गुंतवणूक करायची तर “झोमॅटो” सबस्क्राईब करा! 72 ते 76 ₹ प्राईसबँड.. अप्पर प्राईस 76ला सबस्क्राईब करा. आज ओपन झाला आहे आणि 16 जुलैला ऑफर क्लोज होईल. कमीतकमी 195 शेअर्स म्हणजे 76X195 = 14,820ची गुंतवणूक करा. चुकून शेअर 76च्या खाली लिस्ट झाला तरी नुकसान फार नाही. अर्थात अशी शक्यता अत्यंत कमी आहे.
लॉकडाऊन काळातील कंपनीची कामगिरी, त्या काळात वाढलेली मागणी आणि टिकून राहिलेला कस्टमर बेस याचा फूड एग्रीगेटर कंपन्या झोमॅटो आणि स्विग्गी यांना नक्कीच फायदा झाला आहे. हे बिझनेस मॉडेल अजून तोट्यात असले तरी कंपनीचे मूल्यांकन 40 हजार कोटींवर गेले आहे. लॉकडाऊन काळात “झोमॅटो”चे उत्पन्न गेल्या आर्थिक वर्षापेक्षा तब्बल 2,960 कोटींनी वाढले आहे. टायगर ग्लोबल, कोरा अशा गुंतवणूकदारांनी यात अलीकडेच 1,800 कोटी गुंतवले आहेत.
बेहरोज बिर्याणी, फासोस, ओव्हन स्टोरी पिझ्झा, फिरंगी बेक, मंड्रियन ओक यासारखे अव्वल फूड ब्रँड्स फक्त ऑनलाईन विकणारी भारतातील सर्वात मोठी क्लाऊड किचन कंपनी “रिबेल फुड्स”चेच मूल्यांकन आज 14,000 कोटींवर पोहोचले आहे. लिस्टिंग गेन किंवा शॉर्ट टर्म, स्विंग गेन आपल्याल्या “झोमॅटो”त मिळतीलच, यात काही शंका नाही. याशिवाय, दीर्घकाळ टिकून राहिलात तर करोडपतीही व्हाल.
कसे? हे लॉजिक समजून घ्या- 2010मध्ये 145च्या आसपास लिस्ट झालेल्या “डॉमिनोज पिझ्झा”वाल्या “ज्युबीलिएंट फूडवर्क्स”ने गेल्या 10 वर्षांत एका शेअरवर तब्बल 3,000 म्हणजे 2500 पट अधिक पैसे गुंतवणूकदारांना मिळवून दिले आहेत. तेव्हा हा 40 शेअर्सचा लॉट होता. ज्यांनी IPO मध्ये 5,800 ₹ गुंतविले, त्यांचे आज 1,30,000 रुपये झाले आहेत. म्हणजेच तेव्हा एक लाख रुपये गुंतविले त्यांना दहा वर्षांत सव्वा दोन कोटी रुपये मिळाले.
कुणी कितीही सांगत असले झोमॅटो ओव्हरप्राईस्ड आहे वैगेरे.. तरी दुर्लक्ष करा. लक्षात ठेवा अप्पर प्राईज 76 आणि कंपनीचा सेक्टर फूड, ज्याची डिमांड सदैव कायम राहणार आहे. हे पाहता डाऊन साईड रिस्क अगदी कमी आहे. तुलनेने अपसाईड पॉसीबिलिटीज अमर्याद आहेत. नुकसान झालेच तर कमीच होईल. पण फायदा रग्गड होईल. इतकं तुम्हाला बिझनेस चॅनेल सांगणार नाहीत, कारण तुम्ही संभ्रमित राहिलात तर विशिष्ट वर्गाला लिस्टिंग गेन घेता येतात किंवा तुम्हाला संभ्रमित, दोलायमान ठेवून स्विंग मॉनीटायझेशन करून बाहेर पडता येते. फसायला नंतर तुम्ही आहातच.
आणखी एक, शेअर बाजारात गुंतवणूक करताना कोणत्याही बिझनेस चॅनल्सवरील कोणतेही टीप, ट्रेडिंग शोज पाहू नयेत. ही चॅनल्स पाहावीत, पण आपले बेसिक, फंडामेंटल ज्ञान वाढविण्यासाठी. बाजाराप्रती आपली समज वाढावी म्हणून. एक पक्के लक्षात ठेवा, की तुम्हाला गुंतवणूक करायची आहे- तीही चांगल्या स्टॉकमध्ये. शक्यतोवर निफ्टी 100, बीएसई 200 फारतर.. ए, बी आणि फारतर सी ग्रुप शेअर्स आणि नवीन, भक्कम, चांगल्या सेक्टरमधील आयपीओ.
