Thursday, December 12, 2024
Homeकल्चर +गोव्यातल्या 54व्या ‘इफ्फी’ची...

गोव्यातल्या 54व्या ‘इफ्फी’ची सांगता!

गोव्यात काल अरबी समुद्रावर सूर्य मावळत असताना, पणजीच्या नयनरम्य किनाऱ्यावर सोनेरी आठवणींचा ठेवा देत, 54व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची (इफ्फी) सांगता झाली. चित्रपटसृष्टीतील उत्कृष्टता आणि मोहकता यांचे दर्शन या महोत्सवात घडले. चित्रपट आणि मनोरंजन क्षेत्रातील दिग्गज या शानदार सांगता सोहळ्याला उपस्थित होते.

‘एंडलेस बॉर्डर्सला’ सुवर्ण मयूर पुरस्कार

अब्बास अमिनी दिग्दर्शित ‘एंडलेस बॉर्डर्स’ या पर्शियन चित्रपटाने 54व्या इफ्फीमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठीचा सुवर्ण मयूर पुरस्कार पटकावला. ”तुम्ही स्वतःवर लादलेल्या भावनिक आणि नैतिक सीमा भौगोलिक सीमांपेक्षा अधिक गुंतागुंतीच्या, ओलांडायला कठीण असू शकतात”, असे मनोगत परीक्षकांनी व्यक्त केले.

स्टीफन कोमांडारेव्ह ठरले सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून बल्गेरियन दिग्दर्शक स्टीफन कोमांडारेव्ह यांना ‘ब्लागाज लेसन्स’ या चित्रपटासाठी रौप्य मयूर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या चित्रपटाबाबत परीक्षकांनी सांगितले की, स्टीफन कोमांडारेव्ह एका स्त्रीच्या व्यक्तिरेखेद्वारे एक खोलवर ठसा उमटवणारा आणि धक्कादायक धडा सांगतात. चित्रपटातील व्यक्तिरेखा ब्लाग हिला तिची ध्येये साध्य करण्याचा निर्णय घ्यावा लागतो आणि असे करताना तिच्या मूल्यांशी तडजोड करावी लागते. चित्रपटात भूमिका साकारणाऱ्या एली स्कोर्चेवा आणि रोझाल्या अबगार्यान या अभिनेत्रींनी स्टीफन कोमांडारेव्ह यांच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारला.

पौरिया रहिमी सॅम ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता

इराणी अभिनेते पौरिया रहिमी सॅम यांची अब्बास अमिनी दिग्दर्शित पर्शियन चित्रपट एंडलेस बॉर्डर्समधील भूमिकेसाठी सर्वानुमते सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून निवड करण्यात आली. अभिनयाची समृद्धता आणि चित्रिकरणाच्या आव्हानात्मक स्थितीत जोडीदार, मुले आणि प्रौढांसोबत संवाद कौशल्य यासाठी ही निवड करण्यात आली, असल्याचे परिक्षकांनी सांगितले.

मेलानी थियरी ठरली सर्वोत्कृष्ट अभिनेत्री

फ्रेंच अभिनेत्री, मेलानी थियरी यांना ‘पार्टी ऑफ फूल्स’ या चित्रपटातील उल्लेखनीय भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून सन्मानित करण्यात आले. या चित्रपटात अभिनेत्री आपल्या वेडसर व्यक्तिरेखेच्या सादरीकरणातून प्रेक्षकांना आशेपासून निराशेपर्यंतच्या सर्व भावनांचे हृद्य दर्शन घडवते, असे परीक्षक म्हणाले. निर्माती ज्युलिएट ग्रँडमॉन्ट यांनी मेलानिया थियरी यांच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारला.

ऋषभ शेट्टी विशेष ज्युरी पुरस्काराने सन्मानित 

भारतीय चित्रपटकर्मी ऋषभ शेट्टी यांना त्यांच्या ‘कांतारा’ चित्रपटासाठी विशेष ज्युरी पुरस्कार मिळाला. अतिशय महत्त्वाच्या विषयावरची कथा सादर करण्याच्या दिग्दर्शकाच्या क्षमतेची परीक्षकांनी प्रशंसा केली. चित्रपट, स्वतःच्या वैशिष्ट्यपूर्ण जंगल संस्कृतीतला असून संस्कृती आणि सामाजिक स्थितीची सीमारेषा ओलांडून प्रेक्षकांपर्यंत पोहोचतो, असे परीक्षकांनी नमूद केले.

