Homeब्लॅक अँड व्हाईटत्याला स्वतः काम...

त्याला स्वतः काम केलेला चित्रपटही बघण्याची अडचण!

चित्रपटाच्या जगात काहीही घडू/बिघडू शकते. आणि म्हणूनच तर ते काय काय घडतंय हे जाणून घेण्यात रस आहे. अशीच एकदम ताजी गोष्ट, आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंदर २’ पाहायला याच चित्रपटात रिक्षाचालकाची छोटीशी असली तरी महत्त्वाची भूमिका साकारलेल्या बदरुल इस्लाम या ज्युनिअर आर्टिस्टकडे आपल्या एका तिकीटासाठीचे पाचशे रुपये नाहीत. बरं, आपलाच चित्रपट पाहायला जायचं तर आपण सहकुटूंब सहपरिवार गेलेलं बरं, असे वाटणे अगदी स्वाभाविक आहे. त्याच्या कुटुंबात एकूण पाच जण आहेत. म्हणजे एकूण अडिच हजार रुपये झाले. आता काय करायचं? एक म्हणजे, दोन-तीन आठवड्यानंतर हेच तिकीटाचे दर किमान तिनशे रुपयांपर्यंत खाली येतील अथवा काही मल्टीप्लेक्समध्ये मंगळवारी तिकीटदर ९९ रुपये असा असतो, तेव्हा आपण आपला चित्रपट पाहावा. काहीच नाही तर आपला चित्रपट ओटीटीवर येण्याची वाट पाहावी.‌

एका महत्त्वाच्या दृश्यात हमजा अर्थात जसकीरतसिऺह राऺगी (रणवीर सिंग) याला हा रिक्षाचालक सुरक्षितपणे नेतो. हे एका दिवसाचे चित्रिकरण असावे. त्या एका दिवसाचा मेहनताना त्याला मिळाला असेल. सोशल मीडियावर या गोष्टीची बरीच उलटसुलट चर्चा रंगली आणि काही नेटकरी म्हणतात, आम्ही ऑनलाईन तिकीट काढून देतो. अडिच हजार रुपयाचे एवढं काय घेऊन बसलात? आम्ही महागड्या तिकीटदरात धुरंदर पहिला आणि दुसराही पाहिलाय. त्यात तुम्ही एकाच दृश्यात काम केले आहे, तर तुम्हीदेखील हा चित्रपट पाहायला हवा. आता तुम्ही म्हणाल, या चित्रपटाच्या वितरक आणि प्रदर्शक यांजकडून या बदरुल इस्लाम याच्यासाठी तिकिटाची काही व्यवस्था होऊ शकत नाही का? याचं थेट उत्तर आहे, नाही! कारण, ९९ टक्के प्रमाणात चित्रपटाचा निर्माता आणि वितरक यांच्यात व्यावसायिक संबंध असतात. चित्रपटाचा निर्माताच त्या चित्रपटाचा वितरक असतो याचे प्रमाण अल्प आहे आणि चित्रपटाचा वितरकच प्रदर्शक (चित्रपटगृहचालक अथवा व्यवस्थापक) असेलच असे क्वचितच. ‘चित्रपट निर्मितीत सगळी खाती स्वतंत्र आहेत’ हे लक्षात घेतले तर अनेक प्रश्न सुटतात. आणि तुम्हालाही माहित्येय, चित्रपटाच्या ग्लॅमरस प्रीमियरला फक्त आणि फक्त त्या चित्रपटातील असो अथवा आपल्या संबंधित असो, सेलिब्रिटीजना बोलावलं जातं आणि आल्यावर चित्रपट पाहिला, वा न पाहिला तरी त्याची ‘तारीफ पे तारीफ’ करायचीच असते. ही, म्हटले तर व्यावसायिक सवय आहे.

