तुम्ही निवडणुकांच्या कामासाठी रुजू होऊ नका. तुमच्यावर कोण काय कारवाई करते, ते मी पाहतो, अशी ग्वाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज एका पत्रकार परिषदेत दिली.
दादरच्या शारदाश्रम विद्यामंदिरमधले शिक्षक आपल्याला भेटले. त्यांनी निवडणूक आयोगाने निवडणूक तयारीच्या कामासाठी बोलावल्याचे सांगितले. चार हजारांहून जास्त शिक्षकांना आयोगाने बोलावले आहे. हे शिक्षक तेथे गेले तर विद्यार्थ्यांचा अभ्यास कोण घेणार? त्यामुळे या शिक्षकांना आपण आयोगाच्या कामासाठी न जाण्याचा सल्ला दिला आहे. आमचे प्रतिनिधी लवकरच निवडणूक आयोगाशी चर्चा करेल आणि यावर मार्ग काढेल, असेही त्यांनी सांगितले.
शिक्षकांना निवडणुकीच्या कामात जुंपण्यावरुन राज ठाकरे आक्रमक झाले. शिक्षक निवडणुकीच्या काळात कामे करण्यासाठी आहेत का? निवडणूक आयोग पाच वर्षे काय करत असतो, असा सवाल त्यांनी केला. पुढील तीन महिने शिक्षक त्यांना हवे आहेत. हे शिक्षक कशासाठी हवेत? निवडणूक आयोगाचा आयुक्त पाच वर्षे काय करतो? तुम्हाला पाच वर्षांत यंत्रणा उभी करता येत नाही का? ही पहिली निवडणूक आहे का, किती लोक लागणार, ते तुम्हाला माहिती नाही? शिक्षकांचे काम विद्यार्थ्यांना शिकवणे हे असते. निवडणूक आयोग शिस्तभंगाची कारवाईची भीती दाखवतो. उलट आयोगावरच कारवाई केली पाहिजे, असे राज ठाकरे म्हणाले.