Homeन्यूज अँड व्ह्यूजअनुभव घ्या एकदा...

अनुभव घ्या एकदा रात्रीच्या ठाण्याचा!

आमचं ठाणे शहर तस निवांत कधीच नसतं. सकाळी सहा वाजल्यापासून ते मध्यरात्रींनंतर साडेबारा वाजण्याच्या सुमारास अक्राळविक्राळ पसरलेले शहर काहीसा मोकळा श्वास घेऊ लागते. तेही काही तासच.. कारण ट्रक्स आणि भले मोठे कंटेनर्स रस्त्यावरून वाहतच असतात! हीच वेळ साधून आज ठाण्यात फेरफटका मारून गुरुवारी होणाऱ्या महापालिका निवडणुकांचा प्रचार आणि निवडणुकीचा हालहवाल (हाल निकालानंतर समजणारच आहेत म्हणा!) कळावा हाच एकमेव हेतू! कारण वचननामा, जाहीरनामा, चिकनीचुपडी आश्वासने आणि यांव करू, नी त्यांव करू, ही बडबड ऐकण्याच्या मनःस्थितीत जनता मुळीच नाही! अगदी ब्रह्मदेव जरी खाली आला तरी ठाणे काय आपली सर्वच शहरे आपण आणि विविध यंत्रणानी मिळून इतकी बकवास करून ठेवलेली आहेत की बिचारा ब्रह्मदेव म्हणेल- ‘बाबांनो, पाहिजे असेल तर विश्वकर्म्याला घेऊन मी एखादे नवीन शहर वसवू शकेन. पण सध्याच्या ठाणे शहरात सुधारणा घडवून आणणे कर्मकठीण आहे.’ ब्रह्मदेवाच्या या वाक्याला अतिशयोक्ती कसे म्हणता येईल, या विचाराच्या तंद्रित मी सॅटिस पुलाजवळ कधी पोहोचलो हेच समजले नाही. बरोबर आहे रात्रीची वेळ हॊती, रस्ते रिकामे नसले तरी गर्दी नव्हती. परिवहनच्या चालकाने सुसाट वेगाने अवघ्या दहा पंधरा मिनिटात मला सॅटिसला आणले होते. (दिवसा हेच अंतर कापण्यासाठी सुमारे अर्धा ते पाऊण तास सहज लागतो. कोंडी असेल तर एक-सव्वा तासही लागतो.) तर सॅटिस पुलाला एक चक्कर मारून तलावपाळीच्या दिशेने निघालो.. मधेच एका टपरीवर एक कटिंग मारली आणि मधेच रस्ता क्रॉस करून कोर्टनाक्याच्या गल्लीत घुसलो. (जुन्या जि प कार्यालयावरून). तेथे औरच दृश्य नजरेला पडले.

ग्रंथ संग्रहलयाच्या आगेमागे असलेल्या एक-दोन गल्लीत थोडी गर्दी दिसली. सहज विचारले इतक्या रात्री इथे काय आहे? तर कुणीतरी पसरस्पर उत्तरला- साब नए लगते हो, यहा तो रात कोही मेला लगता है.. एक नजर मारली तर सर्वजण बहुतेक गरिबीच्या खालचेच. हमाल, हातगाडीवाले, धंदा न झालेले फेरीवाले आपल्या दिवसाचा ‘गम’ विसरण्यासाठी ६० एमएल किंवा देशीची चपटी मागवण्याच्या बेतात होते! (हल्ली पेगनुसार मिनी बाटल्याही मिळतात, नाहीतरी ‘नॅनो’ युगच आहे.) बाजूला पापडवाला, बुर्जीपाव हजर होताच. एकाने तेथे त्याही स्थितीत ‘तुझे क्या लगता है, इलेक्शनका..’ असे विचारताच दुसरा कावलाच. म्हणाला गुपचूप प्यायची तर पी, उगाच इलेक्शन वगैरे काही नको. कुणी येऊन आणि न येऊन आपले काय भले होणार? साला एका कार्यकर्त्याने घोषणा आणि रॅलीसाठी २०० रुपये आणि जेवण कबूल केले होते. साल्याने थुकी लावली, नरकात जाईल. साला पन्नास रुपये हातात ठेवून नेत्याबरोबर गेला साला.. थू तूझ्या.. मला पुढे ऐकवेच ना!

