नवी मुंबई येथील करावे गावातील ज्ञानदिप सेवा मंडळ शाळेने मुबईच्या आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या १४ वर्षांखालील गाईल्स ढाल आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत पहिल्यांदाच जेतेपद पटकावून नवी मुंबईच्या आंतरशालेय क्रिकेटमध्ये नवा अध्याय रचला. ही मानाची स्पर्धा जिंकणारी ज्ञानदिप सेवा मंडळ ही नवी मुंबईतील पहिली शाळा ठरली. मुंबई शालेय क्रीडा संघटनेतर्फे आयोजित करण्यात येत असलेल्या या स्पर्धेला मोठा इतिहास आहे. यंदाचे या स्पर्धेचे १२४वे वर्ष होते. या स्पर्धेत तब्बल १९४ शालेय संघानी भाग घेतला होता. याच स्पर्धेतून मुंबईला अनेक दिग्गज खेळाडू मिळाले, ज्यांनी पुढे भारताचेदेखील प्रतिनिधित्व केले. त्यामुळे या स्पर्धेत खेळण्याचे प्रत्येक शालेय खेळाडूचे स्वप्न असते. या स्पर्धेत गेली अनेक वर्षं वर्चस्व राहिले ते मुंबई शहर आणि मुंबई उपनगर शालेय संघाचेच. पण यंदा मात्र ज्ञानदिप सेवा मंडळ शाळेने या स्पर्धेत अनेक बड्या शालेय संघाना धोबीपछाड देऊन अवघ्या दुसऱ्याच प्रयत्नात जेतेपद आणण्यात यश मिळवून नवा इतिहास रचला.
मुंबईच्या ऐतिहासिक ब्रेबॉन स्टेडियममध्ये झालेल्या अंतिम सामन्यात ज्ञानदिप सेवा मंडळ शाळेने बलाढ्य स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूलचा ४ गडी राखून आरामात पराभव करून पहिल्यांदा या ढालीवर आपले नाव कोरले. गतवर्षी आंबेडकर विद्यालयाकडून ज्ञानदिप सेवा मंडळ शाळेला अंतिम फेरीत हार खावी लागली होती. यंदा मात्र ज्ञानदिप सेवा मंडळाने त्या पराभवाचे जेतेपदात रुपांतर करण्यात यश मिळवले. शतकी खेळी करणारे अनुप यादव, अनुज चौधरी आणि दोन्ही डावात अर्धशतकी खेळी करणारा अथर्व हे त्यांच्या विजयाचे शिल्पकार होते. अनुप, अथर्वने अनुक्रमे ५, ४ बळी घेऊन आपल्या अष्टपैलू खेळाची सुरेख चमक दाखवली. उपांत्य फेरीत ज्ञानदिप सेवा मंडळ शाळेने आय. ई. एस. व्ही. एन.सुळे गुरुजी शाळेचा पराभव केला. या सामन्यातदेखील अनुप यादवने शानदार शतकी खेळी करुन आपल्या संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली.

दुसऱ्या लढतीत स्वामी विवेकांनद इंटरनॅशनल स्कूलने खार रोड येथील रिझवी स्प्रिंगफिल्ड हायस्कूलचा पराभव केला. १६ वर्षांखालील हॅरिस ढाल स्पर्धेतदेखील यंदा पहिल्यांदा ज्ञानदिप सेवा मंडळ शाळेने उपांत्यपूर्व फेरीत मजल मारण्याचा पराक्रम केला होता. शाळेच्या या यशात ज्ञानदिप सेवा मंडळ शाळेचे मुख्य क्रिकेट प्रशिक्षक अब्दुल खान यांचा मोठा वाटा आहे. त्यांनी दोन वर्षांपूर्वी शाळेच्या व्यवस्थापनाकडे आपल्याला शाळेचा संघ तयार करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. त्यास व्यवस्थापनाने होकार दिल्यामुळेच शाळेला हे यश मिळवता आले. त्यांनी संघ तयार करताना घेतलेली मेहनत कामी आली. खेळाडूंमध्ये जिंकण्यासाठी जिद्द निर्माण केली. त्याचेच हे फळ आहे. त्यांना त्यासाठी अगदी अ, ब, कपासुन सुरुवात करावी लागली. कारण, या खेळासाठी कुठल्याच सुविधा शाळेत नव्हत्या. शाळेत विकेटदेखील नव्हती. अब्दुल खान यांनी काही वर्षांपूर्वी शाळेजवळ आपली अकादमी सुरु केले होती. मग तिथेच शाळेतील खेळाडूंचा सराव चालायचा. आजुबाजूच्या भागातील काही प्रतिभावान युवा खेळाडूंचा खान यांनी शोध घेतला. त्यांना शाळेत प्रवेश मिळवून दिला. सुरूवातीला खान यांना मानधनदेखील मिळत नव्हते. त्याही प्रतिकूल परिस्थितीवर खान यांनी मात केली.
खान काही वर्षे मुंबईतील प्रख्यात अंजुमन इस्लाम शाळेचे मुख्य प्रशिक्षक होते. प्रवीण आमरे, अमोल मुजुमदार, अभिषेक नायर यांचे सहाय्यक प्रशिक्षक म्हणून त्यांनी काही काळ काम केले. त्यामुळे प्रशिक्षक म्हणून मोठा अनुभव त्यांच्या गाठीशी होता. तो कामाला आला. मुष्टियुद्ध, कबड्डी डीएसओच्या जिल्हास्तरीय स्पर्धेत शाळेने पदके मिळवली. पण खेळाची फार मोठी पाश्वभूमी शाळेला नव्हती. आता बुद्धिबळ संघदेखील तयार करण्याचा शाळेचा प्रयत्न आहे. मुलींचा क्रिकेट संघदेखील आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत उतवरण्याची तयारी आता ज्ञानदिप सेवा मंडळ शाळेने सुरु केली आहे. स्पर्धेच्या बक्षीस समारंभासाठी भारतीय क्रिकेट संघाचे माजी फटकेबाज फलंदाज संदीप पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनीदेखील ज्ञानदिप सेवा मंडळ शाळेच्या संघाचे भरभरून कौतुक केले. आता ज्ञानदिप सेवा मंडळ शाळेचा हा नवी मुंबईत उजळलेला क्रिकेटचा ज्ञानदिप आणखी किती काळ असाच उजळत राहतो ते बघायचे.
स्पर्धेतील पुरस्कारविजेते खेळाडू-
अंतिम सामना: अनुप यादव (ज्ञानदिप), अष्टपैलू: कार्तिक झाजेर (स्वामी विवेकानंद), सर्वोत्तम फलंदाज: नील नाईक (ज्ञानदिप), गोलंदाज: अब्दुल खत्री (रिझवी)
(लेखक सुहास जोशी ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आणि समीक्षक आहेत.)

