Homeटॉप स्टोरीनवाब मलिक यांच्या...

नवाब मलिक यांच्या चौकशीच्या मागणीला मुख्यमंत्र्यांकडून वाटाण्याच्या अक्षता?

एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्याविरूद्ध राज्य सरकारने एसआयटीमार्फत चौकशी करण्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या मागणीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वाटाण्याच्या अक्षता लावल्याचे समजते. याप्रकरणी वेगवेगळे गुन्हे दाखल असून पोलीस त्याचा तपास करत आहेत. त्यातून काय निष्पन्न होते ते पाहून एसआयटी नेमण्याबाबत निर्णय घेऊ, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे स्वतः नवाब मलिक यांनीच प्रसिद्धीमाध्यमांना सांगितले.

क्रूझवरील ड्रग्ज पार्टीच्या माध्यमातून राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री व राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक आणि समीर वानखेडे यांच्यातल्या वादावर ठिणगी पडली. या प्रकरणातले पंच किरण गोसावी खंडणीखोर असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला. गोसावी सध्या फरार आहेत. त्यापाठोपाठ याच प्रकरणातील अन्य एक पंच व गोसावींचे बॉडीगार्ड प्रभाकर साईल यांनी एका प्रतिज्ञापत्राद्वारे विविध स्वरूपाचे गंभीर आरोप एनसीबीच्या कारवाईवर केले. या प्रकरणात शाहरूख खान यांच्याकडून २५ कोटी रूपयांची खंडणी मागितली गेली. सारा मामला १८ कोटींवर निश्चित झाला. त्यातील आठ कोटी वानखेडे यांना दिले जाणार होते. कोऱ्या कागदांवर आपल्या सह्या घेतल्या गेल्या, असे अनेक गंभीर आरोप साईल यांनी केले. त्यानंतर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी साईल यांना पोलीस संरक्षणही पुरवले आहे.

मलिक

साईलकडून हे आरोप होत असतानाच नवाब मलिक यांनी त्यांचे जावई जामीनावर सुटल्याच्या निमित्ताने एनसीबीवर जोरदार टीका केली. एनसीबीच्या कारवाईमुळे त्यांचे जावई तब्बल आठ महिने गजाआड होते. एनसीबीचे येथील प्रमुख समीर वानखेडे यांना लक्ष्य करत त्यांनी रोजच्या रोज नवनव्या आरोपांची राळ उठवली आहे. साईल प्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यांच्या आधारे वानखेडे यांची तसेच या ड्रग्ज कारवाई प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करावी, अशी मागणी मलिक यांनी केली होती. शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनीही तशीच मागणी केली होती. आज मलिक यांनी याचप्रकरणी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर ते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले.

मुख्यमंत्र्यांना भेटल्यानंतर त्यांनी प्रसिद्धीमाध्यमांना सांगितले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एनसीबीच्या या कथित कारवाईबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आहे. हॉलीवूडनंतर जगात बॉलीवूडला ओळखले जाते. मात्र, रिया चक्रवर्तीच्या चौकशीपासून आतापर्यंत जवळजवळ २५ अभिनेते-अभिनेत्रींची ड्रग्जप्रकरणी चौकशी झाली आहे. बॉलीवूडला, मुंबईला कोणी बदनाम करत असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही. आज देशाच्या जीडीपीत ३ ते ४ टक्क्यांचा वाटा बॉलीवूडचा आहे. त्यामुळे यावर आपण स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिणार आहोत. वानखेडे प्रकरणी विविध ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत. पोलीस त्याचा तपास करत आहेत. या तपासात काय निष्पन्न होते ते पाहू आणि एसआयटीमार्फत चौकशी करू असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.

समीर वानखेडे यांनी जातीचा बनावट दाखला देऊन नोकरी मिळवल्यामुळे एका मागासवर्गीय उमेदवाराची नोकरी गेली, असा आरोपही मलिक यांनी केला आहे. याविरूद्ध अनेक मागासवर्गीय संघटना जातपडताळणी समितीकडे तक्रार करणार आहेत. तेव्हा त्या प्रकरणीही चौकशी होईल, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, प्रभाकर साईल यांच्या आरोपांनंतर दिल्लीत गेलेले समीर वानखेडे यांच्या भूमिकेची चौकशी करण्यासाठी एनसीबीच्या दक्षता विभागाने तीन जणांच्या एका पथकामार्फत चौकशी चालू केली आहे. आज वानखेडे यांनी दिल्लीत एनसीबीच्या प्रमुखांचीही भेट घेतल्याचे कळते. तेथून ते पुन्हा मुंबईकडे परतल्याचे बोलले जाते.

Continue reading

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...
Skip to content