Homeडेली पल्सपत्रकारितेतील परवलीचा शब्द...

पत्रकारितेतील परवलीचा शब्द ‘दिनकर रायकर’!

सकाळी आठ सव्वाआठच्या सुमारास मोबाईल खणखणला. पलीकडे राजीव कुलकर्णी होता. तुम्हाला कळले की नाही? आपले रायकर साहेब गेले.. सुन्न झालो. सुमारे 45 वर्षांचा टप्पा डोळ्यासमोरून उलगडला जात होता. बातमी टाइप करणारे रायकर, प्रसिद्धीपत्रकात बातमी शोधणारे काहीसे गंभीर रायकर, फोनवर राजकीय नेत्यांशी कधी हास्यविनोद करीत तर कधी गंभीरपणे बोलणारे रायकर, वर्तमानपत्राच्या रोजच्या बैठकीत आपला मुद्दा ठामपणे पटवून बातमीदाराच्या बातमीस पहिल्या पानावर जागा मिळवून देणारे रायकर आणि सोनेरी पाण्याबरोबर मित्रांच्या गप्पात हास्यविनोद करणारे रायकर.. आणखीही सांगता येतील इतक्या विविध रुपात दिसणारे रायकरसाहेब आता आपल्यात नाहीत हे पचवणे तसे जडच आहे.

45 वर्षांत 42 वर्षे तर आमची मैत्रीच होती. पत्रकारितेच्या प्रारंभीच्या काळात अनेकांनी शिकवले, अनेकांपासून शिकलो. त्यात वसंत शिंदे आणि रायकरसाहेब या दोघांचा मोठा हात आहे. या दोघांनी तसेच लोकसत्तेच्या कोणीही ज्येष्ठ मंडळींनी मला कनिष्ठ म्हणून कधीच वागणूक दिलेली नाही. उलट या दोघांनी जेथे नेले तेथे सहकारी म्हणूनच ओळख करून दिली. “journalism can never be silent this is greatest virtue and its greatest faults also” असे म्हटले जात असले तरी रायकर यांची पत्रकारिता एका वेगळ्या अर्थाने ‘सायलेंट’ होती. रायकर यांची पत्रकारिता समन्वयवादी होती असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. टोकाची भूमिका घेणे त्यांनी नेहमीच टाळले होते. त्यामुळे अनेकांचा गैरसमजही होत असे. परंतु शेवटपर्यंत त्यांनी कधीच टोकाची भूमिका घेतली नाही.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचा पुरस्कार स्वीकारताना सपत्निक उपस्थित असलेले दिनकर रायकर..

पत्रकारितेचे जे मुख्य लक्षण की दोन्ही बाजू ऐकून तारतम्याने लिहिणे वा बाजू घेणे या त्यांच्या गुणाने त्यांच्या लेखनाला झळाळी येत असे. 70/80च्या दशकात तत्कालीन सत्तारूढ पक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये त्यांना मानाचे स्थान होते. अनेक ज्येष्ठ नेते त्यांना दिनकर या त्यांच्या नावानेच हाक मारत असत. अंतुले मुख्यमंत्री होणार, वसंतदादा बाजी मारणार, शंकररावांना संधी मिळणार, नक्की शरद पवारच.. आदी अनेक हेडलाईन्स त्याची प्रचिती देत होते. प्रदीर्घ काळ मुंबई काँग्रेसचे अध्यक्षपद भूषविलेले मुरली देवरा त्यांचे घनिष्ठ मित्र होते. त्याचवेळी विरोधी पक्षांतही त्यांचे अनेक मित्र होते. उद्योग जगतातही त्यांना चांगलाच मान होता. हे इतक्यासाठीच विस्ताराने लिहिले की, रायकर यांनी आपली संपर्ककक्षा किती रुंदावली होती हे समजावे!!

मुंबईच्या इंडियन एक्स्प्रेसमध्ये संपादक कोणीही असो, रायकर यांचेच चालत असे. ही अघोषित हुकूमत रायकर यांनी आपक्या मृदू स्वभावाने हासिल केली होती. खरे पाहता रायकर यांनी एक्स्प्रेसच्या नागपूर कार्यालयात टेलीप्रिंटर ऑपरेटर म्हणून नोकरीस सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांनी रिपोर्टर, चीफ रिपोर्टर, लोकसत्ताचे डेप्युटी एडिटर तसेच लोकमतचे समूह संपादक अशी मोठी पदे केवळ आपल्या मेहनतीने व हुशारीने मिळवली होती, हे लक्षात घेतले तर त्यासाठी त्यांनी किती मेहनत घेतली असे याचा विचारच केलेला बरा! ही सर्व मोठी पदे मिळवूनही रायकर यांनी आपला खळखळून हसणारा स्वभाव मात्र कधीच हरवू दिला नाही. कितीही गंभीर समस्या असली तरी ते एका हास्याने ती दूर करत असत. सहकाऱ्यांशी तर मनमोकळेपणाने बोलत असत. अनेकवेळा त्यांनी व्यवस्थापन आणि सहकारी यांच्यातील दुवा म्हणून काम केले. अगदी मोजक्या वेळी या दुव्याने काम झालेही नसेल. परंतु रायकर यांनी आपल्या बाजूने सर्व प्रयत्न केले होते हे मान्य करावे लागेल…

“किती जरी असली,

तरीही त्या गर्दीत

माणसाचा चेहरा शिल्लक असतोच

या माझ्या विश्वासाच्या खांद्यावर

मी माझी थकलेली मान ठेवतो! 

ओलावून मिटलेल्या माझ्या डोळ्यात

एक मोर विश्वासाने नाचत असतो!!”

हा मोर म्हणजेच जणू दिनकर रायकर!!

Continue reading

पोलीस आयुक्त देवेन भारती.. एक नजर इधर भी…

मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी नुकतीच एक पत्रकार परिषद घेऊन यंदाच्या जानेवारी ते ऑगस्टमधील शहरातील गुन्हेगारीचा आलेख व पोलिसांची कामगिरी विषद केली. खरंतर अशा पत्रकार परिषदा घेऊन पोलीस, जनता व पत्रकारांध्ये माहितीचे आदानप्रदान होणे महत्त्वाचे असते. पूर्वी अनेक...

गणरायही गुदमरले रेल्वेस्थानक परिसरातल्या या प्रचंड गर्दीने!

सरकारी व रेल्वे खात्याच्या आकडेवारीच्या आधारे विचार केला तर ठाणे रेल्वेस्थानकातून दररोज सुमारे पाच ते सहा लाख प्रवासी ये-जा करीत असतात. प्रवासी नागरिकांबरोबरच स्थानक परिसरात असलेल्या लाखो फेरीवाल्यांमुळे आधीच हैराण झालेल्या प्रवाशांच्या हालात परिसरातच मोठा मंडप घालून सार्वजनिक गणपती...

मुंढेंच्या कारवाईविरूद्ध न्यायालयाचे अर्थशून्य ताशेरे! बहोत नाइंसाफी है यह…

तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध विभागाचे आयुक्त म्हणून सूत्रे हाती घेतल्यापासून संपूर्ण राज्यभर एकच हलकल्लोळ माजला आहे. भेसळ करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. औषध नियंत्रण नियमावलीचे पालन न करणाऱ्यांचे तर आता पितळ उघडे पडत आहे. अधूनमधून कारवाईचा दणका बसलेली...
Skip to content