Homeन्यूज अँड व्ह्यूजमुख्यमंत्री एकनाथरावांच्या 'आनंदावतारा'चा...

मुख्यमंत्री एकनाथरावांच्या ‘आनंदावतारा’चा खासदार म्हस्केंनाही ‘प्रसाद’?

गुरुवारी गौरीविसर्जनाच्या दिवशी संध्याकाळ व रात्रीच्या सुमारास धर्मवीर आनंद दिघे यांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या आनंदाश्रमात ढोलताशांच्या गजरात केलेल्या नोटांच्या उधळणीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कधी नव्हे इतके संतप्त झाले असून त्यांनी आनंदाश्रमाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना धारेवर धरल्याचे वृत्त आहे. मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय समजले जाणारे खासदार नरेश म्हस्के हेही यातून सुटले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.

खरंतर विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी सगळ्याच वर्तमानपत्रांनी या बातमीस ठळक प्रसिद्धी दिली होती. बातमी पाहताच सकाळी सकाळी एकनाथरावांचा पारा चढला होता. काहीतरी कारवाई करण्याचा बेत त्यांच्या मनात शिजत असतानाच साखळी 11 वाजण्याच्या सुमारास त्या नोटांच्या उधळणीची चित्रफीत सर्वत्र प्रसारित झाल्यावर मात्र त्यांचा पारा टिपेला पोहोचला. त्यांच्यासमोर जाण्याचे धैर्य त्याक्षणी तरी कुणाकडेच नव्हते. ते आतल्या आत धूमसत होते. या संतापाच्या वेळी जणू त्यांनी ‘आनंदावतार’ घेतल्याचे तेथे हजर असलेल्यानी सांगितले.

खरंतर मुख्यमंत्री टोकाचे भडकत नाहीत. भडकले की ते सर्वांना केबिनबाहेर घालवून काही मिनिटे एकटेच शांत बसलेले दिसतात. पण ते आतून कमालीचे भडकलेले असतात, असा त्यांच्या मित्रांचा अनुभव आहे.

“जो जो उठे तो तो नेता|

मारी लंब्याचवड्या बाता;

परी हुल्लडीचा नियंता|

कुणी नाही|(मर्ढेकर)

असे मात्र काहीही न होता चित्रफीत पाहिल्यावर त्या आऊ नामक कार्यकर्त्याची शिवसेना पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. इतर राजकीय पक्षांप्रमाणे चौकशी करू, समिती नेमू आणि समितीचा अहवाल आल्यावर कारवाई करू, असा लंबाचवडा प्रवास टाळून अवघ्या 24/30 तासांत निर्णय घेऊन आम्ही कठोर कारवाईही करू शकतो हे त्यांनी दाखवून दिले. त्यासाठी मुख्यमंत्र्यांचे अभिनंदनच केले पाहिजे.

खरंतर आनंदाश्रमाचा विषय आमच्या मनात गेले वर्षभर घोळत होता. कारण दररोज नसले तरी आम्ही कोर्ट नाका व जिल्हधिकारी कार्यालय परिसरात नियमित जात असतो. अत्यन्त वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या आनंदाश्रमात नेहमीच गर्दी असते. खासदार वा अन्य नेता येणार असेल तर गर्दी प्रचंड वाढत असते. साहजिकच गर्दीच्या मानाने आश्रम कमी पडतो. तरी मुख्यमंत्री कार्यकर्त्यांना आपल्या निवासस्थानीच भेटत असल्याने गर्दीचा व शिस्तीचा प्रश्न सुटत असला तरी कार्यकर्त्यांना आनंदाश्रमच बरा पडतो. कारण जिल्हाधिकारी कार्यालय, महापालिका कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय व शासकीय विश्रामधाम तसेच सर्व सरकारी कार्यालये जवळपासच आहेत. परंतु आनंदाश्रमास शिस्तीचे बरेचसे वावडेच असल्याचे दिसून आले आहे.

ठाणे शहरातील व जिल्ह्यातील दुसऱ्या फळीतील नेत्यांचा हा मीटिंग पॉईंटचा पत्ता असून आता कार्यकर्ता म्हटले की त्याची चौकशी थोडीच केली जाणार? कार्यकर्त्यांच्या कपाळावर थोडीच हा सज्जन, हा दुर्जन, हा काम घेऊन आलेला आदी स्टिकर असतात? आणि नेतेही मग ते पहिल्या फळीतील असोत वा दुसऱ्या फळीतील, त्यांच्याबरोबर किमान 10/15 कार्यकर्ते असतातच. या कार्यकर्त्याची गर्दी त्याहून नेत्यांच्या कामाची गर्दी या गर्दीमुळेच अनेक कामांची ‘वाटच’ चुकते!

