मुंबईच्या शिवाजी पार्क जिमखाना आयोजित आणि सारस्वत बँक पुरस्कृत १६व्या शिवाजी पार्क जिमखाना राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात मुंबईच्या हरेश्वर बेतवंशीने आपले पहिले विजेतेपद पटकविताना अनुभवी पुण्याच्या सागर वाघमारेचा सरळ दोन सेटमध्ये २५-८, २२-१४ असा पराभव करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. दोनही सेटमध्ये हरेश्वरने सुरुवातीपासूनच आपले वर्चस्व कायम ठेवले होते. दुसरीकडे महिलांच्या अंतिम सामन्यात अपेक्षेप्रमाणे मुंबईच्या काजल कुमारीने पालघरच्या श्रुती सोनावणेला २५-४, २५-९ सहज हरवून विजेतेपद पटकाविले. विजेत्या हरेश्वरने २५ हजारांची तर काजलने ८ हजरांची कमाई केली.
पुरुषांच्या तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत मुंबईच्या महम्मद घुफ्रानने मुंबईच्या संदीप देवरूखकरवर २५-७, २५-१० अशी मात केली, तर महिलांच्या तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत रत्नागिरीच्या आकांक्षा कदमने ठाण्याच्या रिंकी कुमारीवर १७-१४, २५-४ अशी मात केली.
विजेत्या खेळाडूंना शिवाजी पार्क पोलीसठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विलास दातीर यांच्या हस्ते रोख पारितोषिके व चषक देण्यात आले. याप्रसंगी जिमखान्याचे सचिव संजीव खानोलकर, सहसचिव सुनील रामचंद्रन, इनडोअर सचिव सुनील समेळ, ट्रस्टी लता देसाई, महेंद्र ठाकूर, प्रकाश नायक, मिलिंद सबनीस, कॅरम विभाग सचिव अजय पाटणकर, खजिनदार सी ए. विलास सोमण तसेच राज्य कॅरम संघटनेचे उपाध्यक्ष यतिन ठाकूर, मंजूर अहमद खान, सचिव अरुण केदार, सहसचिव केतन चिखले व योगेश फणसाळकर उपस्थित होते.