Tuesday, December 24, 2024
Homeडेली पल्सलोककलावंतांच्या विस्मरणात न...

लोककलावंतांच्या विस्मरणात न जाणारे विलासराव!

लोककलावंतांच्या कधीही विस्मरणात न जाणारे विलासराव! लोककलेचे आत्मीयतेनं जतन व्हावे आणि लोककलावंतांना सन्मानाची वागणूक मिळावी हा त्यांचा प्रामाणिक उद्देश! त्यामुळे त्यांच्या तळमळीला आणि सक्रियतेला लोकलावंतांच्या हृदयात नेहमी मानाचे स्थान मिळाले. विलासराव कधी अधिकाऱ्यांवर अवलंबून सांस्कृतिक कार्य खात्याचे निर्णय घेत नव्हते. माझ्या लोककलावंतांना काय हवं आहे, हे लक्षात घेऊन तसा निर्णय घ्या, अशी अधिकाऱ्यांना सांगण्याची धमक फक्त त्यांच्यात होती. म्हणून आजही ते कोणाच्याही स्मरणातून जात नाहीत.

२६ मे १९४५ साली विलासराव देशमुख यांचा जन्म बाभूळगाव (जि. लातूर) येथे एक शेतकरी कुटुंबात झाला. गावचे सरपंच ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अशी त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली. लातूर पंचायत समितीचे सभापती, जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा बँक संचालक, युवक काँग्रेसचे अध्यक्ष, अशी पदं भूषवित असताना त्यांनी राज्याच्या राजकारणात आपले पाय रोवायला सुरुवात केली. १९८० ते १९९५पर्यंत सलग तीन विधानसभा पंचवार्षिक निवडणूक लढवून त्यांनी या काळात मंत्री म्हणून विविध महत्त्वाची खाती सांभाळली. त्यापैकी सांस्कृतिक कार्य विभागाला त्यांनी प्रामाणिकपणे न्याय दिला.

केवळ १९९५ साली त्यांना लातूर विधानसभा मतदारसंघातून पराभव पत्करावा लागला. त्यामुळे पक्षाबाहेरील आणि पक्षातील विरोधकांपुढे आता विलासरावांची राजकीय कारकीर्द संपते की काय? असे प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मात्र, विलासराव नेहमी आपल्या भाषणात एक वाक्य बोलायचे, अन ते लोकांना खूप भावून जायचे. ते म्हणजे “समय के पहले और नसीब से ज्यादा कुछ नाही मिलता!” अगदी तसंच त्यांच्या आयुष्यात घडले सुद्धा..! कारण पाच वर्षे राजकारणापासून दूर झालेले विलासराव देशमुख १९९९ साली पुन्हा लातूर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले. अन १८ ऑक्टोबर रोजी त्यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडली. त्यानंतर त्यांनी जानेवारी २००३पर्यंत मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाल पूर्ण केला.

दुसऱ्यांदा १ नोव्हेंबर २००४ ते ४ डिसेंबर २००८ या कालखंडात त्यांना पुन्हा मुख्यमंत्रीपद भूषविण्याची संधी मिळाली. २००८च्या ताज हॉटेलवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे त्यांना मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार व्हावे लागले. त्यानंतर त्यांना महाराष्ट्रातून थेट दिल्लीच्या राजकारणात नेण्याचा निर्णय पक्षश्रेष्ठींनी घेतला. अन् तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या नेतृत्त्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळात अवजड उद्योग मंत्रालय आणि विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय खात्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली.

केंद्रीय मंत्रीपदाची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवूनही ते मात्र दिल्लीच्या राजकारणात कधी रमले नाहीत. त्यांचे सर्व लक्ष महाराष्ट्रातील घडामोडींकडे आणि इथल्या राजकीय हालचालींकडे असायचे. ‘घार हिंडते आकाशी, मात्र चित्त तिचे पिल्लापाशी..’ अशी अवस्था त्यांची झालेली असायची. दिल्लीत बसून महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांशी नाळ कधी त्यांनी तोडली नाही.

विलासराव

विलासराव म्हटलं की, एक रुबाबदारपणा डोळ्यासमोर येतो. त्यांचा कायम साधेपणा असायचा, मात्र, कपड्यांची उत्तम रंगसंगती. यामुळे एक राजबिंडे व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख उभ्या महाराष्ट्राला होती. मिश्किल स्वभाव, आपल्या वक्तृत्वात सदैव मार्मिक टिप्पणी, चेहऱ्यावर हसू असलेले.. त्यांना कधीही राजकीय ताणतणावात दुर्मुखलेले पाहिलेले नाही.

कला आणि साहित्य क्षेत्रात त्यांचा मित्रवर्ग मोठा होता. नाट्य संमेलन आणि साहित्य संमेलनाला ते अवर्जून उपस्थित राहत. माणसं जोडायची कला त्यांच्याकडे असायची. म्हणून त्यांनी आपल्या मैत्रीत गरीब, श्रीमंत, अभिनेता आणि लोककलावंत असा भेदभाव केला नाही. त्यांना लोकलावंतांच्या हलाखीची जाण होती. म्हणून लोककलेची परंपरा जतन करण्यासाठी आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. सांस्कृतिक कार्य विभागात  निर्णयाला विरोध करणाऱ्या अधिकाऱ्यांना आपल्या मिश्किल भाषेत ते शाब्दिक चिमटे घेत.

