Homeमाय व्हॉईसदलाई लामांनी नव्याने...

दलाई लामांनी नव्याने घेतला चिनी सरकारशी पंगा!

जगभरातील बौद्ध धर्माचा प्रचार मोठा झाला आहे. पण तिबेटमधील बौद्ध धर्म, हे थोडे निराळे प्रकरण आहे. इथे शांतीचा, मुक्तीचा, तपस्येचा मार्ग तर आहेच, पण एकेकाळी इथल्या बौद्धधर्मियांच्या तिबेट प्रांतावर अधिसत्ताही गाजवलेली होती. १९५०पर्यंत ल्हासात विद्यमान १४वे दलाई लामा तेंझीन ग्यात्सो, हेच सत्ताकेंद्र होते. चीनने त्यावर्षी सैन्य घुसवून लामांचे राज्य संपुष्टात आणले. पुढच्या सहा-सात वर्षांत चीनच्या दडपशाहीत वाढ झाली तेव्हा चिनी सत्ता नाकारून १४वे दलाई लामा यांनी भारताचा आश्रय घेतला. ते आता भारतात राहणारे तिबेटी बौद्धधर्मियांचे तारणहार आहेत. सुरूवातीची दीड-दोन दशके दलाई लामांनी तिबेटमधील चिनी सत्ता उलथवण्यासाठी सशस्त्र संघर्ष करणाऱ्या तिबेटी बंडखोरांना पाठिंबा दिला होता. पण भारत सरकारने त्यांना तसे करण्यास प्रतिबंध केला. भारताच्या भूमिवरून चिनी सत्तेविरोधातील बंड पोसत राहणे भारताला राजनैतिकदृष्ट्या परवडणारे नव्हते. तिबेटी संघर्षाला अधिकृत पाठिंबा जर भारत देणार असेल तर मग काश्मिरी अतिरेक्यांना पाकिस्तान पोसतो हा आरोप आपण कोणत्या तोंडाने करणार? दलाई लामांनी ती अडचण समजून घेतली आणि 1974मध्ये तिबेटी संघर्षाच्या विरोधात जाहीर भूमिका घेतली. आता ते भारतात राहून केवळ धार्मिक प्रबोधन, चिंतन करतात आणि म्हणून भारत त्यांना आश्रय देतो अशी एकूण मांडणी आहे. पण तरीही त्यांचे भारतातील अस्तित्त्व चिनी सत्तेला नेहमीच खुपत आले आहे.

दलाई लामा ही संस्था चिनी वळणानेच चालली पहिजे, असे बिजिंगचे ठाम मत आहे. गेली सहा-सात दशके दलाई लामांचा मुक्काम हिमाचल प्रदेशातील धरमशाला येथे आहे. तिथेच तिबेटींची देशाबाहेरची वनवासातील संसदही आहे. १९५०च्या दशकातील ज्या घडामोडी घडल्या तेव्हा तरूण वयातील १४वे दलाई लामा तेंझीन ग्यात्सो यांनी सहकुटूंब सहपरिवार ल्हासातून पलायन केले. त्यांच्या आधीचे १३वे दलाई लामा यांनी आपला तिबेट हा स्वतंत्र देश असल्याचे १९३०मध्येच घोषित केले होते. ल्हासा ही तिबेटची राजधानी खरेतर सात-आठव्या शतकात एका विशाल साम्राज्याची राजधानी होती. एकेकाळी चीनमधील युआन प्रांतापासून भारतातला बंगालपर्यंतचा प्रदेश या तिबेटी साम्राज्याचा भाग होता. १०व्या शतकानंतर हे साम्राज्य आक्रसत गेले. तिबेटी पठारापुरते मर्यादित राहिले. चिनी सम्राटांनी तिबेटला स्वायत्तता दिली होती. ल्हासाने चीनचे मांडलिकत्व मान्य केले होते. चीनमध्ये राजेशाहीचा अंत करून कम्युनिस्टांचे राज्य १९१३मध्ये प्रस्थापित झाले. तेव्हाचे १३वे दलाई लामा यांनी तो सत्ताबदल मान्य केला नाही. त्यांनी ल्हासाचे स्वातंत्र्य जाहीर करून टाकले. पुढची चाळील वर्षे ल्हासाने स्वातंत्र्य टिकवलेही होते.

