छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यावर चालून येणाऱ्या अफझलखानाचा कोथळा वाघनखांनी बाहेर काढला आणि या इतिहासापासून प्रेरणा घेत राज्यातील महायुती सरकार आता येणाऱ्या निवडणुकीत स्वतःचा कोथळा वाचवण्यासाठी वाघनखांचा उत्सव महाराष्ट्रातल्या चार प्रमुख शहरांमध्ये भरवणार आहे.
लोकसभा निवडणुकांमध्ये महायुतीचा कोथळा काढला गेला हा ताजा इतिहास आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकांच्या आधी विविध उपाययोजना करून महायुती कोथळा बचावचा प्रयत्न करणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून आता ऐतिहासिक वाघनखांचा उत्सव राज्यातील चार प्रमुख शहरांमध्ये होणार आहे. अर्थात, शिवभक्तांचा उत्साह आणि महायुतीची गरज लक्षात घेऊन वाघनखे गावोगावही फिरवली जाऊ शकतील.
छत्रपती शिवरायांनी अफझलखानाचा वध केला ती ऐतिहासिक वाघनखे भारतात आणली जाणार असून १९ जुलैला साताऱ्यामध्ये सरकारी संग्रहालयामध्ये ही वाघनखे तमाम शिवभक्तांना दर्शनासाठी खुली केली जाणार आहेत. या वाघनखांबरोबरच शिवकालीन शस्त्रांस्त्रांचे प्रदर्शनही भरवले जाणार आहे. या कार्यक्रमाला छत्रपतींचे वारस तसेच सरदार घराण्यांचे वारसही उपस्थित राहणार आहेत, असे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काल विधानसभेत सांगितले.
लंडनच्या संग्रहालयाकडून ही ऐतिहासिक वाघनखे भारतात आणली जाणार आहेत आणि ती तमाम शिवभक्तांना दर्शनासाठी तीन वर्षे उपलब्ध होणार आहेत, असे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गुरुवारी विधानसभेत जाहीर केले. या वाघनखांबद्दल इंद्रजित सावंत या संशोधकांनी आक्षेप घेत ही वाघनखे मुळात शिवाजी महाराजांनी अफझलखानाचा वध केला त्यावेळी वापरलेली नाहीत, असा दावा केला आहे. त्याबद्दल आपणही पत्रकार परिषद घेऊन हा दावा खोडला असता. पण विधानसभेच्या माध्यमातून राज्याला तसेच देशातील आणि जगातील शिवभक्तांना आपण वस्तुस्थिती सांगत आहोत, असेही मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.
हजारो संशोधकांपैकी फक्त एका संशोधकाने आक्षेप घेतला आहे. पण, मुळात या संग्रहालयाकडे वाघनखांच्या पेटीवर लेखी उल्लेख असून त्याचा दाखला मुनगंटीवार यांनी दिला. ही वाघनखे साताऱ्याचे तत्कालीन रेसिडेंट जेम्स ग्रँण्ट डफ यांनी देताना त्या वाघनखांच्या पेटीवर लिखित स्वरूपात ही वाघनखे शिवाजी महाराजांनी अफझलखानाला मारण्यासाठी वापरली होती, असे नमूद केलेले आहे. तसा दावा अन्य कोणत्याही उपलब्ध वाघनखांविषयी केला जात नाही, याकडेही त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.