Friday, April 18, 2025
Homeन्यूज अँड व्ह्यूजधनंजय मुंडेंना भोगावी...

धनंजय मुंडेंना भोगावी लागणार आपल्या कर्माची फळे!

गोपीनाथ मुंडे यांचा बहुचर्चित पुतण्या धनंजय मुंडे सध्या जोरदार प्रसिद्धीच्या झोतात आहे. धनंजय मुंडे हे गोपीनाथ मुंडे यांचे वारसदार समजले जायचे. गोपीनाथ मुंडे यांना मुली असल्याने मुंडे यांचा वारसदार धनंजय होणार अशी चर्चा होती. गोपीनाथ मुंडे महाराष्ट्राचे गृहमंत्री असताना धनंजय यांची जबरदस्त वट होती. त्यामुळे धनंजय हेच वारसदार होणार असे उभ्या महाराष्ट्राला वाटत होते. मात्र गोपीनाथ मुंडे यांनी आपली मुलगी पंकजा मुंडे यांना राजकारणात सक्रिय केल्याने धनंजय आणि त्यांचे वडील पंडितअण्णा मुंडे यांचा निरस झाला. त्यामुळे गोपीनाथ मुंडे हयात असताना परळी नगरपरिषदेत बंड करून धनंजय यांनी आपल्या मर्जीतला नगराध्यक्ष निवडून आणला. तेथूनच या घराण्यातील भाऊबंदकीला सुरुवात झाली. अखेर पंडितअण्णा मुंडे शरद पवारांना भेटले. पुढे धनंजय राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कार्यरत झाले.

धनंजय यांचे व्यक्तिमत्व आणि वक्तृत्व यामुळे शरद पवार यांनी त्यांना विधान परिषदेवर घेतले आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद दिले. याचा फायदा धनंजय यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला करून दिला. बीड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस वाढण्यास त्यामुळे मदत झाली. धनंजय यांचे बीड जिल्ह्यातील वर्चस्व पाहून पवारांचे जुने शिलेदार सुरेश धस आदी नेते नाराज झाले. त्यामुळे सुरेश धस आणि त्यांच्या समर्थकांनी भारतीय जनता पक्षाचा झेंडा हाती घेतला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर धनंजय मुंडे अजित पवार यांच्यासोबत राहिल्याने ते आता महायुतीचा भाग बनले आहेत. विधानसभेतही परळीची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सुटल्याने भाजपला पंकजाताईंना विधान परिषदेवर संधी द्यावी लागली. 2019च्या निवडणुकीत धनंजय यांनी पंकजाताईंचा पराभव केला होता. मात्र यावेळी पंकजाताईंना आपल्या भावाचा प्रचार करावा लागला. धनंजय पुन्हा मंत्री झाल्याने आता भाजपवासी झालेल्या त्यांच्या जुन्या विरोधकांची पंचाईत झाली. गेली पाच वर्षं धनंजय मुंडे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री असल्याने त्यांचा दबदबाही वाढला.

मुंडे

एखाद्या जिल्ह्याचा पालकमंत्री आपला गॉडफादर असेल तर कार्यकर्त्यांच्या डोक्यातही हवा जाते. बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्त्येवरून बीड जिल्ह्यातील राजकारणाला सुरुवात झाली. ही हत्त्या धनंजय मुंडे यांचे समर्थक वाल्मीक कराड यांनी केल्याचा त्यांच्या विरोधकांचा आरोप आहे. सुरेश धस याबाबत आरोपावर आरोप करत आहेत. भाजपचे आमदार महायुतीतील आपल्या मंत्र्यावर गेले आठवडाभर आगपाखड करत आहेत. मुंबईतील कथित सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या प्रकरणात उडी घेऊन धनंजय यांच्यावर आरोपांची मालिका सुरू केली आहे. एका बाजूला भाजपचे आमदार आणि दुसऱ्या बाजूला शिवसेनेचे दोन मंत्रीसुद्धा धनंजय यांच्यावर टीका करत आहेत. मात्र याबाबत धनंजय यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे. धनंजय यांचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार मात्र शांत आहेत. ते फक्त संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना भेटून आले. मात्र या प्रकरणावर त्यांनी भाष्य केलेले नाही.

धनंजय यांचे सहकारी वाल्मीक कराड पुणे सीआयडीकडे शरण आले आहेत. आपला या प्रकरणाशी काही संबंध नाही आणि न्यायदेवता मला न्याय देईल असा व्हिडिओ समाजमाध्यमावर प्रसिद्ध करत वाल्मीक कराड पोलिसांना शरण आले आहेत. परंतु एवढ्याने हे प्रकरण थांबणारे नाही. धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतल्याशिवाय महायुतीतील भाजप आणि शिवसेना हे दोन पक्ष गप्प बसणार नाहीत. अंजली दमानिया यांनी या प्रकरणात कोणाच्या सांगण्यावरून उडी घेतली आहे हे सर्व महाराष्ट्राला माहित आहे. यापूर्वी त्यांनी तत्कालीन मंत्री एकनाथ खडसे यांच्यावर आरोपांची मालिका केली होती. विशेष म्हणजे बीडचे हे प्रकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षांच्या ताब्यात न देता महायुतीतील पक्षातील आमदारांना आणि मंत्र्यांना पुढे करून ताजेतवाने ठेवले आहे. विरोधी पक्षांपेक्षा सुरेश धस आणि पंकजा मुंडे यांनीच हे प्रकरण धगधगत ठेवले आहे. दमानिया यांच्याकडे व्हिडिओ, माहिती, फोन कॉलचे डिटेल्स, फोन कॉल रेकॉर्डिंग कुणाकडून येतात हे आता लपून राहिलेले नाही. त्यामुळे त्या धनंजय मुंडेंना टारगेट करण्यात सहभागी झाल्या आहेत. महायुतीतील ही अंतर्गत लढाई आता अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा येईपर्यंत सुरू राहणार आहे. धनंजय मुंडे काही निर्दोष नाहीत. गेल्या पाच वर्षांत पालकमंत्री म्हणून केलेल्या कर्माची फळे त्यांना आता भोगावी लागणार आहेत.

Continue reading

अमित शाहंच्या मनात नेमकं चाललंय तरी काय?

गेल्याच आठवड्यात देशाचे गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते. विशेष म्हणजे यावेळी अमित शाह यांनी शिवछत्रपतींची राजधानी रायगड किल्ल्याला भेट देऊन छत्रपती शिवाजी महाराज हे कुणा एका पक्षाचे दैवत नसून आमचेही आहे असे ठासून सांगण्याचा प्रयत्न केला....

राज ठाकरेंच्या पक्षाचे भवितव्य आताही अंधारातच!

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वक्तृत्वाचा आणि व्यंगचित्रकार म्हणून वारसा चालवणारे राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे भवितव्य काय असेल, याच्या चर्चा आता रंगू लागल्या आहेत. यंदाच्या गुढीपाडव्याच्या मेळाव्यात राज ठाकरे आपल्या पक्षाची स्पष्ट भूमिका जाहीर करतील अशी महाराष्ट्र नवनिर्माण...

शिंदेंना गद्दार म्हणणारे कुणाल कामरा कोण?

स्टँडअप कॉमेडीयन कुणाल कामरा यांच्या राजकीय विडंबनामुळे महाराष्ट्र ढवळून निघाला आहे. या कुणाल कामरांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता राजकीय विडंबन केले आहे. शिंदे यांच्या शिवसैनिकांनी कुणाल कामरा यांचा शो जेथे रेकॉर्ड केला होता त्या स्टुडिओची नासधूस...
Skip to content