बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील परळ परिसरात असणाऱ्या प्रभाग क्रमांक २०४मधील नागरीकांकरिता प्रथम प्रतिसादक प्रशिक्षण कार्यक्रमाचा (First Responder Training Programme) उद्घाटन समारंभ सोमवार, दि. ४ जानेवारी रोजी अतिरिक्त महापालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे.
आपत्कालीन प्रसंगी करावयाची मदत याबाबत प्रथम प्रतिसादक प्रशिक्षण महापालिकेतर्फे देण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण नागरिकांना विभाग निहाय पद्धतीने व टप्प्याटप्प्याने दिले जाणार आहे. बृहन्मुबंईमध्ये घर / घराचा भाग पडणे, शॉर्टसर्किट, आगी लागणे आदी प्रकारच्या छोटया-मोठया घटना घडत असतात. त्यामध्ये नागरिक जखमी / मृत होण्याची शक्यता असते. या सर्व घटनांची माहिती प्राप्त होताच आवश्यक यंत्रणांना तत्काळ कार्यन्वित केले जाते. परंतु, मदतयंत्रणा पोहोचण्यापूर्वी अनेक वेळेस जीवितहानी होण्याची शक्यता असते.
अशाप्रकारच्या घटना घडल्यानंतर जीवित व वित्त हानी कमीतकमी होण्याच्या दृष्टीने आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी काय करावे, याबाबतची प्राथमिक माहिती व प्रशिक्षण असणे आवश्यक आहे. यासाठी सोमवार दिनांक ०४.०१.२०२१ रोजी सकाळी ठीक ११ वाजता महानगरपालिकेचे नगरसेवक अनिल कोकीळ यांच्या प्रभाग क्रमांक २०४मधील नागरिकांकरिता ‘प्रथम प्रतिसादक प्रशिक्षण कार्यक्रम’ आयोजित करण्यात आला असून याचा उद्घाटन समारंभ ‘शहर आपत्ती व्यवस्थापन व प्रशिक्षण केंद्र, साईबाबा पथ, परळ’ येथे आयोजित करण्यात आला आहे.
या प्रशिक्षण कार्यक्रमास खासदार अरविंद सावंत, स्थानिक आमदार अजय चौधरी, महापालिका अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी, प्रभाग समिती अध्यक्ष रामदास कांबळे, उपायुक्त (आपत्ती व्यवस्थापन) प्रभात रहांगदळे आदी उपस्थित राहणार आहेत. कोविड-१९चा प्रादुर्भाव लक्षात घेता सुरक्षिततेचा उपाय म्हणून प्रभागातील ५० नागरिकांना या प्रशिक्षणात सहभागी करुन घेण्यात येणार आहे.

