Homeएनसर्कलतब्बल ३० वर्षांनंतर...

तब्बल ३० वर्षांनंतर संरक्षण दलाचे तीनही प्रमुख एकत्र एनडीएमध्ये!

तब्बल ३० वर्षांनंतर म्हणजेच १९९१ सालानंतर काल आणि आज असे दोन दिवस भारतीय संरक्षण दलांचे तीनही प्रमुख, म्हणजे नौदलप्रमुख अॅडमिरल करमबीर सिंग, हवाईदलप्रमुख राकेश कुमार भदौरिया आणि लष्करप्रमुख जनरल एम. एम. नरवणे यांनी खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए), या आपल्या मातृसंस्थेला एकत्र भेट दिली.

तिन्ही संरक्षण सेवांचे प्रशिक्षण देणाऱ्या या सुप्रसिद्ध प्रबोधिनीसाठी हा एक ऐतिहासिक क्षण होता. देशाच्या तिन्ही संरक्षण दलांच्या प्रमुखपदाची जबाबदारी सांभाळणारे तीनही अधिकारी, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या ५६व्या तुकडीचेच प्रशिक्षणार्थी होते. ही अत्यंत दुर्मिळ घटना आहे. याआधी, १९९१ साली, तिन्ही सेनादलांचे प्रमुख एकाच तुकडीचे प्रशिक्षणार्थी म्हणून एनडीए (त्यावेळेचा सामाईक सेवा विभाग) इथे होते.

तिन्ही सैन्यदल प्रमुखांच्या वतीने, आपले मनोगत व्यक्त करताना नौदलप्रमुख

आपल्या मातृसंस्थेला एकत्रित भेट देण्यामागच्या या विशेष कल्पनेमागे केवळ प्रबोधिनीमध्ये एकत्र शिकताना निर्माण झालेले मैत्रीबंध अधिक दृढ करणे हाच हेतू नव्हता, तर  या तीन-सेवा प्रशिक्षण संस्थेची ओळख असलेल्या तिन्ही दलांमधील सौहार्दाची, एकत्रितपणाची भावना अधिक दृढ करणे, हाही हेतू होता.

तिन्ही संरक्षण दलांसाठीच्या या संयुक्त प्रशिक्षण प्रबोधिनीच्या स्थापनेची कल्पना, १९४५ साली, त्यावेळेचे लष्करप्रमुख, फील्ड मार्शल सर क्लाउड ऑचिनलेक यांच्या नेतृत्त्वाखालील समितीतून निर्माण झाली होती. त्यानंतर प्रत्यक्ष अकादमीची स्थापना होऊन, १९४९ साली, त्यावेळच्या तात्पुरत्या स्थानी, डेहराडून इथे, अकादमीचे कामकाज सुरू झाले. सहा ऑक्टोबर १९४९ साली खडकवासला इथे या प्रबोधिनीची पायाभरणी झाली आणि १६ जानेवारी १९५५ रोजी तिचे उद्घाटन झाले.

‘हट ऑफ रिमेमबरन्स’ या स्मृतिस्थळी श्रद्धांजली अर्पण करतांना लष्करप्रमुख

आपल्या ६० वर्षांच्या दैदीप्यमान इतिहासात, या प्रबोधिनीतून प्रशिक्षण घेतलेल्या अधिकाऱ्यांपैकी १३ लष्करप्रमुख, ११ नौदलप्रमुख आणि नऊ हवाईदलप्रमुख झाले. अॅडमिरल करमबीर सिंग, PVSM, AVSM, ADC यांनी नौदलप्रमुख म्हणून ३१ मे २०१९ रोजी कार्यभार स्वीकारला. राकेश कुमार भदौरिया PVSM, AVSM, VM, ADC यांनी ३० सप्टेंबर २०१९ रोजी आणि जनरल एम एम नरवणे PVSM, AVSM, SM, VSM, ADC यांनी लष्करप्रमुख म्हणून, ३१ डिसेंबर २०१९ रोजी आपला कार्यभार स्वीकारला.