महाराष्ट्रातील लोकलावंतांसाठी आर्थिक पॅकेज, वयोवृध्द कलावंतांच्या मानधनात भरघोस वाढ, तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या नावाने जीवनगौरव पुरस्कार हे सर्व निर्णय त्यांनी आपल्या काळात घेतले. महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा जपला जावा याची जाणीव त्यांना होती. त्यामुळे ११ फेब्रुवारी २००६ रोजी पहिला “विठाबाई नारायणगावकर जीवन गौरव पुरस्कार” कांताबाई सातारकर यांना देण्यासाठी पहिल्यांदा ते नारायणगावला आले. मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या उपस्थितीतील हा सर्वात मोठा सांस्कृतिक कार्यक्रम  नारायणगावच्या इतिहासात पहिल्यांदा झाला असावा.

या गावचे जागृत देवस्थान म्हणून नारायणगावच्या मुक्ताईची ओळख संपूर्ण महाराष्ट्राभर आहे. हे ग्राममंदिर गावात आहे. मंदिराचा गाभाराही छोटासा आहे. देवीकडे जाणारा रस्ता म्हटलं तर एव्हढा ऐसपैस नाही. त्यामुळे ज्यादिवशी मुख्यमंत्री विलासराव देशमुख नारायणगावला येणार होते, तेव्हा त्यांनी पाच मिनिटे तरी देवीच्या गाभाऱ्यात येऊन देवीचे दर्शन घ्यावे, अशी खूप इच्छा होती. पण तेव्हाचे पुणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक विश्वास नांगरे पाटील यांच्या नेतृत्त्वाखालील पुरस्कार वितरण सोहळ्याच्या जागेची पाहणी करायला आलेल्या स्पेशल पोलीस पथकाने याला विरोध केला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एव्हढ्या छोट्या गाभाऱ्यात कसा प्रवेश करतील, असा आक्षेप पोलिसांनी घेतला. त्यामुळे काहीसा मूड गेलेला होता. पण विलासराव कार्यक्रमाला येण्याआधी एक दिवस सायंकाळी त्यांना मोबाईलवर संपर्क करून माझी इच्छा व्यक्त केली. यावर ते म्हणाले, उद्या नारायणगावात आल्यावर नक्की देवीचे दर्शन घेणार!

अन कार्यक्रमाच्या दिवशी विलासरावांनी दिलेला शब्द पाळला. त्यांचे  हेलिकॉप्टर नारायणगावात उतरल्यावर, ते पहिले गेले ते मुक्ताईच्या दर्शनाला. त्यांच्यासोबत सांस्कृतिक कार्य मंत्री अशोक चव्हाण, ऊर्जा मंत्री दिलीप वळसे पाटील, विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे, स्थानिक खासदार, आमदार, सांस्कृतिक कार्य खात्याचे सचिव संजीवनी कुट्टी यांच्यासह सारा लवाजमा अखेर मंदिरात आला. त्यामुळे व्हायचे तेच झाले, तुडुंब गर्दी पाहून पोलिसांची मात्र खरोखर तारांबळ उडालेली दिसली.

केवळ लोककलावंतांवर अपार प्रेम आणि त्यांच्याबद्दल असलेली तळमळ यामुळे विलासराव अजूनही कलावंतांच्या स्मरणातून जात नाहीत.

Continue reading

मी गुलाबी.. तू गुलाबी.. जग गुलाबी.. अजितदादांचा नवा फंडा!

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार अलीकडे वरचेवर गुलाबी जॅकेटमध्ये दिसतात. आपल्या दैनंदिन आयुष्यात आपण शेकडो प्रकाराचे रंग बघत असतो. हे रंग आपल्या जीवनात एक नवीन भूमिका बजावत असतात. आपल्या मूडवर या रंगाचा बहुतांशी परिणाम होतो. इतकेच नव्हे, तर रंगाचा आपल्या...

महाराष्ट्रातले ज्येष्ठ लोककलावंत मानधनासाठी आसुसलेलेच!

राज्यात एकीकडे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, लाडका भाऊ योजनांसारख्या विविध योजनांचा बोलबाला सुरू असताना राज्यातील ज्येष्ठ वयोवृद्ध कलावंत आणि साहित्यिकांचे दरमहा मिळणारे दोन महिन्यांचे मानधन त्यांच्या बँकेतच जमा झाले नसल्याने अनेक ज्येष्ठ लोककलावंतांनी नाराजी व्यक्त केली आहे. आम्ही सरकारचे...

हलगी-ढोलकीच्या जुगलबंदीने रंगला ढोलकी तमाशा महोत्सव

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाने 26 मार्च ते 31 मार्च 2024 यादरम्यान नवी मुंबईतील जुईनगर नाट्यगृहात आयोजित केलेल्या "ढोलकी तमाशा महोत्सवा"मध्ये हलगी-ढोलकीची जुगलबंदी बघायला मिळाली. पारंपरिक गण, गवळण, बतावणी, रंगबाजी, शृंगाराच्या  लावण्या, सवाल-जवाब, शिलकार, फार्सा, वगनाट्य आणि शेवटीची भैरवीसुद्धा भरगच्च गर्दीने भरलेल्या नाट्यगृहातील कलारसिकांना...
Skip to content