तिथून हळूहळू पुढे सरकत कोर्टनाक्याच्या दिशेने पावले पडत होती. आजूबाजूच्या पदपथावर आदिवासी महिला आपल्या जागेची साफसूफ करून आपले सामान खाली उतरवत होत्या. सायबानू आमच्या भागातून सकाळी गाड्याच नसतात, येतात त्याही उशिरा. त्यांच्या नादी लागलो तर दुपारहूनच आम्ही इथे येऊ. पण नंतर आमचा भाजीपाला, फुले कोण घेईल? फेकून द्यावा लागेल. कसे जगणार म्हणून रातच्याला इथेच मुक्काम करतो. इथे बसण्यासाठीही पैका द्यावा लागतो राजा.. तुम्ही लिवा सायबांनो, काहीतरी… (मनात म्हटलं मीच रस्त्यावर फिरतोय अन ही माय मलाच सांगेतय लिवा म्हणून.. बघतोयस ना बाबा!) ती माय तिची कहाणी सांगायच्या तयारीतच होती. पण उशीर होतोय असं सांगून निसटलो. माझ्या हातात तर काही नाहीच पण ज्यांच्या हातात सर्व काही आहे आणि ठाणे जिल्ह्यावर राज्य करतात त्या मंडळींनी काहीही केलेले नाही. तेथे मी पामर काय करणार? या विचारातच मी समर्थ मंदिरापर्यंत कधी आलो ते समजलेच नाही. समोरच्या बाजूला महसूल विभागाची कार्यालये व मोठे मैदानसदृश्य आवार आहे. अगदी बकवास आवार आहे. रद्दी गाड्या तेथे अनेक वर्षे पहुडल्या आहेत. बाद झालेल्या आहेत तरीही येथे विश्रांती घेत आहेत. हे तिथेच सोडून दिघे गल्लीत घुसलो कारण तिथे गुंतलो असतो तर ‘आनंदाश्रमा’ची वारी चुकली असती.

रात्रीचे दीड दोन वाजले असावेत. वातावरण अगदी शांत, रस्त्यावर दिवे असूनही त्या गल्लीत काहीसा अंधार.. कोण बाबा हा गल्लीत चाललाय अशा एका दोघांच्या नजरा. मी आपला पुढे जातोय. तोच.. आवाज आला. काय सायबा, आज पोतडीत काही नाही का? कटिंग मारणार का? अरे घाबरू नकोस. मी तुझाच आहे आणि आता तर तू माझ्या गल्लीत आहेस! माझ्या आवडत्या झाडाजवळ आहेस? या झाडावरून आठवलं. अरे या झाडाची कुणी निगाच राखत नाही. नाथाला व्यापामुळे वेळ नसतो, नरू दिल्लीत मशगुल, रवी तर इकडे फिरकतही नाही असे म्हणून सिगरेट झटकल्याचा भास झाला. पण तो आवाज माझी पाठच सोडेना. पुन्हा हळू आवाजात कुणीतरी बोलवत असल्याचा भास झाला. मी त्या दिशेने चालू लागलो. तो जीर्णशीर्ण शाळेच्या एका पायथाणीवर कुणी तरी बसल्याचा भास होत होता. पण तेथे हालचालही दिसत होती.