यावेळी तिन्ही सैन्यदलप्रमुखांच्या वतीने आपले मनोगत व्यक्त करताना नौदलप्रमुखांनी आधुनिक युद्धशास्त्राच्या नवनव्या तंत्रज्ञानाविषयी माहिती दिली. आधुनिक लष्करी नेतृत्त्वाचे मूलभूत सिद्धांत समजून घ्यावे, असा सल्ला त्यांनी कॅडेट्सना दिला. सर्व प्रमुखांनी सध्या सुरू असलेल्या प्रशिक्षणाचा आणि प्रशिक्षणासाठीच्या पायाभूत सुविधांचा आढावाही घेतला.

‘हट ऑफ रिमेमबरन्स’ या स्मृतिस्थळी श्रद्धांजली अर्पण करताना हवाई दलप्रमुख

आपल्या भेटीदरम्यान तिन्ही सैन्यदलप्रमुखांनी ‘हट ऑफ रिमेमबरन्स’ या शाहिद स्मृतिस्थळी श्रद्धांजली वाहिली. एनडीए संस्थेतून, प्रशिक्षित होऊन गेलेल्या आणि कर्तव्य बजावताना वीरमरण पत्करलेल्या हुतात्मा अधिकाऱ्यांच्या सन्मानार्थ हे स्मृतिस्थळ तयार करण्यात आले आहे. या प्रमुखांनी, आपापल्या सेवेतील प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांशी संवादही साधला. त्याशिवाय प्रशिक्षक, व्याख्याते आणि एनडीएतील कर्मचाऱ्यांशीही त्यांनी संवाद साधला.

तिन्ही सैन्यदलांच्या प्रमुखांची ही भेट एनडीएसाठी प्रेरणादायक आणि अभिमानाची भावना जागृत करणारी ठरली. या भेटीतून प्रशिक्षणार्थी त्यांच्या लष्करी करियरमध्ये उत्कृष्ट कार्य करण्याची प्रेरणा मिळेल. तसेच, तिन्ही सेवादलांमध्ये सौहार्द आणि एकत्रितपणाची भावना वाढीस लागेल.


कमांडन्ट आणि डेप्युटी कमांडन्ट यांच्या उपस्थितीत हुतात्मा जवानांना सलाम करतांना तिन्ही सैन्यदलप्रमुख

Continue reading

फेसबुक, इन्स्टाग्रामला ५,४०० कोटींचा दंड

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचा लहान मुलांवर आणि त्यांच्या मानसिक आरोग्यावर होणारा गंभीर परिणाम लक्षात घेता, अमेरिकन न्यायालयाने 'मेटा' (फेसबुक आणि इन्स्टाग्रामची मूळ कंपनी) ला मोठा दणका दिला आहे. मुलांच्या सुरक्षेशी तडजोड केल्याप्रकरणी, त्यांच्या मानसिक आरोग्याला हानी पोहोचवल्याप्रकरणी आणि गोपनीयतेच्या उल्लंघनाबाबत...

सोशल मीडियावरचे १८ वर्षांखालील युझर्स ‘बालक’!

लहान मुले आणि तरुणांवर सोशल मीडिया तसेच ऑनलाइन गेमिंगच्या वाढत्या दुष्परिणामांना आळा घालण्यासाठी संसदेत एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. भाजपचे खासदार बैजयंत पांडा यांनी संसदेत ‘शिल्ड’ नावाचे एक खासगी विधेयक मांडण्याची नोटीस दिली आहे. या प्रस्तावित विधेयकानुसार, १३...

देशातल्या नागरी सहकारी बँकांचे मुख्यालय दिल्लीहून मुंबईत!

देशातील नागरी सहकारी बँकिंग क्षेत्राला अधिक बळकट करण्यासाठी स्थापन झालेल्या ‘नॅशनल अर्बन कोऑपरेटिव्ह फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड’ (एनयूसीएफडीसी) या सर्वोच्च संस्थेचे मुख्यालय नवी दिल्लीहून मुंबईत हलवण्यात आले आहे. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी शनिवारी या...
Skip to content