मुंबईत चेंबूरपासून लोकमान्य टिळक टर्मिनसला जाणाऱ्या रस्त्यावर अखेर बुलडोझर चालला. थेट पंतप्रधान कार्यालयातून सूत्रे हलल्यानंतर मुंबई महापालिकेलाही बुलडोझर चालवल्याखेरीज पर्याय राहिला नाही, असे सूत्रांनी सांगितले.
चेंबूरपासून लोकमान्य टिळक टर्मिनसला जाणाऱ्या रोडवर अनेक छोटयामोठ्या ढाब्यांनी रस्ते अडवले होते. त्यामुळे रेल्वेस्थानकात जाण्यास प्रवाशांना प्रचंड त्रास होत होता. धड रिक्षांनाही उभे राहण्यास तसेच प्रवाशांना उतरण्यास मोठा त्रास सहन करावा लागत होता. गेली 10/15 वर्षे प्रवासी तसेच कुर्ला / चेंबूरचे रहिवासी हा त्रास मुकाट्याने सहन करीत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे येथील स्थानिक आमदार नवाब मलिक यांचा या ढाबेमालकांना छुपा पाठिंबा असल्याचेही बोलले जात होते.

मात्र काही दक्ष नागरिक या रोजच्या त्रासाला कंटाळले होते. त्यांनी यासंबंधात थेट पंतप्रधान कार्यालयाशी फोटोनिशी संपर्क साधताच सूत्रे खाडकन हलली. पंतप्रधान कार्यालयाने थेट महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे तो सारा पत्रव्यवहार पाठवला. आता खुद्द पंतप्रधान कार्यालयातून आदेश आल्याने आयुक्तांनी कुणाशीही सपंर्क न साधता व आणखी कुणाचा आदेश न घेता पालिकेच्या कुर्ला व चेंबूर विभाग कार्यालयाला कामाला लावले व सोबत अतिक्रमणविरोधी विभागाचे पथक दिले. मग काय, काल दुपारपासून पाडकाम सुरु झाले व सुमारे 15/20 अनधिकृत ढाबे जमीनदोस्त झाले.
तसेच यांच्या आजूबाजूला असलेल्या छोट्या टपऱ्याही उडवण्यात आल्या. या टपऱ्यांमध्ये अंमली पदार्थांची खुलेआम विक्री होत असल्याचीही चर्चा आहे. जवळच असलेल्या रिक्षा थांब्यावरही दिवसाआड काहीतरी लोच्या व्हायचाच. यातूनच परड्या नामक रिक्षाचालक कम तथाकथित समाजकंटकाचा खून करण्यात आला होता. अजून त्या खुनाचा तपास पूर्ण झालेला नाही. या खूनप्रकरणी खरा गुन्हेगार अजूनही पोलिसांना सापडलेला नाही. पकडण्यात आलेला संशयित हजर केलेला आरोपी असल्याचेही सूत्रांनी सांगितले. खरे गुन्हेगार चेंबूर व शेल कॉलनीच्या आसपास मिळतील. कारण त्या परिसरातूनच बटन गोळ्या / ड्रग्ज वितरित होतात, असा हवाला माहितगार सूत्रांनी दिला.
छायाचित्र मांडणीः प्रवीण वराडकर