माओंच्या राजवटीने पिपल्स आर्मी पाठवून १९५०मध्ये तिबेटचा ताबा घेऊन टाकला. सुरूवातीला तरूण १४वे दलाई लामा यांनी कम्युनिस्ट पार्टीच्या राजवटीचा स्वीकार केला होता. चिनी सत्तेने तिबेटमध्ये ताबा घेतल्यापासून लामांचे स्वातंत्र्यप्रेमी पाठीराखे देश सोडून भारतात पलायन करत होते. स्वतः दलाई लामा १९५९मध्ये चिनी सत्ता अमान्य असल्याचे जाहीर करून भारताच्या आश्रयाला आले. पं नेहरूंनी मानवतेच्या दृष्टिकोनातून या धार्मिक नेत्याला आसरा दिला. ते पायी हिमालय ओलांडून मोठ्या खडतर मार्गाने भारतात अरुणाचलमधील तवांगला

दलाई लामा

पोहोचले होते. तिथून सिक्कीमला राहून मग ते धरमशालात आले. मॅक्लीओडगंज गावाबाहेरच्या डोंगराच्या कुशीतील स्वर्ग आश्रम ही जागा सरकारने त्यांना बहाल केली. त्याच परिसरात तिबेटींनी वनवासातील संसंदही सुरु केली. गॅडेन फोडरंग हे तिबेटींच्या सरकारचे प्रशासनाचे प्राचीन नाव होते. आता त्याच नावाचा ट्रस्ट १४वे दलाई लामा यांनी स्थापन केला आहे. अलिकडेच त्यांनी जाहीर केले की, माझ्यानंतरही दलाई लामांची परंपरा कायम राहील. माझा वारसदार निवडण्याचे काम फक्त गॅडेन फोडरंग ट्रस्ट करेल. अन्य कोणालाही त्यात ढवळाढवळ करण्याचा अधिकार नाही. हे सांगतानाच त्यांनी चीनबरोबर मोठा पंगा घेतला आहे.

गेली काही दशके चीन सांगतोच आहे की, चीनमधील तिबेटी जनताच पुढचे दलाई लामा निवडेल. बाहेरच्यांना तो अधिकार नाही. नव्या दलाई लामांची निवड प्राचीन तिबेटी बौद्ध परंपरेनुसार सोन्याच्या कलशात टाकलेल्या तीन नावांच्या चिठ्यांमधूनच धर्मगुरु निवडतील. जर त्या नावाला बीजिंगची मान्यता असेल तरच निवडलेले गुरु दलाई लामा मानले जातील. दलाई लामा हे धर्मगुरूंचे सर्वोच्च पद इ.स. १६४२मध्ये अस्तित्त्वात आले. तेव्हा जे धर्मगुरु होते त्यांना चिनी सम्राटांनी तिसरे दलाई लामा म्हटले. त्यांच्या परंपरेतील आधीचे दोन गुरु यांना मरणोत्तर दलाई लामा पहिले व दुसरे असे तत्कालीन चिनी क्विंग सम्राटांनी जाहीर केले. तिसऱ्या दलाई लामांनी ही परंपरा पुढे सुप्रतिष्ठित केली. बौद्धधर्मियांच्या या सर्वोच्च गुरुची निवडही आधीचे लामा मरण पावल्या नंतर होते. लामांचे प्रधान सचिव काही जुन्याजाणत्या धर्म नेत्यांची निवड मंडळे करतात. हे लोक तिबेटी समुदायातील हुशार, चुणचुणीत व काही धार्मिक खुणा, संकेतांसह जन्मलेल्या बालकांचा शोध घेतात. त्यांना ल्हासा येथे मुख्य धर्म मंदिरात आणले जाते. मग सर्वानुमते एका बालकाला पुढचे दलाई लामा जाहीर केले जाते. आधीच्या लामांचा हा नवा अवतार समजला जातो. १४वे दलाई लामा असेच निवडले गेले होते. निवडीनंतर त्यांचे खडतर धर्मशिक्षण ल्हासातील  मठांत झाले. आता ते म्हणतात की, त्यांच्यानंतर याच परंपरेने नवे दलाई लामा नियुक्त होतील व ते भारतातील तिबेटी समुदायातही जन्मलेले असू शकतील.