रेगर आझाद काया यांना सर्वोत्कृष्ट पदार्पण चित्रपटाचा दिग्दर्शक पुरस्कार

सीरियन अरब रिपब्लिकमधील एक आश्वासक चित्रपट निर्माते असणाऱ्या रेगर आझाद काया यांना त्यांच्या व्हेन द सीडलिंग्ज ग्रो या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट पदार्पण चित्रपटाचा दिग्दर्शक पुरस्कार मिळाला. ज्युरींनी उद्धृत केले की, हा चित्रपट एक कथा कथन करतो जी आपल्याला एक बाप, मुलगी आणि हरवलेल्या मुलाच्या आयुष्यातील एक दिवस छोट्या-छोट्या घटनांमधून उलगडून दाखवण्यात यशस्वी होते.

अँथनी चेनच्या ड्रिफ्टला आयसीएफटी-युनेस्को गांधी पदक

फ्रेंच, ब्रिटिश आणि ग्रीक सह-निर्मिती असलेल्या अँथनी चेन दिग्दर्शित ड्रिफ्टला प्रतिष्ठित आयसीएफटी-युनेस्को गांधी पदक मिळाले. जीवनातील अनिश्चिततेतून वाहून जात असताना अनपेक्षित बंध कसे निर्माण होऊ शकतात याचे चित्रण करणारा हा चित्रपट आशा आणि लवचिकतेच्या रेषा रेखाटतो असे निरीक्षण निवड ज्युरींनी नोंदवले.

‘पंचायत सीझन २’ला सर्वोत्कृष्ट वेब सिरीज पुरस्कार

दीपक कुमार मिश्रा दिग्दर्शित पंचायत सीझन 2ला सर्वोत्कृष्ट वेब मालिका (ओटीटी)साठी यंदा प्रथमच देण्यात येणारा पुरस्कार मिळाला. ही मालिका एका अभियांत्रिकी पदवीधराच्या जीवनावर आधारित आहे जो उत्तर प्रदेशातील फुलेरा या दुर्गम काल्पनिक गावात पंचायत सचिव म्हणून नोकरीच्या इतर चांगल्या पर्यायांअभावी रुजू होतो. अभिषेक त्रिपाठी या मालिकेत जितेंद्र कुमार या मुख्य नायकाची भूमिका साकारत आहे.

इफ्फी

मायकेल डग्लस यांना सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार प्रदान

दिग्गज हॉलिवूड अभिनेता आणि निर्माता मायकेल डग्लस यांना समारोप समारंभात प्रतिष्ठित सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. परस्पर भिन्न कलात्मक सांस्कृतिक अभिव्यक्ती असलेल्या लोकांना एकत्र आणण्याची आणि बदलण्याचे सामर्थ्य सिनेमात आहे, असे मत डग्लस यांनी व्यक्त केले. दोन वेळचे ऑस्कर पुरस्कार विजेते डग्लस यांनी जागतिक सिनेमाची भाषा ही पूर्वीपेक्षा अधिक जागतिक झाली असल्याकडेही लक्ष वेधले. भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) म्हणजे चित्रपट निर्मिती प्रक्रियेतील मंतरलेपणाची पुनर्अनुभूती करून देणारा आणि परस्पर भिन्न सांस्कृतिक कलात्मक अभिव्यक्ती ओलांडत, काळ, भाषा आणि भौगोलिक परिस्थितीच्या पलीकडे घेऊन जाणारा अनुभव असल्याचं ते म्हणाले.

मंतरलेला आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सव: अनुराग सिंह ठाकूर

इफ्फीच्या समारोप समारंभाला केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी व्हिडिओ संदेशाच्या माध्यमातून संबोधित केले. भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे हे 54वे पर्व म्हणजे ‘वसुधैव कुटुंबकम’ या भावनेला मूर्त रूप देत विविधतेतील एकतेचे दर्शन घडवणारा, तसेच कल्पक व्यक्तिमत्वे, चित्रपटकर्ते, सिनेरसिक आणि संस्कृतीवर प्रेम करणाऱ्या सगळ्यांना एकत्र आणणारा उत्सव असल्याचे ते म्हणाले.

