गोव्यातल्या 54व्या इफ्फी महोत्सवात सिनेमा ऑफ द वर्ल्ड श्रेणी अंतर्गत प्रदर्शित झालेल्या ‘फॅमिली अल्बम’ या चित्रपटाचे दिग्दर्शक गिलेर्मो रोकामोरा यांनी उपस्थित प्रतिनिधी आणि माध्यमांशी संवाद साधला. हा चित्रपट बनवताना आपल्या वैयक्तिक जीवनातील अनुभवांनी कसे प्रेरित केले, हे सांगताना उरुग्वेचे हे दिग्दर्शक म्हणाले की, “माझ्या कौटुंबिक आयुष्यातील हा अनुभव आहे. माझ्या पालकांचा घटस्फोट झाला, त्यावेळी माझ्या 16 वर्षांच्या भावाला, त्याच्या बँडमध्ये माझ्या वडिलांना ड्रम वाजवायला आमंत्रित करण्याची सुंदर कल्पना सुचली. ही कथा माझ्याकडे अनेक वर्ष होती, आणि त्यामधून प्रेरणा घेत, या प्रकल्पामधून आज हा चित्रपट तयार झाला आहे.”
स्पॅनिश भाषेतील हा चित्रपट पौगंडावस्था, आई-वडील आणि मुले यांच्यातील गुंतागुंतीचे नाते, आणि ही मुले मोठी झाल्यावर त्यांचे हौशी रॉक बँडचे जग, याचा पट उलगडतो. हा चित्रपट वडील-मुलगा नात्याभोवती फिरतो. नाट्य आणि विनोदाचे मिश्रण असलेला हा चित्रपट सर्व वयोगटांच्या प्रेक्षकांचे मनोरंजन करतो आणि त्यांना कौटुंबिक चौकटीत आपले परस्पर नातेसंबंध आणि संपर्क याबाबत विचार करायला प्रवृत्त करतो. यावर बोलताना गुलेर्मो म्हणाले की, “मॅन्युएल, हे प्रमुख पात्र आपल्याला संगीतकार व्हायचे आहे की नाही या पर्यायांशी झगडतो. अनेक तरुणांना अशा दुविधेचा सामना करावा लागतो. तर दुसरीकडे चित्रपटातील वडील संगीताकडे परत जाण्याचा आणि आपले तरुणपणातील दिवस पुन्हा जगण्याचा प्रयत्न करत आहेत, अशा परिस्थितीतून अनेक वृद्ध व्यक्ती जात असतात. हा चित्रपट पालक आणि मुले दोघांनाही आयुष्यातील महत्त्वाच्या क्षणी एकमेकांना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी नवीन कल्पना आणि उपाय सुचवेल, अशी मला आशा आहे.
आपल्या आयुष्यावरील संगीताचा प्रभाव आणि चित्रपटातील एक महत्त्वाचा घटक म्हणून ‘संगीत हे चित्रपटामधील एक पात्र’ म्हणून कसे सादर करण्यात आले आहे, यावर दिग्दर्शकांनी भर दिला. संगीतकारांनी संगीताची नेमकी धुन उचलून, संहितेच्या मागणीप्रमाणे योग्य ठिकाणी त्याची योजना करून चित्रपटाला आणखी एक परिमाण दिले आहे, आणि ही गोष्ट साकारण्यासाठी मोठे परिश्रम घेतल्याचे त्यांनी सांगितले. हा चित्रपट कौटुंबिक गुंतागुंतीचा वेध घेतो आणि सर्वांना जोडून ठेवणारे प्रेम, सहनशीलता आणि चिरस्थायी संबंधांचे महत्व सांगतो, असे दिग्दर्शक म्हणाले.