Homeडेली पल्सनाशिकमध्ये बाप-लेकाचा काँग्रेसश्रेष्ठींना...

नाशिकमध्ये बाप-लेकाचा काँग्रेसश्रेष्ठींना धक्का!

राज्य विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघातून आज काँग्रेसला मोठा फटका बसला. त्यांनी जाहीर केलेले उमेदवार डॉ. सुधीर तांबे यांनी प्रत्यक्षात उमेदवारी अर्जच दाखल केला नाही तर त्याऐवजी त्यांचे चिरंजीव आणि काँग्रेसचे युवा नेते सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केल्याने राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

काँग्रेसने जाहीर केलेल्या उमेदवाराऐवजी त्यांच्या मुलाने उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर या बदलाबाबत माहिती घेऊन प्रतिक्रिया देणार असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे. काँग्रेसचे उमेदवार डॉ. सुधीर तांबेच होते. त्यांनी आपल्याऐवजी सत्यजीत तांबे यांना उमेदवारी देण्याबाबत केणत्याही प्रकारची चर्चा केली नव्हती. त्यामुळे सत्यजीतनी उमेदवारी अर्ज का भरला याबद्दल आपल्याला माहित नाही. त्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केल्याने आता त्यांचे ते बघतील, असेही पटोले यांनी स्पष्ट केले.

डॉ. सुधीर तांबे यांनी उमेदवारी दाखल न करण्याचा निर्णय घेताना विधिमंडळाचे नेते बाळासाहेब थोरात यांच्यासोबत चर्चा केल्याचे समजते. त्यामुळे आता उमेदवार निवडीबाबत काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनाच अंधारात ठेवण्यात आले होते का, अशी चर्चा रंगू लागली आहे.

महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेनुसार नाशिक पदवीधर विधान परिषदेची जागा काँग्रेसला देण्यात आली होती. काँग्रेसने या निवडणुकीत पुन्हा एकदा विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी जाहीर केली होती. डॉ. सुधीर तांबे नाशिक पदवीधर मतदारसंघातून तीन वेळा विजयी झाले आहेत. आज सकाळीदेखील सुधीर तांबे हेच काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे उमेदवार असतील असे स्पष्ट चित्र होते. सुधीर तांबे यांनी निवडणूक अर्ज भरण्यास जाणार असल्याचे ट्विटही केले होते. तर, दुसरीकडे सुधीर तांबे यांचे चिरंजीव आणि युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष सत्यजित तांबे यांना भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र, अचानकपणे आज सत्यजित तांबे यांनी उमेदवारी अर्ज भरला असल्याचे दिसून आले. काँग्रेसकडून सुधीर तांबे यांच्यासाठी एबी फॉर्म दिला होता. मात्र, सत्यजित यांचा एबी फॉर्म न आल्याने त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला असल्याची माहिती सत्यजित तांबे यांनीच दिली. उमेदवारीबाबत पक्षाच्या नेतृत्त्वाला कल्पना दिली असल्याचेही तांबे यांनी सांगितले.

काँग्रेसची अधिकृत उमेदवारी मिळूनही पित्याने आपल्या मुलासाठी माघार घेतल्याने अनेकांना धक्के बसले आहेत. सत्यजित तांबे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केल्यानंतर आपण काँग्रेसचाच कार्यकर्ता असे म्हणत आहेत. त्याचवेळी ते अपक्ष म्हणून भाजप तसेच शिवसेनेच्या शिंदे गटाचेही समर्थन मागणार आहेत. भाजपने येथे उमेदवारच दिला नाही. ज्या दोघा उमेदवारांनी भाजपचे उमेदवार म्हणून उमेदवारी दाखल केली त्यापैकी कोणालाही भाजपने पक्षाचे अधिकृत चिन्ह दिलेले नाही. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही सत्यजीत तांबे यांनी पाठिंबा मागितल्यास त्याचा विचार करू, असे सांगितल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात विधानसभेवर नऊ वेळा निवडून आले आहेत. आताही राजकीय वारस म्हणून त्यांची कन्या पुढे येण्याची शक्यता आहे. या स्थितीत सत्यजित तांबे यांनी आपल्या मामांनाच (बाळासाहेब थोरात) शह दिल्याची चर्चा आहे.

नागपूरमध्ये महाविकास आघाडीत बिघाडी?

दरम्यान, नागपूर शिक्षक मतदारसंघात महाविकास आघााडीकडून चौघांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

या शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसंदर्भात काँग्रेसने काल सायंकाळी आपली भूमिका स्पष्ट केली होती. नागपूर विभागात आपला उमेदवार राहणार नसून आपण शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा देणार असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. मात्र महाविकास आघाडीचा घटकपक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे सतीश इटकेलवार यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याची चर्चा सुरू झाली. या निवडणुकीची तयारी आजची नाही, गेल्या वर्षभरापासून तयारी करत आहे. माझी दावेदारी म्हणजे आमच्या पक्षाचे मन वळवण्याचा हा एक प्रयत्न आहे. कारण मला जवळपास सर्व संघटनांचे समर्थन मिळाले आहे. संघटनांच्या प्रमुखांनी जरी सांगितले नसले, तरी त्यांच्या लोकांनी ही निवडणूक लढवण्यासाठी मला सांगितले आहे, असे इटकेलवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. आता 16 जानेवारीला अर्ज परत घेण्याच्या दिवशी कोण प्रत्यक्षात उमेदवार होते हे स्पष्ट होईल.

महाविकास आघाडीच्या वेगवेगळ्या गटांचे चार उमेदवार आता रिंगणात आहेत. शिक्षक भारतीचे राजेंद्र झाडे, उद्धव ठाकरे गटाचे गंगाधर नाकाडे, काँग्रेसप्रणित शिक्षक संघटनेचे सुधाकर अडबाले यांनी आधीच उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. सतीश इटकेलवार राष्ट्रवादीचे नागपूरचे प्रवक्ते आणि ओबीसी सेलचे प्रमुख आहेत.

Continue reading

शिक्षणतज्ज्ञ प्राचार्य डॉ. सुनिता कामटे सेवानिवृत्त

मुंबईतल्या बोरीवली पूर्व येथील सुविद्या प्रसारक संघाच्या श्री मंगुभाई दत्ताणी विद्यालय आणि योजना कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या शिक्षणतज्ज्ञ डॉ. सुनिता कामटे आपल्या ३३ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर नुकत्याच सेवानिवृत्त झाल्या. याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सुविद्या प्रसारक संघाचे अध्यक्ष शिक्षणतज्ज्ञ महादेव रानडे...

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सुरेखा पुरंदरे यांचे देहावसान

मुंबईतल्या दादर माटुंगा कल्चरल सेंटरच्या सल्लागार सदस्या तसेच दादर वनिता समाज, या प्रतिष्ठित संस्थेच्या ज्येष्ठ सदस्या सुरेखा पुरंदरे यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले. त्या ९१ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. शास्त्रीय संगीतात...

प्राध्यापक डॉक्टर भ्रष्टाचारी? जे. जे. रुग्णालयात खळबळ!

मुंबईतील प्रसिद्ध जे. जे. रुग्णालयाच्या अस्थिरोगशास्त्र (आर्थॉपेडिक्स) विभागात एका वरिष्ठ प्राध्यापकाविरुद्ध अत्यंत गंभीर आणि धक्कादायक आरोप झाल्यामुळे वैद्यकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. प्रा. डॉ. नितीन महाजन यांच्यावर निवासी डॉक्टरांचा मानसिक व आर्थिक छळ करणे, बनावट सह्या करणे आणि...
Skip to content