ठाण्या

आनंदाश्रम मला मानवत नाही! अरे मी रस्त्यावरचा माणूस. कुणालाही माझ्याकडे सहज येता यावे व त्याचे गाऱ्हाणे मला ऐकवावे हा त्यामागचा हेतू. हल्ली तुमच्या अतिसुरक्षेमुळे माझा जीवच गुदमरतो. सिंगल फसली माणसाला दहा-दहा नाही तर किमान पाच-पाच तरी सुरक्षापोलीस असतातच ना? त्यांची पडताळणी होणार, खिसे तपासणार आणखीही काहीबाही.. नकोच तो जनतादरबार असं वाटायला लागलाय. आजकाल बरे त्यातही काटकसर. साहेबांना वेळ नाही. मिटींगा लागल्या आहेत पाठोपाठ. आज फक्त दहा-बाराच जणांना पत्रे द्या. हे हस झालं रे जनता दरबाराचं. त्यापेक्षा न घेतलेलाच बरा! अरे त्या जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांना जरा जोरजोरात हलवा रे.. जागे करा त्यांना. त्यांना म्हणावे जिल्हा व शहर फिरला नाही तरी चालेल. परंतु आपल्या कार्यालयाच्या आवाराचा आणि पदपथाची एकदा खाली उतरून पाहणी तरी करा. पाहिजे तर त्याला ‘दौरा’ही म्हटले तरी चालेल! मोठा दरवाजा तर बंदच असतो. (बाजूला असलेला मोठा दरवाजा उघडाच असतो हे मान्य..) तरीही जो छोटा दरवाजा आहे त्या दरवाजातच मोठा खड्डा पडलेला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील कामकाज जणू खाचखळग्यातूनच जाते असे तर जिल्हाधिकारी महोदयांना सुचवायचे तर नाही ना?

बाजूच्याच पदपथावरील अवघ्या सात-आठ टाईल्स गायब आहेत? त्याचे काय करायचे? खरा संताप तर पुढेच आहे. नियोजन भवनाच्या बाहेरील पदपथावर चक्क एका नामांकित कंपनीचा चहाचा स्टॉल आहे. संताप तर पुढेच येईल. गेल्या आठवड्यापासून तेथे एक परप्रांतीय ऊसाच्या रसाची टपरी चालवू लागला आहे. त्याच्या शेजारी लिंबू पाणीवाला आणि पदपथ संपला तेथे वळण असल्याने नागरिकांना बाराच त्रास होत आहे आणि हा त्रास जोवर त्यांना होणार होत नाही तोवर समजणार नाही. खरंतर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या व्यवस्थापकाचे हे काम आहे. तसेच या आवाराचे दोन भाग करण्यात आलेले असूनही बँकेच्या जवळील काही बॅरिकेड्स काढून टाकलेले दिसतात जेणेकरून आत बाईक्स येऊ शकतात. काही दिवसात रिक्षाही सहज प्रवेश मिळवू शकतील! काही अधिकाऱ्यांचा अपवाद सोडल्यास मराठी संस्कृतीशी काहीही देणेघेणे नसलेले अधिकारी महापालिका आयुक्तपदावर सरकारने बसवलेले आहेत. त्यांना मराठी सण, मराठी नेते आणि साहित्यीक-कलाकारांशी काही देणेघेणे नसते. मग यात महाराष्ट्रगीत कार असोत वा राष्ट्रीय नेतेही असोत! आयुक्तपदी विराजमान झालेल्या व्यक्तीलाच जर कुणाचा मान ठेवता येत नसेल तर प्रभागातील अधिकारी तर वरताणच! हरिनिवास परिसरातील वा तीन पेट्रोल पम्प परिसरातील राम गणेश गडकरींच्या नावाची पाटी पाहवी! तसेच सत्तारूढ पक्ष व विरोधी पक्ष या दोहोंना प्रात:स्मरणीय असलेल्या मा साहेबांचा अर्धपुतळा गेल्या तीन वर्षांपासून मीनाताई चौकातून गायब का आहे यांचे कारण कुणी सांगू शकेल का? आणि समजा वादा करता कारण सांगितलेही जाईल, पण ते संयुक्तिक असेल का? असे अनेक प्रश्न माझ्या मनात आहेत जनतेलाही अशा प्रश्नांची उत्तरं हवी आहेत. पण मागणार कोण आणि उत्तरं द्या म्हणून सांगणारे कोण उरले आहे?