चित्रपट

यानिमित्ताने एक गोष्ट आठवली. कदाचित आजच्या डिजिटल पिढीला आश्चर्य वाटेल, पण चित्रपटाचा नायकच आपला चित्रपट प्रदर्शित झालेल्या चित्रपटगृहात चक्क बुकिंगक्लार्क आणि कधी डोअरकिपर होता हे घडलंय. राजा गोसावी या मराठीतील अष्टपैलू कलाकाराबाबत असं घडलंय. राजा गोसावी हे पुणे शहरातील नारायण पेठ येथील लक्ष्मी रोडवरील भानुविलास चित्रपटगृहात चक्क बुकिंगक्लार्क असताना त्याच चित्रपटगृहात त्यांची भूमिका असलेला ‘लाखाची गोष्ट’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. १९५२ सालची ही गोष्ट. राजा परांजपे निर्मित आणि दिग्दर्शित या चित्रपटात राजा गोसावी यांच्यासोबत चित्रा, रेखा, इंदिरा चिटणीस, शरद तळवलकर, ग. दि. माडगुळकर यांच्याही भूमिका आहेत. पुणेकर चित्रपटरसिक आपणच पाहात असलेल्या या चित्रपटाच्या नायकाचे मध्यंतरात अथवा चित्रपट संपल्यावर कौतुक करत स्वाक्षरी घेत. त्या काळात (आणि नंतरही बराच काळ) मराठी चित्रपटात काम करुन फारसा पैसा मिळत नसे, म्हणून त्यातील प्रमुख भूमिकेतील कलाकारही नोकरी करीत. पैसा नोकरीत होता, चित्रपटात नव्हता.

कधी वेगळेही घडलंय. वांद्रे येथील गेईटी, गॅलॅक्सी चित्रपटगृहात डोअरकिपरची नोकरी करणारा डिट्टो अनिल कपूरसारखा दिसतोय म्हणून राजू मावानी दिग्दर्शित ‘रामगढ के शोले’ (१९९२) या चित्रपटात चक्क ड्युप्लिकेट अनिल कपूरची भूमिका मिळाली. एन. चन्द्रा दिग्दर्शित ‘कुशान्त’ या चित्रपटात अनिल कपूर डबल रोलमध्ये आणि उर्मिला मातोंडकर नायिका होती. ॳधेरीतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या मुहूर्ताला एकाच वेळेस दोन अनिल कपूर कसे दाखवणार? म्हणून मग एक ‘असली’ स्टाईलीश अनिल कपूर आणि दुसरा तो नकली अनिल कपूर असे त्यांनी दाखवले. हा चित्रपट मुहूर्तालाच बंद पडला आणि नकली अनिल कपूर पुन्हा आपल्या मूळ भूमिकेत म्हणजे डोअरकिपर झाला. एखाद्या चित्रपटातील कलाकार आणि चित्रपटगृहात त्याचा चित्रपट ही गोष्टही एकदम रंजक आहे. म्हटले ना, चित्रपटाच्या जगात जे जे काही घडते वा बिघडते, ते इतके सरळ रेषेत जाणारे नाही…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

‘मधुबाला’ हवी आहे! आहे का कोणी नजरेत?

चित्रपट निर्मितीत सगळ्यात अवघड चरीत्रपट. मग तो चित्रपट रिचर्ड ऍटनबरो दिग्दर्शित 'गांधी' (१९८३) असेल तर त्यावरच्या प्रचंड संशोधन, अभ्यास, चर्चा, मेहनत, खर्च यावर आणखी एक चित्रपट निर्माण होईल. तसा अतिशय प्रभावी चरीत्रपट तो एकच. तसं पाहिलं तर अनेक भाषेतील...

तिकीट चित्रपटाचं असतं की, हायफाय मल्टीप्लेक्सच?

दोन, अडिच हजार रुपयांचे तिकीट काढून पाहण्यासारखे असं आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंदर २' या चित्रपटात आहे तरी काय, यावर सोशल मीडियावर चर्चा होतेय आणि त्यातूनच या चित्रपटाबाबतचे कुतूहल वाढून आपणही 'धुरंदर २' पाहायला हवा असे वाटत असतानाच सगळ्यात पहिला...

मोकळ्या वातावरणातले चित्रपट महोत्सव म्हणजे सुपरडुपर हिट‌ची हमीच!

अतिशय प्रसन्न समुद्रकिनारा आणि संध्याकाळची सहा-सातची वेळ. त्यात वाळूत 'सिनेमाचा पडदा'! समोर (आणि समोर शक्य नसेल तर पाठीमागे) वाळूत खाली बसून अथवा आपल्या घरुन खुर्ची आणून त्यावर बसून चित्रपट पाहण्याचा मनसोक्त मनमुराद आनंद घेतोय हे कसं वाटतं? मल्टीप्लेक्स आणि...
Skip to content