Homeब्लॅक अँड व्हाईटबरोबर २३७ वर्षांपूर्वी...

बरोबर २३७ वर्षांपूर्वी कलकत्त्यात निघाला डिजिटल भाषिक जाहिरातींचा वंशज!

२५ मार्च १७८८. कलकत्ता. इंग्रजांच्या राजवटीत एक इंग्रजी वृत्तपत्र छापले जात होते- “कलकत्ता गॅझेट.” त्या8दिवशी या वृत्तपत्राच्या पानावर काहीतरी वेगळे घडले. एका जाहिरातीत अक्षरे इंग्रजी नव्हती. ती होती बांगला, भारतीय मातीतून जन्मलेली, भारतीय माणसाच्या मनाशी बोलणारी. कलकत्ता गॅझेटमध्ये २५ मार्च १७८८ रोजी भारतीय भाषेत, बांगलामध्ये पहिली वृत्तपत्र जाहिरात प्रकाशित झाली. हे भारतीय प्रिंट मीडियाच्या इतिहासातील एक निर्णायक वळण होते, ज्याने प्रादेशिक भाषांमधील प्रकाशनांचा मार्ग प्रशस्त केला.

ती जाहिरात काय होती? कुणाची होती? आज ते तपशील इतिहासाच्या धुक्यात हरवले आहेत. पण तिची किंमत काळाच्या कसोटीवर सोन्यासारखी खरी उतरली आहे. कारण त्या छोट्याशा बांगला ओळींनी एक प्रश्न जगासमोर ठेवला-9 “तुमच्या भाषेत बोलणाऱ्या जाहिरातींवर तुमचा विश्वास अधिक असतो, की परकीय भाषेत?” उत्तर त्याचदिवशी स्पष्ट झाले होते. आजही ते तितकेच खरे आहे.

पहिली भाषिक जाहिरात : एका वृत्तपत्राचे धाडस

कलकत्ता गॅझेट हे वृत्तपत्र ४ मार्च १७८४ रोजी प्रथम प्रकाशित झाले. ते सरकारी जाहिराती प्रसिद्ध करणारे माध्यम होते. त्याचे संस्थापक फ्रान्सिस ग्लॅडविन हे एक प्राच्यविद्या पंडित आणि ईस्ट इंडिया कंपनीचे अधिकारी होते. ग्लॅडविन हे असामान्य होते. पर्शियन, अरबी, हिंदुस्तानी आणि बांगला भाषांवर त्यांची चांगली पकड होती. त्यामुळेच त्यांनी एक धाडसाचा निर्णय घेतला- इंग्रजी वृत्तपत्रात भारतीय भाषेतील जाहिरातीला स्थान द्यायचे. त्या काळात हे क्रांतिकारी होते. कारण तेव्हाच्या कलकत्त्यात वृत्तपत्र म्हणजे इंग्रजांचे, इंग्रजीत, इंग्रजांसाठी. हिकीज बेंगाल गॅझेट हे एशियातील पहिले वृत्तपत्र मानले जाते, जे २९ जानेवारी १७८० रोजी प्रथम प्रकाशित झाले,.तेही इंग्रजीतच होते. पण ग्लॅडविन यांनी जे केले, ते अधिक महत्त्वाचे होते. जाहिरात ही केवळ माहिती नसते, ती विश्वास असतो. आणि विश्वास माणसाच्या मातृभाषेतूनच येतो. हे त्यांनी २३७ वर्षांपूर्वी जाणले होते.

जाहिरात

बांगला ते मराठी : भाषिक जाहिरातींचा प्रवाह

त्या पहिल्या बांगला जाहिरातीनंतर भारतीय भाषांमधील वृत्तपत्रसृष्टी उमलू लागली. २३ मे १८१८ रोजी समाचार दर्पण हे पहिले भारतीय भाषेतील वृत्तपत्र प्रकाशित झाले- सेरामपूरच्या बाप्टिस्ट मिशन प्रेसमधून प्रकाशित झालेले. ते बांगला साप्ताहिक होते. मराठीचीही वाटचाल त्याच सुमारास सुरू झाली. बाळशास्त्री जांभेकर यांनी १८३२मध्ये दर्पण सुरू केले, महाराष्ट्राच्या पत्रकारितेचा उषःकाल. भाषा वेगळी होती, पण उद्देश एकच- लोकांपर्यंत लोकांच्या भाषेत पोहोचणे. आज ती परंपरा किती समृद्ध आहे! दैनिक जागरण, अमर उजाला, दैनिक भास्कर, मलयाळ मनोरमा, दिनामलार, ईनाडू, दैनिक गावकरी, महाराष्ट्र टाइम्स… भारतात वृत्तपत्र महसुलापैकी ६७.९% हिस्सा जाहिरातींमधून येतो, आणि भाषिक डिजिटल सामग्री एकूण डिजिटल वापराच्या ६०%पर्यंत पोहोचली आहे.