तुला म्हणून सांगतो, येऊर टेकडीवर तेव्हा एक आश्रम चालायचा, तेथे विदयार्थीही भरपूर असायचे. अकरावीची परीक्षा सुरु व्हायची होती. मुले रात्र रात्र जागून अभ्यासाची तयारी करत असत. त्यातच तेथे एका व्यपाऱ्याच्या मुलीच्या लग्नाची पार्टी रात्रभर चालू होती. मुलांना त्या रात्री अभ्यास करता आला नाही. दुसऱ्या दिवशी मला हे समजले. क्षणाचाही विलंब न करता मी खातरजमा करून घेतली व व्यापाऱ्यास बोलावले. त्याला विचारले. उत्तरात त्याने पार्टी रात्रभर चालू होती असं कबूल करताच मी त्याला थोबाडला होता. तीच गोष्ट काही नगरसेवकांबाबतही घडलेली आहे. हल्ली कायदे वगैरे बदलले आहेत ते चांगलेच आहे. पण कुणाच्या वर्तनात सुधारणा आहे का? पळवाटा काढून कातडी वाचवतात! अरे खासदार नरु दिल्लीला जाण्याआधी ठाण्याचा महापौर होता. अनेक कामं चांगली केली. तलावपाळीचे सुशोभिकरणही केले होते. यात त्यांनी माती खाल्ल्याच्या तक्रारी आहेत. अन्य तक्रारीचे काही नाही पण संपूर्ण तलावाभोवती काचेखालून लाईटस सोडले गेले होते. ते लाईट्स सुरु झाल्यापासून अवघे दोन महिने प्रकाश पाडू शकले. तेव्हापासून तो आजवर म्हणजे सुमारे पाच वर्षे ते लाईट्स गुल का? हे नाथाने विचारायला नको का? ठाणे शहराला दिलेले पोलिसबळ अत्यन्त अपुरे असून शहरांचे व्यवस्थापन करण्यास पोलिसांचे मनुष्यबळ वाढणे गरजेचे आहे. सुमारे दीड-दोन हजार पोलिसांची अजून गरज आहे. पण सरकारदरबारी कुणी ऐकत नसल्याचे कानावर आले आहे. नाथालाही मुख्यमंत्री ऐकत नाहीत याला काय म्हणायचे? ठाण्याची बससेवा आणि पाणीपुरवठ्यातही मोठी सुधारणा होणे गरजेचे आहे.. असे जाताजाता ती प्रतीकृती बोलली! अरे हो एकदा वेळ काढून येरे बरंच बोलायचंय… जे घडतंय ते बरं नाही. पण आता त्याला इलाज नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

कुठेकुठे मुंबई आहे हे मतदानानंतरतरी कळावे!

तब्बल सात वर्षानंतर उद्या मुंबई महापालिकेची निवडणूक होत आहे. आता मतदानाला सुरुवात झाली आहे. निवडणुकीत काय होईल, काय नाही यांचे काही अंदाज माध्यमे आणि वर्तमानपत्रांनी वर्तवलेले आहेत. हे अंदाज खरे की खोटे हेही अवघ्या काही तासांत स्पष्ट होणार आहे....

पंकजराव, ठाणेकरांना असते शिस्तीचे कायम वावडे!

मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली व पुणे आदी महापालिकांच्या निवडणुका होणार हे सरकारने जाहीर केल्यापासून जवळजवळ सर्वच माध्यमे तसेच मराठी वर्तमानपत्रे कधी नव्हे ते शहराच्या नागरी समस्यांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. हे चांगले घडत आहे कारण, राज्याचे राजकारण,...

महाराष्ट्रात या दोन ‘घंटागाडयां’ना घेऊन किती काळ फिरू?

अर्थविषयक घडामोडीच्या मागोवा घेणाऱ्या आघाडीचे वर्तमानपत्र इकोनॉमिक टाईम्सने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अंकात भाजप आणि राज्यात आघाडी वा युती केलेल्या तीन राज्यांचा धावता आढावा घेतलेला आहे. भाजप आंध्र प्रदेशात चंद्रबाबू नायडू यांच्या तेलगू देसम, महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेबरोबर...
Skip to content