ऍडमिरल आर. एल. परेरा – पीव्हीएसएम एव्हीएसएम यांची सध्या जन्मशताब्दी (जन्म1923 – मृत्यू1993) साजरी होत आहे. त्याचाच एक भाग म्हणून भारतीय नौदल आणि दार्जीलिंगमधील सेंट जोसेफ स्कूल (नॉर्थ पॉइंट) यांनी शाळेच्या आवारात एकत्रितपणे स्मृतीपर कार्यक्रम नुकतेच आयोजित केले. ऍडमिरल परेरा यांना प्रेमाने ‘रॉनी पी.’ असे म्हटले जाई.
1979मध्ये त्यांनी समर्थपणे नववे नौदलप्रमुख म्हणून धुरा पेलली. 1932-37 या काळात ते दार्जिलिंगमधील या शाळेचे विद्यार्थी होते. ऍडमिरल परेरा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शाळेने फुटबॉल स्पर्धा आणि
निबंध लेखन स्पर्धा घेतल्या. यानिमित्ताने शाळेत अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आणि नौदल मुख्यालयाच्या अधिकाऱ्यांच्या चमूनेही यात भाग घेतला.
ऍडमिरल परेरा यांच्या जीवनाविषयी सांगत सीडीआर अनुप थॉमस यांनी त्या काळाविषयीही मनोगत व्यक्त केले. सीडीआर गुरबीर सिंग यांनी जवळपास आठशे विद्यार्थ्यांच्या समूहाशी संवाद साधत भारताच्या सागरी इतिहासाची तसेच नौदलात उत्कृष्ट करिअर घडवण्यासाठी उपलब्ध असलेल्या
उत्साहवर्धक संधींची माहिती दिली. उपस्थित नौदल अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांशी तसेच अध्यापकवर्गाशी संवाद साधला आणि भारतीय नौदलात कारकीर्द घडवण्याविषयी त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली.
यावेळी भारतीय नौदलाने ऍडमिरल परेरा यांच्या स्मरणार्थ शाळेला 2.5 लाख रुपयांचा धनादेश देऊन एक शिष्यवृत्ती सुरू केली तसेच शाळेतील क्रीडानैपुण्याचे कौतुक करण्यासाठी फिरता करंडकही सुरू केला. ऍडमिरल आर. एल. परेरा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ या नौदल अधिकाऱ्यांनी वृक्षारोपणही केले. शाळेचे मुख्याध्यापक आणि वसतिगृह अधीक्षक फादर स्टॅन्ले वर्गीस यांनी उपस्थित नौदल अधिकाऱ्यांचा आदरसत्कार केला.