टीव्हीचे आक्रमण : पहिला धक्का

१९९०च्या दशकात उपग्रह दूरदर्शनने भारतात प्रवेश केला आणि वृत्तपत्र जाहिरात बाजाराला पहिला मोठा धक्का बसला. झी, स्टार, सोनी, आणि नंतर शेकडो प्रादेशिक वाहिन्या- प्रत्येकाने जाहिरातदारांना सांगितले, “माझ्याकडे चित्र आहे, आवाज आहे, भावना आहे.” भारतातील जाहिरात बाजारात दूरदर्शन हे आजही एक प्रबळ माध्यम आहे, ज्याची शहरी आणि ग्रामीण भागात व्यापक पोहोच आहे आणि ते उपभोक्ता वस्तू व मनोरंजन उद्योगांसाठी सामूहिक ब्रँडिंगचे प्रभावी व्यासपीठ बनले आहे. वृत्तपत्रांनी अनेक वार झेलले, उत्पादनात बदल केले. भाषिक वर्तमानपत्रांनी हायपर-लोकल बातम्या, पुरवण्या, जाहिरात-पॅकेजेस अशा युक्त्या वापरल्या. काही संपले, काही टिकले, पण गंभीर आव्हानांना सामोरे जाऊन.

डिजिटल आक्रमण : दुसरा, अधिक क्रूर धक्का

स्मार्टफोन आला. जिओ आला. आणि जाहिरात बाजाराचे चित्रच पालटले. २०२४मध्ये भारताचा ऑनलाइन जाहिरात बाजार ८.३ अब्ज डॉलर होता. २०३३पर्यंत तो २०.७ अब्ज डॉलरपर्यंत पोहोचेल असा अंदाज आहे. दरवर्षी १०.६६% वाढीच्या दराने. याउलट, भारतातील प्रिंट जाहिरात बाजार २०२४ मध्ये १.०४ अब्ज डॉलर होता आणि तो २०३३पर्यंत ०.८२ अब्ज डॉलरवर घसरण्याची शक्यता आहे. आकडे बोलतात- टीव्ही आणि डिजिटलने वृत्तपत्राच्या पानातून जाहिरातदार हळूहळू खेचून घेतले आहेत. २०२४-२५ या आर्थिक वर्षात भारतात अंदाजे ५.६ कोटी नवीन इंटरनेट युझर्स जोडले गेले, ज्यामुळे डिजिटल जाहिरातींची पोहोच आणखी विस्तारली. मोबाइल-फर्स्ट वापरामुळे ब्रँड्स आपले बजेट पारंपरिक माध्यमांऐवजी डिजिटल माध्यमांकडे वळवू लागले आहेत.

जाहिरात

वृत्तपत्र संपले नाही, भाषिक जाहिरात महत्त्वाची झाली!

इथे एक मोठा गैरसमज दूर करणे गरजेचे आहे. भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात वेगाने वाढणारा वृत्तपत्र बाजार आहे. जागतिक घसरणीच्या विरुद्ध दिशेने भारत वाढत आहे. २०२५मध्ये भारतातील प्रिंट वृत्तपत्रांचा अपेक्षित महसूल ३.०१ अब्ज डॉलर असेल, जो दरवर्षी १.५% वाढीने २०३०पर्यंत टिकेल असा अंदाज आहे. हिंदी, मराठी, तामीळ, तेलुगू भाषांमधील भाषिक वृत्तपत्रे प्रादेशिक मक्तेदारी आणि हायपर-लोकल बातम्यांमुळे टिकाऊ आहेत. प्रादेशिक भाषांमधील वर्तमानपत्रे- हिंदी, तामीळ, तेलुगू, मराठी, ग्रामीण बाजारपेठेत खोलवर पोहोचत आहेत. शिक्षण, रिअल इस्टेट आणि एफएमसीजी क्षेत्रांसाठी भाषिक वृत्तपत्र जाहिरात अजूनही सर्वात किफायतशीर आणि विश्वासार्ह मार्ग मानली जाते. थोडक्यात, टीव्ही आणि डिजिटलने शहरी, इंग्रजी-बोलत्या जाहिरातदाराला खेचले. पण भाषिक वृत्तपत्र हे गाव, तालुका, जिल्हा आणि मध्यमवर्गीय वाचकाचे अजूनही विश्वासू साथीदार आहे.

भाषिक जाहिराती: पुढे काय? भाषिक जाहिरातींसाठी मग पुढे काय? हा खरा प्रश्न आहे.

