तेव्हा दिवंगत घोसाळकरवर आणखी चार-पाच दिवस आरोप-प्रत्यारोप होतील आणि नंतर हे प्रकरण अडगळीत टाकले जाईल. पोलिसही हया प्रकरणाचा छडा लावणार नाहीत कारण काही प्रकरणेही उघड न करणे समाजहिताचे असते, असे मला एका पोलिस उच्च अधिकाऱ्याने एका राजकीय हत्त्या प्रकरणात सांगितले होते. तर हया घोसाळकर प्रकरणाचे जे काही व्हायचं ते होईल आपल्या दृष्टीने एक महत्त्वाचा मुद्दा घोसाळकर हत्त्या प्रकरणाने समोर आला आहे. तो म्हणजे आजच्या कलियुगात माणुसकी पार मरून गेली आहे. तिची हत्त्या झाली आहे.
माझ्या एका निरीक्षणानुसार मुस्लिम व ख्रिश्चन समाजात आत्महत्त्या प्रमाण अतिशय नगण्य आहे. पण मॉरिस नरोन्हाने आत्महत्त्या केली. आपल्या ऑफिसमध्ये गोड बोलून अभिषेकला बोलविण्यात आले आणि एका बेसावध क्षणी त्याला गोळ्या घालण्यात आल्या. त्याचा निर्घृण खून करण्यात आला. हे ईश्वरा, ह्यांना माफ कर, ते काय करीत आहेत, ते त्यांना माहीत नाही. अशी शेवटच्या क्षणी मारेकऱ्यासाठी प्रार्थना करणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या शिकवणुकीला मॉरिसच्या कृतीने हरताळ फासला. सर्वांवर प्रेम करा ही शिकवण मॉरिस कधी चर्चमध्ये शिकला नाही. अतिथी देवो भव ही एक भारतीय म्हणून त्याच्याकडून अपेक्षा ठेवणे गैर ठरलं. या हत्त्येमुळे माणुसकी संपली आहे याचा प्रत्यय आला.
तशी ती मिरा-भाईंदरमधील हत्त्याकांडानंतर अधोरिखित झाली आहे. एक माणूस प्रियेसीचे तुकडे करून फ्रिजमध्ये कसे ठेऊ शकतो? सर्वच अनाकलनीय आहे. तेव्हा माणुसकी संपली ह्यावर ठाम मत तयार झालं आहे. घोसाळकर हत्त्या प्रकरणाने काही गोष्टी सर्वांनी मनावर कोरून ठेवण्याची गरज आहे. एक ज्याच्याबरोबर वैमनस्य निर्माण झाले आहे ते तसेच फ्रिजमध्ये ठेऊन द्या. समजा त्याच्याबरोबरचा प्रवास तेवढाच होता. कोणाच्या सांगण्यावरून ते नाते पूर्ववत करण्याचा प्रयत्न करू नका. समोरच्याच्या मनात काय आहे, हे तुम्हाला काय ईश्वराला पण सांगता येणार नाही. अन्यथा चेहऱ्यावर हास्य दाखवणाऱ्या मॉरिसने अशा गोळ्या झाडल्या नसत्या.
दुसरी बाब. अशा व्यक्तीच्या घरी किंवा ऑफीसला जाऊ नका. कदाचित घोसाळकर मॉरिसला चारचौघात भेटले असते तर त्यांची हत्त्या झाली नसती. नियतीच्या खेळानुसार जरी मॉरिसने गोळ्या झाडल्या असत्या तरी चारचौघात वैदाकीय मदत लवकर मिळू शकली असती. घोसाळकर यांचा मृत्यू होण्यामागे (त्यांना वेळीच म्हणजे रिक्षावाले पण थांबायला तयार नव्हते.) तत्काळ मदत न मिळणे हे कारण आहे. इथे माणुसकी मेली आहे. पोकलेनने खड्डा खणताना पाच-पन्नास लोकं तो खड्डा ती मशीन कशी खोदते हे पाहण्यासाठी उभ्या राहणाऱ्या हया भारतात आता रस्त्यावर जखमी अथवा तडफणाऱ्या माणसाचे आपल्या मोबाईलवर चित्रिकरण करणाऱ्या संवेदनशून्य समाजाकडून अपेक्षा ती काय ठेवावी?