शहरात व जिल्ह्यात सवतेसुभे

सध्या एकनाथ शिंदे यांच्या पक्षात सर्वांनाच सामावून घेता आले नसल्याने अनेक स्थानिक भाईंमध्ये ‘शीतयुद्ध’ सुरु असल्याचे समजते. पक्षात वागळे इस्टेट, कोपरी, नितीन कंपनी परिसर, लुईस वाडी, वर्तक नगर आदी भागांना नको इतके महत्त्व देण्यात येत असून खोपट मानपाडा, बाळकूम, कासरवडवली, गायमुख, काल्हेर, चितळसर आदी अनेक भागांना कुणी विचारतच नाही, अशी परिस्थिती आहे. घोडबंदर येथील अनेक समस्यांबाबत कुणी नेता काही बोलतच नाही अशी ‘नकोशी’ परिस्थिती आहे. तसेच आमदार व प्रमुख नेत्यांमध्येही खलबली आहे. अनेक माजी आमदारांनीही तिकिटासाठी फिल्डिंग लावल्याने अनेकांना पोटदुखीचा आजार सूरु झाला आहे. शिवसेनेवर होणाऱ्या टिकेला कुणी प्रत्युत्तर द्यायचं हीही समस्या आहे. या सर्वातूनच…

“करा रे खुशाल करा हवा तो राडा

धम्माल करण्याचा जमाना आहे…

हवामान चांगले आहे, फेस्टिव्हल कार्निव्हलचा सिझन आहे

सहनशील आहेत समजूतदार गांडू” (शांताराम)

अशी एकूणच समाजाची धारणा असून…

“मस्तली इच्छेची काया| ईर्षा अंहता असुया

बोचती जैशा की सुया| इंजेक्शआनी|| (मर्ढेकर)

अशी थोडक्यात शिवसेनेची अंतर्गत परिस्थिती असून

“मतामतांचा गलबला| कोणी पुसेना कोणाला

जो जे मती सापडला| तयास तेची थोर’ (समर्थ रामदास)

याची उदंड भर पडलेली असून निवडणुकीच्या काळात यांचा ‘भार’ पडू नये हीच इच्छा! बाकी एकनाथराव समर्थ आहेतच!!

छायाचित्रः प्रवीण वराडकर

Continue reading

मराठी पाऊल.. किती काळ गाणार ही रुदाली?

या आठवड्याच्या प्रारंभी कविवर्य महेश केळुस्कर यांच्या 'जय भवानी, जय शिवाजी' या राजकीय कादंबरीचे ऍड. राजेंद्र पै यांच्या हस्ते प्रकाशन झाले. यानिमित्ताने डिम्पल प्रकाशन व बोधगया यांनी 'मराठी पाऊल पडते पुढे-मागे' या नेहमीच्याच विषयावर चर्चा ठेवली हॊती. कादंबरी प्रकाशित...

‘राडा’ संस्कृतीवरचा मुख्यमंत्र्यांचा उतारा होईल का पुरेसा?

कालच्या गुरुवारी राज्य विधिमंडळ परिसरात व नंतर विधिमंडळाच्या लॉबीत दोन आमदारांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेली झटापट तसेच हाणामारी लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अखेर आमदारांचे 'कान' टोचावेच लागले. 'जनता म्हणते की, आमदार माजले आहेत' हे आपण आपल्या वर्तनावरून जनतेला दाखवून...

पुन्हा छत्रपतींचा एक नवा पुतळा प्रस्तावित!

दोनच दिवसांपूर्वी राज्य विधिमंडळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (पूर्वीचे बोरीबंदर) या रेल्वेसंकुलात छत्रपतींचा अश्वारूढ पुतळा उभारला जाणार असल्याची घोषणा केली. बोरींबंदर रेल्वेस्थानकाचा पुनर्विकास होत आहे, अनेक नवीन गोष्टी उभ्या राहत आहेत हे मान्य आहे व...
Skip to content