बिझनेस चॅनल पाहून व्यवहार करायला जाल, तर तुम्हाला तो फायद्याचा मोमेंटम कधीच सापडणार नाही. स्टॉक तुम्ही घ्याल तो वर चढलेल्या चढ्या किमतीत. टीप आणि आयडियाज हा विषय डोक्यातून काढून टाका. ज्या वस्तू आपण वापरतो, जे आपल्याला माहिती आहे; मग ती सेवा असेल, ब्रँड असेल, अशात गुंतवणूक करा. आपलं रोजचं जगणं कसं असतं?- Every meal matters आणि Never have a bad meal. जगण्यात Meal रोज असतं, 2-3 वेळा. शिवाय, ते चांगलं असावं, ही अपेक्षा असते. आपला हा जो सिंपल फंडा आहे, तोच Zomato चा व्यावसायिक मोटो आहे. त्यामुळे बिनधास्त जा आणि “Shaping the future of food” मध्ये भागीदार, मालक व्हा!
इंडियन स्टॉक मार्केट हे कंझ्युमर फूड्स आणि अलाईड/रिलेटेड सेक्टर स्टॉक्सना नेहमीच फेव्हरेबल राहिलेले आहे. या क्षेत्रातील नेस्ले, ब्रिटानिया, ITC, टाटा, हटसन, गोदरेज हे बडे दिग्गज स्टॉक सोडून द्या. अवंती फीड्स, टेस्टी बाईट, वॉटरबेस अशा स्टॉकनेही गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. अवंती फीडस हा 1 रुपये 66 पैशांचा शेअर दहा वर्षांत 570 वर पोहोचला. किती होते रिटर्न? 34,200%! म्हणजे ज्यांनी 2009मध्ये यात एक लाख रुपये गुंतविले त्यांना आज किती मिळणार आहेत- तब्बल साडे तीन कोटी रुपये! टेस्टी बाईट्स दहा वर्षांत 165वरून 8,500 म्हणजे तब्बल 5,000% रिटर्न. वॉटरबेस साडेचार रुपयांवरून 140 रुपये म्हणजे दहा वर्षांत 3,000% गुंतवणुकीवर परतावा.
शेअर बाजारापासून आपण दूर राहणे योग्य नाही. फक्त एक गोष्ट करा- कुणी कितीही सांगितले, कितीही रम्य स्टोरीज ऐकविल्या तरीही ट्रेडिंग- शॉर्ट टर्म, स्विंग असल्या कशाच्याही भानगडीत पडू नका. शेअर बाजार हा सर्वसामान्य लोकांसाठी ट्रेडिंगचा नव्हे तर गुंतवणुकीचा पर्याय आहे, हे नेहमी ध्यानात ठेवा. तुम्हाला ट्रेडिंगमधून रग्गड पैसा कमाविल्याचे, कमावत असल्याचे सांगणारे आजूबाजूचे, परिचयातले आणि यूट्यूब/ व्हॉटस् अप विद्यापीठातील 95% लोक खोटारडे, दिशाभूल करणारे आणि अर्धवट सत्य सांगणारे आहेत, हे कायम लक्षात असू द्या.
ट्रेडिंगमधून पैसा कमावला जाऊ शकत नाही. असे 99% सर्वसामान्य लोक कंगाल होतात. ट्रेडिंग हा ट्रेडर्सचा खेळ आहे. सर्वसामान्य लोकांनी शेअर बाजारात फक्त गुंतवणूक करावी. त्यातून मिळणारे दीर्घकालीन रिटर्न्स कोणत्याही सोने-चांदी, RD/FD, पोस्ट-बँक, रिअल इस्टेट अशा गुंतवणुकीच्या पर्यायांपेक्षा कितीतरी अधिक आणि रग्गड असणार, हे नक्की! एका लाखाला दहा वर्षात पोस्ट आणि बँक, सोने आणि चांदी किती देणार? 2 लाख, फार तर 5 लाख, अधिक म्हणून दहा लाख. मात्र, चांगल्या स्टॉकमधील गुंतवणूक देते- 1 ते 3 कोटी! अजून घटवू- 20 ते 50 लाख. तरीही हा परतावा उत्तम नव्हे का? म्हणून शेअर बाजारात पैसे गुंतवा. लक्षात ठेवा- गुंतवा! खेळू नका!! स्टॉकमध्ये गुंतवणूक करा- तुमच्या लेकरांसाठी, पुढच्या पिढीसाठी, तुमच्या निवृत्त आयुष्यासाठी!!