गोव्याला चित्रपटसृष्टीचा स्वर्ग बनवणार – मुख्यमंत्री प्रमोद सावंत

हिरवीगार जंगले, नदी, धबधबे, गावे आणि भरगच्च भातशेती यामुळे गोवा चित्रपट निर्मात्यांचे नंदनवन आहे, कारण हे राज्य पारंपारिक आणि आधुनिकतेचे सुंदर मिश्रण आहे. चित्रपटांचे विविध ठिकाणी चित्रिकरण करण्यासाठी राज्याची सुव्यवस्थित प्रणाली विनाअडथळा परवानग्या देते. गोव्याचा प्रदेश चित्रपट उद्योगासाठी नंदनवन बनवण्यासाठी मी कटिबद्ध आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान प्रदान करणार्‍या पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी तसेच आंतरराष्ट्रीय चित्रपट निर्मात्यांना प्रोत्साहन देण्यासाठी योजना सुरू आहेत, असे गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.

संघर्ष आणि युद्धाने ग्रासलेल्या जगाच्या संदर्भात आपल्या कथा सांगणे आवश्यक आहे, त्यामुळे इफ्फी सारखे चित्रपट महोत्सव महत्त्वाचे आहेत. आपण जे आहोत, तेच आपल्या कथा सांगतात. कथा या मुळात आपण माणूस असण्याबद्दल असतात. माणूस असणे हा आपला मूलभूत पैलू आहे. जर आपण आपल्या कथा एकमेकांना सांगितल्या तर लोक सीमांचे बंधन ओलांडून त्या कथा ऐकतील आणि एकमेकांना समजूनही घेतील, असे इफ्फीचे आंतरराष्ट्रीय ज्युरी अध्यक्ष शेखर कपूर म्हणाले.

ज्युरीचे सदस्य स्पॅनिश सिनेमॅटोग्राफर जोस लुईस अल्केन, फ्रेंच चित्रपट निर्माते जेरोम पेलार्ड आणि कॅथरीन दुसार्ट आणि ऑस्ट्रेलियन चित्रपट निर्मात्या हेलन लीक यांचा या कार्यक्रमात सत्कार करण्यात आला.

पार्श्वगायक आणि चित्रपट संगीतकार हरिहरन, चित्रपट अभिनेते नाना पाटेकर, ईशा गुप्ता, दिव्या दत्ता, उत्पल बोरपुजारी, चित्रपट निर्माता जेरोम पेलार्ड, हॉलीवूड अभिनेत्री कॅथरीन झेटा जोन्स, उपाध्यक्ष, आयसीएफटी सर्ग मिशेल, प्लॅटफॉर्म फॉर क्रिएटिव्हिटी अँड इनोव्हेशनचे संचालक, आयसीएफटी शुयुआन हून हेदेखील यावेळी उपस्थित होते.

तारांकित कलाकारांच्या शानदार सादरीकरणाचा साक्षी असणाऱ्या या समारंभाचे सूत्रसंचालन आयुष्मान खुराणा आणि मंदिरा बेदी यांनी केले.

Continue reading

कामगारमहर्षी आंबेकर बुध्दिबळ स्पर्धेत अंशुमनला चकवून ध्रुव गटविजेता

मुंबईच्या राष्ट्रीय मिल मजदूर संघ, महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघ व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित कामगार महर्षी गं. द. आंबेकर स्मृती १४ वर्षांखालील बुध्दिबळ स्पर्धेत आंतरराष्ट्रीय फिडे गुणांकित ध्रुव जैनने (३.५ गुण) पांढऱ्या मोहरांनी खेळणाऱ्या अपराजित अंशुमन समळला (३.५)...

हौशी नाट्यस्पर्धेच्या अंतिम फेरीत ‘पाकीट’ व ‘लिअरने जगावं की मरावं?’

63व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धेत मुंबई- 1 केंद्रातून पोलीस पत्नी एकता मंच, मुंबई या संस्थेच्या `पाकीट' या नाटकाला प्रथम पारितोषिक तसेच धाकूशेठ पाडा सेवा मंडळ, मुंबई या संस्थेच्या 'लिअरने जगावं की मरावं?' या नाटकास द्वितीय पारितोषिक जाहीर झाल्याची...

‘मॅट’च्या ३३ वर्षांतल्या पहिल्याच लोक अदालतीत १२६ अर्जदारांना शासकीय नोकरी

महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या (मॅट) इतिहासात ३३ वर्षांत झालेल्या पहिल्याच लोक अदालतीत तीन प्रकरणात तडजोड झाल्याने १२६ अर्जदारांना शासकीय नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जलसंधारण विभागाच्या १७१ आणि कृषि विभागाच्या २१८ जागा माजी सैनिकांसाठी आरक्षित होत्या. यामध्ये सर्व जागांसाठी...
Skip to content