देशभर कोविड-19 महामारीच्या उसळलेल्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) कायद्यांतर्गत वैधानिक व नियामक पालन करण्याच्या बाबतीत करदात्यांना आलेले आव्हान लक्षात घेता, सरकारने 1 मे 2021 रोजी दिलासा योजनांच्या अधिसूचना जारी केल्या आहेत.
या उपाययोजना पुढीलप्रमाणे-
1. व्याज दरामध्ये कपातः
विलंब कर देयकासाठी दर वर्षाकाठी 18% व्याजदराऐवजी व्याजदरावरील सवलत पुढील बाबींमध्ये विहित करण्यात आली आहे.
- एकूण उलाढाल 5 कोटींपेक्षा अधिक असलेल्या नोंदणीकृत व्यक्तींसाठी: कर भरण्याच्या देय तारखेपासून पहिल्या 15 दिवसांसाठी 9 टक्के इतका व्याजदर कमी केला असून, त्यानंतर मार्च 2021 आणि एप्रिल 2021च्या दरम्यानच्या कराच्या कालावधीसाठी 18 टक्के, देय कर द्यावा लागेल जो अनुक्रमे एप्रिल 2021 आणि मे 2021 मध्ये भरावा, असे अधिसूचित करण्यात आले आहे.
- एकूण उलाढाल 5 कोटी रू. पर्यंत असलेल्या नोंदणीकृत व्यक्तींसाठी: मार्च 2021 आणि एप्रिल 2021 या कालावधीसाठी, कर भरण्याच्या देय तारखेपासून पहिल्या 15 दिवसांसाठी व्याज आकारले जाणार नाही. पुढच्या 15 दिवसांसाठी 9 टक्के व्याजदर आणि त्यानंतर 18 टक्के, सामान्य करदाते आणि क्यूआरएमपी योजने अंतर्गत देय कर भरणारे या दोघांसाठी, जो अनुक्रमे एप्रिल 2021 आणि मे 2021मध्ये देय असेल.
- ज्या व्यक्तींनी संयुक्त कररचना योजनेत कर भरणे पसंत केले आहे त्यांच्यासाठी: ज्यांचा देय कर 31 मार्च 2021 रोजी संपलेल्या तिमाहीत भरणे अपेक्षित आहे, त्यांना कर भरण्याच्या देय तारखेपासून, पहिले 15 दिवस व्याजदर आकारला जाणार नाही. त्यापुढील 15 दिवसांसाठी 9 टक्के आणि त्यानंतर 18 टक्के अधिसूचित करण्यात आला आहे आणि तो एप्रिल 2021मध्ये देय असेल.
2. विलंब शुल्क माफी:
- एकूण उलाढाल 5 कोटींपेक्षा अधिक असलेल्या नोंदणीकृत व्यक्तींसाठी: फॉर्म जीएसटीआर-3 बी अंतर्गत मार्च 2021 आणि एप्रिल 2021 या कालावधीदरम्यान करभरणा करणाऱ्या करदात्यांसाठी अनुक्रमे एप्रिल 2021 आणि मे 2021 या तारखेच्या मुदतीच्या आत भरल्यास विलंबशुल्क माफ केले जाईल.
- एकूण उलाढाल 5 कोटी रू.पर्यंत असलेल्या खालील नोंदणीकृत व्यक्तींसाठी विलंबशुल्क माफ केले जाईल: जीएसटीआर-3 बी अंतर्गत मार्च 2021 आणि एप्रिल 2021 (मासिक पद्धतीने करभरणा करणाऱ्यांसाठी) अनुक्रमे एप्रिल 2021 आणि मे 2021मध्ये थकीत तारखेच्या मुदतीच्या आत आणि जानेवारी-मार्च 2021 कालावधीसाठी (क्यूआरएमपी योजनेंतर्गत तिमाही रिटर्न भरणार्या करदात्यांसाठी) एप्रिल 2021मध्ये भरणे अधिसूचित केले आहे.
3. जीएसटीआर-1, आयएफएफ, जीएसटीआर-4 आणि आयटीसी-04 भरण्याच्या मुदतीचा विस्तार पुढील तारखेनुसार केला आहे
- एप्रिल महिन्यासाठी (मे महिन्यात देय असलेला) फॉर्म जीएसटीआर-1 आणि आयएफएफ, दाखल करण्याची मुदत 15 दिवसांनी वाढविण्यात आली आहे.
- आर्थिक वर्ष 2020-21साठी फॉर्म जीएसटीआर-4 दाखल करण्याची मुदत 30 एप्रिल 2021वरून 31 मे 2021पर्यंत वाढविण्यात आली आहे.
- जानेवारी-मार्च, 2021 या तिमाहीतील फॉर्म आयटीसी-04 सादर करण्याची मुदत 25 एप्रिल 2021पासून 31 मे 2021पर्यंत वाढविण्यात आली आहे.
- सीजीएसटी नियमात काही दुरुस्त्या:
- आयटीसी मिळविण्याच्या सवलतीत दिलासा: नियम 36 (4) म्हणजेच फॉर्म जीएसटीआर-3 बी नियमानुसार एप्रिल आणि मे 2021 या कालावधीसाठी आयटीसीच्या प्राप्तीवरील 105% कॅप संचयित आधारावर लागू असेल, जी मे 2021च्या करमुदतीच्या परताव्यामध्ये लागू केली जाईल, अन्यथा नियम 36 (4) प्रत्येक कर कालावधीसाठी लागू असेल.
- इलेक्ट्रॉनिक सत्यापन कोड वापरणार्या कंपन्यांसाठी जीएसटीआर-3 बी आणि जीएसटीआर-1 / आयएफएफ दाखल करणे यापूर्वीच 27.04.2021 ते 31.05.2021 या कालावधीसाठी सक्षम केले आहे.
- सीजीएसटी कायद्याच्या कलम 168 ए अंतर्गत वैधानिक कालावधीच्या मर्यादेत वाढ करण्यात आली आहे: जीएसटी कायद्यांतर्गत 15 एप्रिल 2021 ते 31 मे, 2021 या कालावधीत येणार्या जीएसटी कायद्यांतर्गत विविध कृती पूर्ण करण्यासाठी मुदतवाढ 31 मे 2021पर्यंत काही अपवाद वगळता वाढविण्यात आली आहे, जी अधिसूचनेमध्ये निर्दिष्ट केली आहे.