फिजिटल जाहिराती: भारतात प्रिंट आणि डिजिटल माध्यमांचे एकत्रीकरण वेगाने वाढत आहे. वृत्तपत्रांमध्ये क्यूआर कोड, ऑगमेंटेड रिॲलिटी आणि डिजिटल विस्तार यांचा वापर होत आहे. जून २०२४मध्ये फ्लिपकार्टने टाईम्स ऑफ इंडियामध्ये आंब्याच्या सुगंधाची जाहिरात प्रकाशित केली. हे प्रिंट-डिजिटल इनोव्हेशनचे उत्तम उदाहरण आहे. मराठी वृत्तपत्राने जाहिरात छापली आणि क्यूआर स्कॅन केल्यावर उत्पादनाचे मराठी व्हिडीओ दिसले, हे स्वप्न आता वास्तव होऊ लागले आहे.
हायपरलोकल जाहिरात – भाषिक वर्तमानपत्राची सर्वात मोठी ताकद: भारतातील विविध प्रादेशिक भाषा आणि संस्कृतींमुळे जाहिरातदारांना स्थानिक प्रेक्षकांशी संवाद साधण्यासाठी भाषिक वृत्तपत्रांची गरज कायम राहील. ग्रामीण भागात जिथे डिजिटल पोहोच मर्यादित आहे, तिथे वृत्तपत्र हे प्राथमिक माहितीचे साधन आहे. नाशिकच्या सर्वसामान्य कांदा उत्पादकाला गुगल ॲड्स समजत नाही, पण जिल्ह्याच्या वृत्तपत्रातील बियाण्याची जाहिरात त्याला समजते, आणि त्यावर त्याचा विश्वास आहे.
एआय-आधारित भाषिक सामग्री: एआय आणि ऑटोमेशन मार्केटिंगची कार्यक्षमता वाढवत आहेत, ज्यामुळे वैयक्तिकृत जाहिराती मोठ्या प्रमाणावर शक्य होत आहेत. शॉर्ट-फॉर्म व्हिडीओ सामग्री हे भविष्यातील प्रबळ माध्यम आहे. मराठी, बांगला, तेलुगू भाषांत एआय-जनरेटेड हायपर-पर्सनलाईज्ड जाहिराती- हे येत्या पाच वर्षांत सामान्य होईल. पण त्यासाठी प्रादेशिक भाषांचे डेटा-सेट्स आणि सांस्कृतिक बारकावे समजणारी यंत्रणा उभी करावी लागेल.

२३७ वर्षांनंतरचा संदेश

त्या पहिल्या बांगला जाहिरातीने एक गोष्ट सिद्ध केली होती- भाषा ही केवळ संवादाचे साधन नाही, ती विश्वासाचे माध्यम आहे. आज गुगल आणि मेटा कोट्यवधी रुपयांच्या जाहिराती भारतीय भाषांमध्ये आणत आहेत. युट्यूबवर मराठी, शॉर्ट्स वर हिंदी, व्हॉट्स अप वर बांगला- हे सारे त्या पहिल्या बांगला ओळीचेच डिजिटल वारसदार आहेत. भाषिक सामग्री यापुढे एकूण डिजिटल सामग्री वापराच्या ६०% असेल, ज्यामुळे प्रकाशक बहुभाषिक धोरणांमध्ये गुंतवणूक करत आहेत. म्हणजेच, भाषिक जाहिरात मरत नाही. ती फक्त माध्यम बदलते. कागद असो, स्क्रीन असो, की भविष्यातील कोणतेही तंत्रज्ञान असो- माणूस आपल्या भाषेतच सेवा, उत्पादनांवर अधिक विश्वास ठेवतो!

आज, २५ मार्चला, त्या एका बांगला ओळीला नक्की आठवा. ती ओळ लिहिणाऱ्या अज्ञात जाहिरातदाराला माहीत नव्हते की, तो इतिहास लिहीत आहे. पण, त्याने जे सांगितले, ते अढळ सत्य होते- “भारताच्या मातीतील माणसाशी त्यांच्याच भाषेत बोला, तरच अधिक योग्य पद्धतीने कनेक्ट व्हाल.”

(लेखक विक्रांत पाटील ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

भौतिकशास्त्रातली शंभर वर्षांपासूनची कोडी सुटली अवघ्या सेकंदात!

विज्ञान जगतात एक ऐतिहासिक घटना घडली आहे. अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ न्यू मेक्सिको आणि लॉस अलामोस नॅशनल लॅबोरेटरीच्या संशोधकांनी THOR (थोर) नावाची एक नवी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित संगणकीय प्रणाली विकसित केली आहे, जी सांख्यिकीय भौतिकशास्त्रातील सर्वात कठीण समस्यांपैकी एक...

अजितदादांनी उराशी बाळगलेले स्वप्न होणार पूर्ण!

महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पाहिलेले, नाशिक-पुणे महामार्गावर विनाअडथळा, सुखकर प्रवासाचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. या मार्गावर, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेच्या धर्तीवर ₹ 261 कोटी खर्चून 4 मिसिंग लिंक विकसित केल्या जाणार आहेत. त्यामुळे या महामार्गावरील 'ट्रॅफिक जाम'ची...

बाजारात सहज ओळखू न येणारे बांगलादेशी नकली सोने विक्रीला!

सोन्याला भारतीय संस्कृतीत अनन्यसाधारण महत्त्व आहे. लग्नसमारंभ असो, सण असो किंवा गुंतवणूक.. सोने खरेदी करणे हे भारतीयांचे, विशेषतः महाराष्ट्रीयांचे, अतूट परंपरेचे अंग आहे. मात्र, याच भावनिक आणि आर्थिक गुंतवणुकीचा फायदा घेत देशभरातील बाजारपेठांमध्ये बनावट सोन्याची विक्री वाढत असल्याचे धक्कादायक...
Skip to content