१४वे दलाई लामा तेंझीन ग्यात्सो यांनी नुकताच आपला ९०वा वाढदिवस साजरा केला. त्यावेळी जगभरातील चाहत्यांच्या समक्ष त्यांनी ही घोषणा केली. केंद्रीय मंत्री किरण रिजिजू भारत सरकारचे प्रतिनिधी होते तर हॉलिवूडचे विख्यात अभिनेते जेरे यांच्यासह अनेक नामवंत मंडळी उपस्थित होती. जगभरातील माध्यमांचे प्रतिनिधीही होते. अरुणाचलचे मुख्यमंत्री पेमा खांडू हेही होते. रिजिजू व पेमा खांडू यांच्या उपस्थितीबद्दल चीनने जाहीर नापसंती व्यक्त केली. तिबेट हा प्राचीन काळापासून चीनमध्येच आहे. अरुणाचल प्रदेशावरही चीन दावा सांगतो. अशा स्थितीत नोबेल शांतता पुरस्काराचे मानकरी ठरलेले १४वे दलाई लामा यांच्या प्रत्येक हालचालीवर चीनची नजर आहे. चीनने गेल्या काही दशकांत दलाई लामांइतक्याच महत्त्वाचे मानले जाणारे दुसरे बौद्ध धर्मगुरु पंचेन लामा यांना आपल्या कह्यात घेतले आहे. आता नवे दलाई लामाही आपणच नियुक्त करणार असे चीन म्हणत आहे. बौद्ध धर्मात त्यामुळे निराळा संघर्ष उद्भवणार आहे. कारण, दलाई लामांची पंरपरा पुढे नेणारे पंधरावे दलाई लामा जेव्हा अवतरतील तेव्हा ते धरमशालाची परंपरा मानणारे तसेच आताच्या दलाई लामा समर्थकांची मान्यता लाभलेले असतील की बीजिंगची मान्यता लाभलेले असतील यावर संघर्षाचे स्वरूप ठरेल. शक्यता अशीही आहे की, चीन हट्टाने नवे दलाई लामा ल्हासात बसवेल आणि त्यांच्या नेतृत्त्वात तिबेटी बौद्ध समाज हा बीजिंगशीच एकनिष्ठ असल्याचे जागतिक समुदायाला भासवेल. लाखभर बौद्ध भारतात राहून चिनी सत्तेला वाकुल्या दाखवतात हे चिन्यांना सहन होत नाही. तिबेटमध्ये राहणारे बौद्धधर्मीयही धरमशालातीलच दलाई लामांना गुरु मानतात हेही चीनला सहन होत नाही. विद्यमान १४व्या दलाई लामांच्या नंतरच्या स्थितीत म्हणूनच आपल्याला हवा तोच बदल घडवण्याचा चीनचा प्रयत्न राहणार आहे. खरेतर त्यामुळे भारताची डोकेदुखी वाढू शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

परस्परविरोधी भूमिका घेण्याचा राहुल गांधींचा विक्रम!

महाराष्ट्रातील निवडणुकीत मोठ्या प्रमाणात बोगस मतदान झाल्याचा आरोप करणाऱ्या राहुल गांधी यांनी बिहारमध्ये मतदारयाद्यांच्या शुद्दीकरणालाच हरकत घेतली आहे. ही नेमकी कोलांटउडी ठरते. परस्परविरोधी भूमिका घेण्याचा विक्रम राहुल गांधी करत आहेत. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने मोठा विजय मिळवला, पण...

ठाकरेंचा हिंदीविरोध विद्यार्थ्यांसाठी मारक?

“हिंदीची सक्ती चालणार नाही”, राज ठाकरे ओरडले. उद्धव ठाकरेंनी त्यांच्या सुरात सूर मिसळला आणि एक मोठा मुद्दा विरोधकांच्या हाती सापडला. दोन्ही ठाकरे एक होण्याच्या बराच काळ सुरु असणाऱ्या चर्चांना, “मराठीसाठीच्या युद्धा”च्या भाषेचे बळ लाभले आणि दोन्ही ठाकरे बंधु तलवारी...

अजितदादांनी माळेगावमधली लढाई तर जिंकली, पुढे काय?

पुण्याच्या बारामतीतल्या माळेगाव साखर कारखान्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकताच निर्विवाद ताबा मिळवला. महाराष्ट्राची स्थापना झाली त्याआधीपासून राज्यातील सहकार चळवळीची सुरूवात झाली आणि त्यातही शेतमाल प्रक्रिया उद्योगात राज्यातील सहकाराचा पाया चांगला रोवला गेला. ऊस हे पश्चिम महाराष्ट्राच्या सहा-सात जिल्ह्यातील...
Skip to content